CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

एसीपी राजेंद्र कुलकर्णी कि जुबानी : खतरनाक साडेचार करोड का मणपूरम गोल्ड दरोडा

CRIME BORDER | 27 December | 02:45 PM

मी दि.१.जुलै २०१२ ते ३१ मार्च २०१४ दरम्यान विष्णुनगर पोलीस ठाणे डोंबिवली येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होतो. या कालावधित माझे सोबत असलेले अधिकारी व अंमलदार हे कर्तव्यदक्ष चाणाक्ष हुषार असे होते. त्यामुळे आम्ही विष्णुनगर पोलीस ठाणेचे गुन्हे उघडकिस आणण्याचे प्रमाण ७० टक्के पर्यंत नेले होते. त्यामुळे विष्णुनगर पोलीस स्टेशनचा ठाणे आयुक्तालयातील ३३ पोलीस ठाण्यात दुसरा क्रमांक होता. त्यामुळे जवळ जवळ प्रत्येक महिन्याचे गुन्हे आढावा परिषदेत उघडकिस आणलेल्या गुन्हयांचे प्रोत्साहानार्थ विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार करण्यात येउन त्यांना मा. पोलीस आयुक्तांतर्फे प्रशस्ती पत्रक देण्यात येत होते. दि. २.१.२०१४ रोजी दुपारी २.३0 वाचे सुमारास मी विष्णुनगर पोलीसठाण्यास हजर असतांना कोपर रोड चौकीस नेमणुकीस असलेले पो .ह. देवरे वपो. ना. अनंतकवळी यांनी मला फोन करून कळवले की कोपर रोड चौकीला रस्त्यावर भांडण करणाऱ्या तीन संशयीत इसमांना कोपर रोड चौकीत आणले असून त्यांच्यात पैशाच्या व्यवहारा वरून वाद आहेत तसेच यात काही संशयास्पद वाटते.

माहिती मिळताच मी स.पो.नि. अरुण घाटगे , पो. ना. राजेंद्र घोलप , पो .ह.राजे असे पोलीस जीपने कौपर चौकीला पोहचलो. तेथे तीन तरूण इसमांची चौकशी चालू होती. त्यांची नावे दिपक शिवराम दळवी वय ३३ वर्षे रा.गणेशनगर डोंबिवली , रूपेश मधुकर रणपिसे वय ३१ वर्षे रा. सुभाषरोड डोंबिवली , जिवन दिनानाथ सिंग वय २८ वर्षे. त्यांची आम्ही प्राथमिक चौकशी केली असता असे आढळून आले की सदर तीन इसम व त्यांचे काही साथीदारांनी तीन महिन्यापूर्वी नाशिक येथे जाऊन मणप्पुर गोल्ड या सोने गहाण ठेवणाऱ्या दुकानावर दरोडा टाकला व त्या दरोडयातील पैशाच्या वाटणीवरून त्यांच्यात भांडणे होऊन रूपेश व जिवनसिंग हे दिपक दळवीस मारहाण करीत होते. हि माहिती संवेदनाशिल होते व त्याची सत्यता पडताळून पहाणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही त्या तिघांना पोलीस जीपने विष्णुनगर पोलीस ठाण्यात आणले.विष्णुनगर पोलीस ठाण्यास सदर तीन इसमांची अधिक चौकशी केली असता निदर्शनास आले की सदर तीन इसम आणि त्यांचे तीन साथिदार नाशिकला राहणारे चंद्रशेखर व राज राणे या दोन भावांच्या बोलवण्या नुसार तीन महिन्यापूर्वी नाशिक येथे गेले होते. चंद्रशेखर व राज हे काही वर्षा पूर्वी डोंबिवली येथे रहात होते.त्यांची दिपक दळवीशी मैत्री होती.

चंद्रशेखर राणेने प्लॅन केला होता की अक्षयकुमारच्या ' स्पेशल छब्बिस' या चित्रपटाप्रमाणे नाशिकरोड येथिन मणप्पुरम गोल्ड या दुकानावर धाडसी दरोडा टाकून ते लुटायचे आणि झटक्यात श्रीमंत बनायचे. यासाठी चंद्रशेखर डोंबिवली येथे येऊन दिपक दळवीला भेटला होता व दिपकला झटपट श्रीमंत होण्याचा प्लॅन त्याने समाजवून सांगितला होता तसेच त्याला पोलीसा सारखे दिसणारे उंच धिप्पाड तीन पुरुष शोधून ठेवण्यास सांगितले होते. वरील प्लॅननुसार चंद्रशेखरच्या बोलवण्या प्रमाणे दिपक दळवी त्याचे चार साथीदारांना नाशिकला घेवून गेला. तेथे चंद्रशेखर व राज यांनी त्यांना दरोड्याचा प्लॅन समजावून सांगितला. तसेच त्यांनी इंटरनेट वरून स्पेशल छब्बिस हा चित्रपट डाउनलोड करून बरयाच वेळा पाहिला. त्यावर चर्चा करून प्रत्येकाचा रोल ठरवल्या गेला .

दरोड्यासाठी त्यांनी पोलीसा सारखे गणवेश चेहरे झाकण्याचे बुरखे हात बांधावयासाठी दोरी खेळण्यातले पिस्तुल प्राप्त केले. दि. २ ऑक्टोबर २०१३ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विटकोनाका नाशिक येथील मणप्पुरम गोल्डचे दुकाना जवळ पांढऱ्या तवेरा कार क. एमएच . ०५ आर ३८ ९ ७ या वहानाने पोहचले. चंद्रशेखर व राज यांनी स्वतः च्या हातास दोरी बांधून तोंडावर बुरखा घेऊन चोर आसल्याचे भासवले. एकनाथने फौजदाराचा गणवेश घातला तर रूपेश व जिवनने हावालदाराचा गणवेश घातला होता तर कार्तिकवर दरवाजाचे बाहेर थांबून येणारे जाणरे इसमांवर लक्ष ठेवण्याची कामगरी सोपवण्यात आली होती. ठरलेल्या प्लन प्रमाणे चंद्रशेखर व राज या दोन चोरांना घेऊन तीन पोलीस मणपुराम गोल्डच्या कार्यालयात शिरले. तेथील मॅनेजरला फौजदार एकनाथ पष्टे याने सांगितले की ' या दोन चोरांनी चोरी केलेले दागिने तुमच्या कडे गहाण ठेवले आहेत ते हस्तगत करण्यासाठी आम्ही पोलीस आलो आहोत'. त्यावेळी कार्यालयात मॅनेजर व दोन कर्मचारी हजर होते. दरम्यान कार्तिकने कार्यालयाचे शटर खाली केले त्यामुळे आत काय चालू आहे हे बाहेरून दिसत नव्हते.तेव्हा चंद्रशेखर व राजने त्याचे जवळील खेळण्यातले पिस्तुल बाहेर काढून मॅनेजर व दोन कर्मच्याऱ्यावर रोखले आणि मॅनेजर कडून लॉकरच्या चाव्या मागून घेतल्या व लॉकर उघडून त्यातील सुमारे १५ किलो वजनाचे सोन्याचे दागिने व ३ लाख रोख रूपये त्याचे जवळील कापडी पिशवीत भरले.

मॅनेजर व दोन कर्मच्यारयांना पोलिसांना न कळविण्याच्या सुचना देउन कार्यालयाचे बाहेर पडले आणि तवेरा कारने व्दारकाचे दिशेने पळाले. पुढे पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी मखमलाबादनाक्याला तवेरा कार सोडून दिली. तेथून ते चंद्रशेखरच्या नॅनो कारने नाशिकरोड येथील भाडयाने घेतलेल्या घरी गेले. त्या सगळयांना चंद्रशेखरने प्रत्येकी पन्नास हजार रूपये दिले आणि बाकी वाटा दागिने विकल्यावर देईल असे सांगून दुसरे दिवशी त्यांना रेल्वेने डोंबिवली येथे परत पाठवले.त्यानंतर काही दिवसांनी चंद्रशेखर नॅनो कारने डोंबिवली येथे आला व त्याने दिपक दळवी मार्फत रूपेशला रूपये ७ लाख जिवनसिंग याला रू. ५ लाख एकनाथला रू. ५ लाख दिपकला रू. ३ लाख कार्तिक व डेव्हिडला प्रत्येकी दिड लाख दिले व चंद्रशेखर नाशिकला परत गेला. परंतु सदर दरोड्याची बातमी रूपेश व जिवनने टिव्हिवर पाहिली तेव्हा त्याना समजले की चंद्रशेखरला या दरोडयात मोठे घबाड मिळाले असून त्याने आपली कमी पैशावर बोळवण केली आहे.

लोभ लालसा ही सर्वनाशाची जनानी आहे. या लोभापायी रूपेश व जिवनसिंगने दिपककडे आणखी प्रत्येकी ५ लाख रूपयाची मागणी केली. तसेच दिपकने यात जास्त रक्कम हडप केल्याचाही आरोप दिपकवर केला. दिपकने त्यांची मागणी चंद्रशेखरला फोनवरून कळवली परंतु चंद्रसेखरने ती बातमी मीठ मसाला लावून सांगितली आहे. असे सांगून त्यांची मागणी धूडकावून लावली. हि गोष्ट दिपकने रूपेश व जिवनला सांगितली परंतु त्याचा त्यावर विश्वास बसला नाही आणि दिपकनेच त्याच्या वाटयाचे पैसे खाल्ले अशा संशयावरून ते आज दिपकचा सोक्षमोक्ष लावणार होते. हे त्यांचे भांडण पोलीस चौकीजवळ झाल्याने दिपक स्तःला वाचवण्यासठी पोलीस चौकीकडे पळाला होता.वरील माहिती नंतर तीची सत्यता पडताळणे करता मी पोलीस नियंत्रण कक्षाकडून नाशिक नियंत्रणकक्षाचा फोन नंबर मिळवला. नाशिक नियंत्रणकक्षा कडे मी मणपुराम गोल्ड दरोड्याची माहिती विचारली असता ती खरी असल्याचे सांगून संबधीत उपनगर पोलीस ठाण्याचा फोन नंबर दिला.

मी उपनगर पोलीसठाण्याला फोन केला असता त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.पोपरे यांनी मला सदर दरोडा कसा पडला किती इसम होते याची माहिती दिली तसेच या दरोडयात १५ किलो सोने व तीन लाख रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती दिली. तसेच सदर दरोडा अद्याप उघडकिस आला नसल्याचे सांगून काही क्लू मिळाला आहे काय ? याबाबत मला विचारणा केली. मी त्यांना प्रयत्न चालू असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी मला शुभेच्छा देऊन सांगितले की, गेले तीन महिने ते स्वतः तसेच नाशिक क्राईम ब्रँच प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांचे प्रयत्नास यश आलेले नाही. त्यामुळे दर महिन्याचे क्राईम मिटींग मध्ये त्यांना या गुन्हयाची विचारणा होते.

मी श्री. पोपरे यांना यात लवकारच यश मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले.या वरून आम्ही ताब्यात घेतलेले इसम खरी माहीती देत असल्याची आम्हाला खात्री झाली. उपनगर पोलीस ठाणे येथे या दरोडयाबाबत गु.र.क. २५८/२०१३ कलम ३९५,४५२,१७१ भा.द.वि. नोंद होता. मी सदर तीन संशयीत आरोपींना एका जबरी चोरीच्या गुन्हयात अटक करण्यास सांगितले. तसेच त्यांचा दुसरे दिवशीपोलीस कोठडी रिमांड घेण्यास सांगितले. त्यानंतर मी हि घटना मा. पोलीस उपायुक्त श्री. पराग मणेरे सो. यांना फोन वरून कळवली. त्यांनी प्रथम माझे व माझ्या पथकाचे अभिनंदन केले व या गुन्हयातील मालमत्ता कशी हस्तागत होईल यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.त्यानंतर आम्ही सदर तिघांची पुन्हा चौकशी चालू केली. त्यात कळाले की या तिघीनांही दागिन्यांचे काय झाले हे माहित नव्हते. याची माहिती फक्त चंद्रशेखर व राज यांनाच होती. आरोपी दिपक दळवी कडून आम्हाला चंद्रशेखर व राजचा मोबाइल नंबर मिळाला. त्याचा आम्ही त्वरीत सीडीआर मागवला.

त्यावरून आम्हाला त्यांचे वास्तव्याचे ठिकाण नाशिकरोड असल्याचे समजले. तसेच पोलीसठाणे अभिलेखावरून चंद्रशेखर राणे विष्णुनगर पोलीस ठाण्यास पूर्वी दोन गुन्हयात अटक असल्याचे आढळले. १) गु.र.क. ४४/२००१ कलम ३७९ भा. द. वि. मोटर सायकल चोरी २) गु.र.क. १४१/२००१ घरफोडी. तसेच रूपेश रणपिसेवर तीन गुन्हे नोंद होते. १ गु.र.क. १२४/२००१ कलम ३७९ भा. द. वि. २ गु.र.क. ७२/२००२ कलम ३२४,४२७ भा. द. वि., ३) ११०/२००६कलम ३२४, ३२५, ३४ भा. द. वि. तसेच संशयीत कार्तिक मानपाडा पोलीसठाणे डोंबिवली येथे अटक असल्याचे समजले.परंतु कार्तिकने या गुन्हयाची माहिती मानपाडा पोलीसांना दिलेली नव्हती. त्याचेवर पुर्वी सोनसाखळी चोरीचे गुन्हे नोंद होते. त्यानंतर दुसरे दिवशी सदर आरोपींचे पोलीस कोठडी रिमांड मिळाल्यावर मी सपोनि घाटगे सपोनि खंदारे व पथकास आरोपी दिपक दळवी याला घेऊन नाशिक येथे तपासा करीता पाठवले. त्या साठी रितसर वरिष्ठांची पारवानगी घेतली.

आमचे ताब्यातील तीनही आरोपींना चंद्रशेखरचा पत्ता माहित नव्हता. ते वापरत असलेले सीमकार्डचे पत्ते अपूर्ण होते. त्यामुळे त्यांना शोधणे एक आव्हानच होते. तरी सदर पथक आरोपी दिपक दळवी यास घेऊन नाशिकला गेले. तिथे त्यांनी सदर पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला.परंतु शोध न लागल्याने सदर पथक निराश होऊन परत आले. या घडामोडीची माहिती मी मा. पो. उपायुक्त श्री. मणेरे सो. यांना दिली.त्यांनाही माझी निराशा जाणवली. तरी त्यांनी मला प्रोत्साहित करत सांगितले की ह्या केसचा छडा लावण्यास आम्हीआणखी प्रयत्न करावे. अशी महत्वाची केस क्वचितच हाती येत असते. त्या साठी लागेल ती मदत करण्यास ते तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा मी आमचीटीम सीडीअआर ऍनोलेसीस मध्ये कमी पडत असल्याने आम्हाला मदतीला मानपाडा पोलीस ठाणेचे सपोनि आबा पाटील द्यावे अशी विनंती केली. ती श्री. मणरे सो.यांनी त्वरीत मान्य केली. त्यादिवशी दुपार पर्यंत सपोनि. आबा पाटील विष्णुनगर पोलीस ठाण्यास हजर झाले. मी आबा पाटील यांना सदर प्रकरणाची सर्व माहिती दिली. तसेच चंद्रशेखर व राज यांचे मोबाईल फोनचे सीडीआर देउन सदर मोबाईल नंबरने ज्या मोबाईल नंबरशी जास्त वेळ बोलणे झाले असेल त्या नंबरची माहिती काढण्यास सांगितले.

त्यानुसार सपोनि. आबा पाटील यांनी मला चार मोबाईल फोन क्रमांक काढून दिले जे जास्त वेळ संपर्कात होते. दरम्यान आम्ही अटक तीन आरोपींची चौकशी केली असता असे आढळून आले की आरोपी चंद्रशेखर राणे हा पुर्वी मणपुरम गोल्डच्या त्याच कार्यालयात कॉम्पुटर मेकॅनिकल म्हणून कामास होता. त्यामुळे त्याला त्या कार्यालयाची संपूर्ण माहिती होती. सुमारे दोन महिन्यापासून तो झटपट श्रीमंत होण्यासाठी तो दरोडा टाकण्याचे प्लॅनिंग करत होता. त्याने ' स्पेशल छब्बिस' या चित्रपटा प्रमाणे दरोडा टाकण्याची योजना आखली होती. त्याच सुमारास त्याला पाहिजे ती संधी चालून आली. सदर मणपुरम गोल्ड कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकाची बंदूक नादुरूस्त झाली आणि ती दुरुस्तीला दिल्याची महिती चंद्रशेखरला मिळाली. या संधीचा फायदा घेऊन चंद्रशेखरने दिपक व त्याचे साथीदारांना नाशिकला बोलावून घेतले आणि योग्य ती खबरदारी घेत यशस्वी दरोडा टाकला.

सदर दरोडयासाठी त्यानी वापरलेली तवेरा कार ट्रॅव्हल गुरू चार रस्ता डोंबिवली येथून भाड्याने घेऊन रात्रीचे वेळी दिपक रूपेश जिवन, एकनाथ, कार्तिक ,डेव्हिड असे नशिकला गेले. रस्त्यात त्यानी चालकाला मारहाण करून हातपाय बांधून घोटीचे पुढे फेकून दिले व त्याचे ताब्यातील तवेरा स्वतः चालवत नाशिकला घेऊन गेले. याबाबत सिन्नर पोलीस ठाणे येथे दरोड्याचा गु.र.क. २५/२०१५ कलम ३९५,३९७ भा. द. वि. प्रमाणे तवेरा चालकाचे तक्रारी वरून गुन्हा नोंद होता. सदर तवेराचे मालक श्री. योगेश सणस रा .ठी. ठाकुरवाडी डोंबिवली यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, त्यांची कार मखमलाबाद येथे बेवारस सोडलेली पोलीसांना मिळाली. सदर कार सिन्नर पोलीसांनी त्यांना परत केली होती. सदर चौकशीअंती मी सपोनि अरूण घाटगे व पथकास आरोपीसह पुन्हा नशिकला जाण्यास सांगितले. दुसरे दिवशी सपोनि घाटगे सपोनि.आबा पाटील व पथक आरोपी दिपकला घेऊन नाशिकला रवाना झाले. नशिकला सदर पथकाने प्राप्त चार मोबाईल नंबर धारकांचा शोध घेतला. त्यातील एक नंबर डॉमिनी पिझ्झाचा निघाला.

उरलेल्या नंबर पैकी एका व्यक्तिने सदर पथकास चंद्रशेखरचे घर दाखवले. त्यावेळी संध्याकाळ झाली होती आणि ते धर बंद होते. त्यामुळे सदर पोलीस पथकाने काही अंतरावरून त्या घरावर पाळत ठेवली. यामध्ये रात्रीचे अकरा वाजले तरी सदर पथकाने धीर सोडलानाही. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एक नॅनो कार तेथे आली त्यामध्ये दोन तरुण युवक बसलेले होते.तेच चंद्रशेखर व राज असल्याचे दिपकने ओळखून संगितले. सदर दोन्ही इसम कार बंद करून पहिल्या माळ्यावरील त्याचे खोलीचे कुलुप उधडून धरात गेले व त्याने दरवाजा बंद केला. तेव्हा सपोनि घाटगे आबा पाटील व पथकाने सदर खोली जवळ जावून दरवाजाची बेल वाजवली असता चंद्रशेखरने दारवाजा उघडला. त्याबरोबर सदर पोलीस पथकाने घरात शिरून आपण डोंबिवलीचे पोलीस असल्याचे सांगितले. तसेच सदर दोघांकडे मणपुराम गोल्ड दरोडयाची चौकशी करू लागले.

परंतु दिपकला पोलीसाबरोबर पाहून त्यांनी दरोडयाची कबूली दिली. तसेच सदर दरोडयात मिळालेली रोख रक्कम सगड्यांना वाटून टाकली असे सांगून सदर दरोडयात थोडेच सोने मिळाले होते ते विकून त्याची रक्कम सुध्दा वाटून टाकल्याचे ते दोघे सांगू लागले. परंतु पोलीस पथकाचा त्यावर विश्वास बसला नाही व त्यांनी सामानाची झडती चालू केली. तेव्हा एका बॅगेत लगडीच्या स्वरूपात सोने आढळून आले. तेव्हा चौकशीत चंद्रशेखरने कबूल केले की, त्याने दरवडयात मिळालेले सर्व सोन्याचे दागिने भांडूप येथिल सोनाराकडे नेउन वितळवून घेतल्याचे त्याने सांगितले. सदर गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत केल्याचे सपोनि घाटगे यांनी मला रात्री डिड वाजेच्या सुमारास कळवले. तेव्हा मी सपोनि घाटगे व पथकाचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच आरोपी व मालमत्तेची काळजी घेण्याचे सांगून जागीच दोन पंचासमक्ष पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या.

तसेच मालमत्ता जास्त असल्याने उपनगर पोलीस ठाण्यास कळवून त्याचे पोलीस अधिकाऱ्या समक्ष मुद्देमाल सीलबंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच हि बातमी त्वरीत मा. पो.उपायुक्त श्री. मणेरे सो. यांना फोन वरून कळवली. त्यांनी त्वरीत माझे व माझ्या पथकाचे अभिनंदन केले. तसेच सपोनि घाटगे यांना प्रत्यक्ष फोन करून अभिनंदन केले व त्यांना योग्य त्या सुचना केल्या.सदर गुन्हयात १३.८४५ किलो सोने लगडीच्या स्वरूपात हस्तगत झाले.तसेच गुन्हयात वापरलेले दोन खेळण्याचे पिस्तुल, दोन चॉपर, एक पकड, दोन दोऱ्या , एक नॅनो कार जप्त करण्यात आली. असा एकूण रू. ४५२१७९६०/- चा माल हस्तगत करण्यात आला. सदर पथक आरोपी व मुद्देमालासह दुसरे दिवशी परत आले.दरम्यान हि बातमी नाशिकच्या पत्रकारांना रात्रीच कळाल्याने दुसरे दिवशी सकाळीच हि बातमी बब्रेकिंग न्यूज म्हणून टिव्हीवर दाखवण्यात आली.

डोंबिवलीतील नागरीक ,पोलीस, हितचिंतक विष्णुनगर पोलीस ठाण्यास पुष्पहार घेऊन आले. डोंबिवलीचे मा. आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांनीसुद्धा आमचे पोलीस ठाण्यास येउन अभिनंदन केले. डोंबिवलीत आमच्याअभिनंदनाचे बोर्ड ,बॅनर झळकले. डोंबिवलीच्या पत्रकारांनी सुध्दा या घटनेची दखल घेऊन बातमी आमच्या फोटो सहित प्रसिध्द केली. सुमारे १२ वाजेपर्यंत तपास पथक डोंबिवलीत परत आले. त्यानंतर चंद्रशेखर व राज राणे या दोघांना अटक करून न्यायलयात हजर करून त्यांचे पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आले. सुमारे साडेचार कोटींची मालमत्ता विष्णुनगर पोलीस ठाण्याचे मालमत्ता कक्षात ठेवण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने मी तेथे चार पोलीस अमलदारांचे सशस्त्र गार्ड रात्रं-दिवस ठेवले.

विष्णूनगर पोलीस ठाणेच्या हया कर्तबगारीची बातमी तात्काळ गृहमंत्री स्व. श्री. आर. आर. पाटील यांचेकडे पोहचली. त्यामुळे स्व. श्री. आर. आर. पाटील यांनी ठाणे आयुक्तालय येथे येऊन मा. पोलीस आयुक्त श्री. रघुवंशी सो. यांचेसह माझा व माझे सहकाऱ्यांचा सत्कार करून आम्हाला एक लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले. त्यानंतर कालांतराने सदर गुन्हयातील आरोपी व मुद्देमालाचा ताबा न्यायालया मार्फत उपनगर पोलीस ठाण्याने घेतला. अशा प्रकारे एका मोठ्या गाजलेल्या दरोड्याची उकल आम्ही संघटीत भावनेने केली.

लेखन : एसीपी राजेंद्र कुलकर्णी (सेवानिवृत्त)

लेखक हे सेवानिवृत्त एसीपी असून त्यांनी त्यांच्याच शब्दात हि सत्यकथा शब्दबद्ध केली आहे. -२५