CRIME BORDER | 14 January | 04:15 AM
भारतीय उपखंडाच्या इतिहासात अशी मोजकीच स्थळे आहेत, जी केवळ धार्मिक श्रद्धास्थान न राहता मानवी मूल्यांचा दीपस्तंभ बनली आहेत. अमृतसरचे 'श्री हरमंदिर साहिब' अर्थात सुवर्ण मंदिर हे त्यापैकीच एक. चहुबाजूंनी पसरलेले पवित्र अमृत सरोवर, त्यामध्ये झळाळणारे सुवर्ण मंदिर आणि कानावर पडणारे गुरबानीचे शांत स्वर... हे केवळ दृश्य नसून तो एक आध्यात्मिक अनुभव आहे जो शतकानुशतके जगाला शांती आणि बंधुत्वाचा संदेश देत आहे.
*सूफी संतांच्या हस्ते पायाभरणी:*
सर्वधर्मसमभावाचा वारसा
या पवित्र वास्तूचा पायाच मुळी सामाजिक सलोख्यावर आधारलेला आहे. १५७७ मध्ये शीख धर्माचे चौथे गुरू गुरू रामदास साहिब यांनी या शहराचा पाया रचला. मात्र, मंदिराच्या निर्मितीचा संकल्प पाचवे गुरू गुरू अर्जुन देव साहिब यांनी पूर्णत्वास नेला. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, शिखांच्या या सर्वोच्च केंद्राची पायाभरणी एका मुस्लिम सूफी संताच्या, म्हणजेच हजरत मियाँ मीर साहिब यांच्या हस्ते करण्यात आली. हा प्रसंग आजही भारतीय संस्कृतीतील 'गंगा-जमुनी' तहजीबचा सर्वात मोठा पुरावा मानला जातो.
वास्तुरचनेत दडलेली नम्रता आणि समानता
जगातील बहुतेक धार्मिक स्थळे ही उंचीवर किंवा पर्वतावर असतात, परंतु श्री हरमंदिर साहिबची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर जमिनीच्या पातळीपेक्षा खाली बांधले गेले आहे, जे 'नम्रतेचे' प्रतीक आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकाला पायऱ्या उतरून जावे लागते, याचाच अर्थ ईश्वराच्या दारात येताना अहंकार त्यागून येणे आवश्यक आहे. तसेच, मंदिराची चार प्रवेशद्वारे हे दर्शवतात की, येथे येण्यासाठी जात, धर्म, वर्ण किंवा लिंगाचा कोणताही अडथळा नाही; हे द्वार सर्वांसाठी सदैव खुले आहे.
*महाराजा रणजित सिंह आणि 'सुवर्ण' झळाळी*
सुरुवातीला साध्या रचनेत असलेल्या या वास्तूला १९ व्या शतकात खऱ्या अर्थाने सुवर्ण झळाळी मिळाली. शिखांचे महान शासक महाराजा रणजित सिंह यांनी या मंदिराच्या घुमटावर आणि भिंतींवर सोन्याचे पत्रे अर्पण केले. तेव्हापासून हे श्री'हरमंदिर साहिब' सातासमुद्रापार 'गोल्डन टेम्पल' म्हणून ओळखले जाऊ लागले.
"सुवर्ण मंदिर हे केवळ शिखांचे नाही, तर ते अखिल मानवजातीचे आध्यात्मिक आश्रयस्थान आहे."
*लंगर*
जगातील सर्वात मोठी सेवा संस्कृती
सुवर्ण मंदिराचा उल्लेख 'लंगर' सेवेशिवाय अपूर्ण आहे. कोणताही भेदभाव न करता, एकाच पंगतीत बसून हजारो लोक येथे प्रसाद ग्रहण करतात. ही परंपरा केवळ भूक भागवण्यासाठी नसून ती समाजातील उच्च-नीचतेची भिंत पाडण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. सेवा, त्याग आणि समर्पण या त्रिसूत्रीवर आधारलेली ही व्यवस्था आजही जगाला अचंबित करते.
आधुनिक भारताचे सांस्कृतिक वैभव
१६०४ मध्ये गुरू अर्जुन देव साहिब यांनी येथे 'आदि ग्रंथाची' प्रतिष्ठापना केली आणि हे स्थळ आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र बनले. आज २१ व्या शतकातही, हे मंदिर आपल्या मूळ मूल्यांशी घट्ट जोडलेले आहे. भारतीय लोकशाहीतील समानता आणि सहिष्णुतेचा आत्मा हरमंदिर साहिबमध्ये खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित होतो.
राहुल शोभाबाई लक्ष्मणराव भालेराव
जिल्हा माहिती अधिकारी
पालघर
उपसंचालक (माहिती)
कोकण विभाग, नवी मुंबई