CRIME BORDER | 18 January 2026 | 11:20 AM
ठाणे :- मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे दि. ०६ जानेवारी, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ठाणे विभागाची आढावा बैठक यशस्वीपणे संपन्न झाली. या बैठकीत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी, प्रगती व पुढील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, लेखाधिकारी, जिल्हा व्यवस्थापक- सामाजिक समावेशन, संस्था व क्षमता बांधणी, कार्यालयीन अधीक्षक, जिल्हा व्यवस्थापक – विपणन, जिल्हा व्यवस्थापक – आर्थिक समावेशन तसेच अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, भिवंडी व शहापूर तालुका अभियान कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा व तालुकास्तरीय कर्मचारी माहिती, संस्थीय बांधणी, प्रवर्गनिहाय कुटुंब समावेश, खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी, जोखीम प्रवणता निधी, बँक पतपुरवठा, विमा संरक्षण, वैयक्तिक बँक कर्ज तसेच उपजीविका वृद्धीच्या विविध उपक्रमांचा सखोल आढावा घेण्यात आला. यामध्ये औजार बँक, उत्पादक गट निधी वितरण, एंटरप्रायझेस, परसबाग, लखपती दीदी उपक्रम, उद्योग आधार, फूड लायसन्स, PMFME अंतर्गत Seed Capital व ३५ टक्के अनुदान, Smart FPC, ऑनलाईन उत्पादने, ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’, SVEP, MED आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये एकूण ४५८४४ लखपती दीदी उद्दिष्टे होते त्यापैकी ४७७३२ महिला लखपती झाल्या. या आर्थिक वर्षात एकूण ४२१७६ लखपती दीदी उद्दिष्टे आहे त्यापैकी डिसेंबर २०२५ अखेर एकूण ७२५२ महिला लखपती झालेल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५४३८३ महिला लखपती झालेल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे आर्थिक सबलीकरण, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे तसेच बचत गटांच्या माध्यमातून शाश्वत उपजीविका उभारण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व तालुक्यांनी उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने समन्वयाने काम करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.
या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील प्रगती अहवाल सादर करून अडचणी व उपाययोजनांबाबत चर्चा केली. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर अधिक प्रभावी नियोजन व काटेकोर पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.