CRIME BORDER | 18 January 2026 | 11:27 AM
सिकलसेल अॅनिमिया हा एक गंभीर, दीर्घकालीन आणि अनुवंशिक रक्तविकार असून तो केवळ वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न नसून एक व्यापक सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. योग्य वेळी निदान, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. याच उद्देशाने भारत सरकारने सन २०४७ पर्यंत सिकलसेल मुक्त भारत घडवण्याचे ध्येय निश्चित केले असून, त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनामार्फत १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत सिकलसेल तपासणी विशेष अभियान पंधरवडा राबविण्यात येत आहे.
सिकलसेल आजाराचे स्वरूप आणि महाराष्ट्रातील स्थिती
सामान्य परिस्थितीत लाल रक्तपेशी गोलाकार व लवचिक असतात. त्या रक्तवाहिन्यांमधून सहज प्रवास करून शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन पोहोचवतात. मात्र सिकलसेल अॅनिमियामध्ये या पेशी चंद्रकोरीसारख्या (विळ्याच्या) आकाराच्या, कडक व चिकट बनतात. परिणामी या पेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडकून ऑक्सिजनचा प्रवाह अडवतात आणि वेदनादायक व जीवघेण्या गुंतागुंती निर्माण होतात.
भारतामध्ये सिकलसेल रुग्णसंख्येत जगात दुसरा क्रमांक असून सुमारे १ कोटी ८० लाख लोकांमध्ये सिकलसेलची लक्षणे, तर १४ लाखांहून अधिक लोक प्रत्यक्ष रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ही स्थिती काहीशी गंभीर असून देशातील सुमारे १५ टक्क्यांहून अधिक सिकलसेल रुग्ण राज्यात आढळतात. २०१९ ते २०२५ या कालावधीत राज्यात १२,४२० सिकलसेल रुग्ण आणि १,२४,२७५ वाहक (Carrier) आढळून आले आहेत.
ठाणे जिल्ह्यात २०२१ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ४,५३,४०३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १,०३५ वाहक व ३७ रुग्ण आढळले आहेत. २००९ पासून आजअखेर जिल्ह्यात एकूण ११४ सिकलसेलग्रस्त रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. प्रामुख्याने आदिवासी समाज व काही विशिष्ट समुदायांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळते.
अनुवंशिकता आणि विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व
सिकलसेल हा आजार संसर्गजन्य नसून अनुवंशिक आहे. म्हणजेच तो पालकांकडून मुलांमध्ये जनुकांद्वारे येतो. विशेषतः रक्तसंबंधीय विवाह (चुलत-मामे भावंडांतील विवाह) या आजाराच्या प्रसाराला कारणीभूत ठरतात.
सिकलसेलचे दोन प्रकार आहेत –
वाहक (AS) – स्वतः निरोगी, पण पुढील पिढीला आजार देऊ शकतात
रुग्ण (SS) – गंभीर लक्षणांनी ग्रस्त
जर दोन्ही पालक वाहक असतील, तर अपत्य सिकलसेल रुग्ण होण्याची शक्यता २५ टक्के असते. त्यामुळे विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. शासनामार्फत पांढरे (निरोगी), पिवळे (वाहक) आणि लाल (रुग्ण) अशी रंगीत कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
बालकांमधील लक्षणे आणि वाढीवरील परिणाम
सिकलसेलची लक्षणे सहसा बाळ ६ महिन्यांच्या बाळाला सुद्धा दिसू शकतात. हात-पायांच्या बोटांना सूज येणे, तीव्र वेदना, सतत थकवा, वजन न वाढणे, वारंवार संसर्ग होणे ही प्रमुख लक्षणे आहेत. न्यूमोनिया, मेनिंजायटीस यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. वेळेवर रक्त तपासणी (HPLC / Electrophoresis) केल्यास योग्य उपचार शक्य होतात.
सिकलसेल क्रायसिस आणि अवयवांवरील परिणाम
‘सिकलसेल क्रायसिस’ ही या आजारातील सर्वात धोकादायक अवस्था आहे. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने छाती, हाडे, पाठ, सांधे यामध्ये तीव्र वेदना होतात. याचा परिणाम –
• मेंदू : लहान वयात स्ट्रोक
• फुफ्फुसे : अॅक्यूट चेस्ट सिंड्रोम
• मूत्रपिंड, डोळे, यकृत, पित्ताशय यांवर गंभीर परिणाम
वारंवार क्रायसिस झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो.
२०४७ निर्मूलन लक्ष्य आणि महाराष्ट्राचे विशेष अभियान
भारत सरकारचे उद्दिष्ट २०४७ पर्यंत सिकलसेल निर्मूलन हे आहे. त्यासाठी देशभर ७ कोटी लोकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे.
१५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सिकलसेल तपासणी विशेष पंधरवड्यात मोफत तपासणी, औषधोपचार, समुपदेशन, गरोदर मातांची विशेष तपासणी या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
उपचार आणि औषधोपचार
सिकलसेलवर कायमस्वरूपी इलाज नसला, तरी हायड्रॉक्स्युरिया हे प्रभावी औषध आहे. यामुळे वेदनादायक झटके ५०% पर्यंत कमी होतात. फॉलिक अॅसिड, आवश्यकतेनुसार रक्त संक्रमण आणि नियमित वैद्यकीय देखरेख महत्त्वाची आहे. बनावट उपचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
तपासणी, समुपदेशन आणि जीवनशैली
लवकर निदान हेच प्रभावी नियंत्रणाचे साधन आहे. तपासणीनंतर समुपदेशन अत्यावश्यक असून, योग्य विवाह निर्णय व गर्भधारणेतील काळजी यामुळे पुढील पिढी वाचवता येते.
भरपूर पाणी पिणे, संतुलित आहार, अति उष्णता-थंडी टाळणे, हलका व्यायाम, धूम्रपान टाळणे आणि सकारात्मक मानसिकता या गोष्टी रुग्णांचे जीवनमान सुधारतात.
शासकीय योजना आणि सामाजिक दायित्व
महाराष्ट्र शासनामार्फत संजय गांधी निराधार योजना, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती, एसटी प्रवास सवलत, विविध सामाजिक व आरोग्य योजना राबविण्यात येत आहेत.
सिकलसेल निर्मूलन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. तपासणी करून घेणे, जनजागृती करणे आणि योग्य निर्णय घेणे हेच सिकलसेलमुक्त भारताकडे जाण्याचे खरे पाऊल आहे.
चला, सिकलसेल निर्मूलनाच्या या राष्ट्रीय मोहिमेत आपण सर्वजण सहभागी होऊया.
आज तपासणी – उद्याचे निरोगी भविष्य!