CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा मूल्यांकनात नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यस्तरीय चतुर्थ मानांकन

CRIME BORDER | 27 January 2026 | 08:28 PM

150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा मूल्यांकनात नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यस्तरीय चतुर्थ मानांकन

मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात नवी मुंबई महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मानाचा चौथा क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी नवी मुंबईकर नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे.

मागील वर्षभरापासून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना ऑनलाईन सेवा पूरविण्याकडे भर दिला असून जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये नागरिकांना करभरणा करणे असो की महानगरपालिकेशी संबंधित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापासून वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून घेणे असो, सुविधांविषयी  तक्रार / सूचना करणे असो की महानगरपालिकेशी संबंधित माहिती मिळविणे असो – अशा सर्वच बाबींमध्ये वेबसाईट, माय एनएमएमसी ॲप, शासनाच्या आपले सरकार पोर्टलशी संलग्नता, व्हॉट्सॲप चॅटबॉट, डॅशबोर्ड, ई ऑफिस, एआय, ब्लॉकचेन, जीआयएस आधारित सेवा अशा विविध प्रकारे  ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व बाबींचे सखोल मूल्यमापन क्यूसीआय सारख्या नामांकित त्रयस्थ संस्थेमार्फत 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये करण्यात आले.  

वेबसाईट मूल्यांकन

वेबसाईट अनुपालन मूल्यमापनांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळामध्ये वापरकर्ता-सुलभ इंटरफेस, सर्वसमावेशक सुलभता, नियमितपणे अद्ययावत होणारी माहिती, प्रभावी शोध सुविधा, उच्च दर्जाची माहिती सुरक्षा, नागरिकांसाठी अभिप्राय व तक्रार निवारणाची सक्षम यंत्रणा तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनुपालन व प्रमाणन ही सर्व आवश्यक वैशिष्ट्ये प्रभावीपणे उपलब्ध असल्याचे आढळून आले.

आपले सरकार’ मूल्यांकन

शासनाच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने 68 लोकसेवांची ऑनलाईन उपलब्धता केलेली असून त्यांचे आपले सरकार पोर्टलशी प्रभावी एकात्मिकरण केले आहे. या व्यतिरिक्त 39 महानगरपालिकेशी संबंधित सेवाही ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सेवा वितरणाचा कालावधी कमी करण्यासाठी शासन प्रक्रियेची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. तसेच, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत व प्रभावी निराकरण होण्यासाठी सक्षम तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत असल्याचे मूल्यमापनात निदर्शनास आले.

ई-ऑफिस मूल्यांकन

ई-ऑफिस अनुपालन मूल्यमापनांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) विकसित ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून 1 हजारपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी या प्रणालीचा नियमित वापर करीत आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजात वेग, पारदर्शकता आली असून कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.

डॅशबोर्ड मूल्यांकन

डॅशबोर्ड अनुपालन मूल्यमापनांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने प्रशासकीय निर्णय प्रक्रियेसाठी प्रभावी डॅशबोर्ड प्रणाली विकसित केली असून, सर्व विभागांच्या महत्त्वाच्या निर्णयात्मक क्षेत्रांची माहिती एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध आहे. या डॅशबोर्डच्या आधारे विभागप्रमुखांच्या (HoD) बैठका घेण्यात येतात, तसेच रिअल-टाईम अद्ययावत माहिती उपलब्ध असल्यामुळे वेळेवर व अचूक निर्णय घेणे सुलभ झाले आहे.

व्हॉट्सॲप चॅटबॉट मूल्यांकन

व्हॉट्सॲप चॅटबॉट अनुपालन मूल्यमापनाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने सहज वापरता येणारी व बहुभाषिक समर्थन असलेली चॅटबॉट सेवा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून महत्त्वाच्या सूचना व संदेशांचे प्रसारण करण्यात येत असून, मालमत्ता कर व पाणीपट्टीचा ऑनलाईन भरणा करणे तसेच समाज कल्याणकारी योजनांसाठी पात्रता तपासणी यांसारख्या सेवा नागरिकांना सुलभपणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन मूल्यांकन

कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन मूल्यमापनांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने वेबसाईटवर आधारित AI चॅटबॉट उपलब्ध करून दिला आहे. त्याव्दारे नागरिकांच्या तक्रारींचे AI आधारित वर्गीकरण करून त्यांचे जलद व परिणामकारक निराकरण सुनिश्चित करण्यात येत आहे. तसेच, शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या प्रक्रियेत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून दस्तऐवजांची सुरक्षितता व पारदर्शकता वाढविण्यात आली आहे. यासोबतच, वृक्षारोपण उपक्रमांच्या निरीक्षणासाठी ब्लॉकचेनचा वापर करण्यात येत आहे.

GIS मूल्यांकन

GIS मूल्यमापनांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने 150 पेक्षा अधिक GIS लेयर्स विकसित करून त्यांचा विविध अनुप्रयोगांमध्ये प्रभावी वापर केला आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापनातील वाहन ट्रॅकिंग प्रणाली, यांत्रिक झाडू (Mechanical Sweeping) कामकाजाचे थेट निरीक्षण, तसेच हवामान बदलामुळे समुद्रपातळी वाढीच्या संभाव्य परिणामांचे पूर्वानुमान करण्यासाठी GIS आधारित विश्लेषणाचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिकेच्या विविध सुविधांची जिओ-टॅग केलेली माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने डिजिटल प्रशासन, पारदर्शकता, नागरिक-केंद्रित सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर सातत्याने भर दिल्यामुळे राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात राज्यात चतुर्थ क्रमांकाचे यशस्वी मानांकन महानगरपालिकेने संपादन केले आहे. त्याबद्दल नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आगामी काळात नागरिकांना अधिक सुलभ, जलद व दर्जेदार सेवा देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध डिजीटल माध्यमांचा उपयोग करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.*