CRIME BORDER | 30 January 2026 | 10:37 AM
ठाणे – भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर ठाणे जिल्हा आरोग्य विभागामार्फत ‘मच्छर ला टक्कर’ या कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक विशेष अभियानाची सुरुवात करण्यात आली. ही मोहीम जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, ठाणे व Godrej Embed – FHI संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा शुभारंभ जिल्हा पोलीस आयुक्तालयाच्या मैदानात उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक डॉ. अशोक नंदापूरकर, सहाय्यक संचालक डॉ. मनीष रेंघे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या सूचनेनुसार जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे यांनी या भव्य जनजागृती चित्ररथ मोहिमेची सुरुवात केली.
चार भव्य चित्ररथांद्वारे जनजागृती
या प्रसंगी चार भव्य व जनजागृतीपर चित्ररथांचे उद्घाटन करण्यात आले. हे चित्ररथ संपूर्ण ठाणे शहरात फिरविण्यात येणार असून, नागरिकांमध्ये हिवताप (मलेरिया), डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांबाबत जागृती निर्माण करण्याचे कार्य करणार आहेत.
गतवर्षी ठाणे जिल्ह्यात हिवतापाचे २,०७३ रुग्ण, डेंग्यूचे १,०९३ रुग्ण तसेच चिकुनगुनियाचे १६८ रुग्ण आढळून आले होते. सध्याच्या काळात हे कीटकजन्य आजार नागरी आरोग्यासाठी गंभीर आव्हान ठरत असून, त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत.
या चित्ररथ मोहिमेच्या माध्यमातून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, घरगुती व परिसरातील स्वच्छता, साचलेल्या पाण्याचे व्यवस्थापन, वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपाय याबाबतची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे कीटकजन्य आजारांवर मात करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे.
हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम
याच कार्यक्रमात फेब्रुवारी महिन्यात दिनांक १० ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भिवंडी तालुक्यात हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे यांनी दिली. या मोहिमेंतर्गत तालुक्यातील सर्व नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या खाऊ घालण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
या चित्ररथ फेरीच्या प्रसंगी जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचारी तसेच ठाणे महानगरपालिकेच्या हत्तीरोग विभागातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढून कीटकजन्य आजारांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.