CRIME BORDER | 15 February 2026 | 12:42 PM
ठाणे : - महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) येथे इयत्ता 8 वीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पात्रता परीक्षा दि. 7 जून 2026 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी मुलगे व मुली दोघेही अर्ज करू शकतात. पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. 5 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी केले आहे.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
या परीक्षेसाठी उमेदवार दि.1 जानेवारी 2027 रोजी मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 7 वीमध्ये शिकत असावा किंवा इयत्ता 7 वी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराचे वय दि.1 जानेवारी 2027 रोजी किमान 11 वर्षे 6 महिने आणि कमाल 13 वर्षे असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. 2 जानेवारी 2014 पूर्वीचा व दि.1 जुलै 2015 नंतरचा नसावा.
आवेदनपत्र (फॉर्म) मिळविण्याची प्रक्रिया
परीक्षेसाठीचे माहितीपत्रक, आवेदनपत्र व मागील प्रश्नपत्रिकांचे संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे मागविता येतील. सर्वसाधारण व इतर प्रवर्गासाठी आवेदनपत्र शुल्क रु.600/- आहे. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी शुल्क रु.555/- आहे.
डिमांड ड्राफ्ट “THE COMMANDANT RIMC FUND, DRAWEE BRANCH. HDFC BANK, BALLUPUR CHOWK, DEHRADUN, UTTARAKHAND” यांच्या नावे काढून संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी जातीच्या दाखल्याची सत्यप्रत जोडणे बंधनकारक आहे. आवेदनपत्रासोबत मागील १० वर्षांच्या प्रश्नपत्रिका व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टद्वारे पाठविण्यात येतील.
आवश्यक कागदपत्रे
आवेदनपत्र दोन प्रतींमध्ये भरून खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, जन्म दाखल्याची प्रमाणित छायाप्रत, अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), जातीचा दाखला (लागू असल्यास), शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह), आधारकार्ड छायाप्रत, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो (सहीसह) सर्व कागदपत्रांच्या प्रती मुख्याध्यापक किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांकडून साक्षांकित असणे आवश्यक आहे. अपूर्ण आवेदनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत
पूर्ण भरलेले आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे मा. आयुक्त, Maharashtra State Council of Examination, शिवाजीनगर, पुणे -411004 या पत्त्यावर दि.5 एप्रिल 2026 पर्यंत स्पीड पोस्टने पाठवावीत किंवा प्रत्यक्ष जमा करावीत. आवेदनपत्र थेट डेहराडून येथे पाठवू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षेचे वेळापत्रक दि. 7 जून 2026 रोजी पुणे येथे परीक्षा पुढीलप्रमाणे होईल. गणित - सकाळी 9.30 ते 11.00 (200 गुण), सामान्य ज्ञान 9 दुपारी 12.00 ते 1.00 (75 गुण), इंग्रजी - दुपारी 2.30 ते 4.30 (125 गुण) लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. मौखिक परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 020-29709617, ई-मेल mscepune@gmail.com किंवा संकेतस्थळ www.mscepune.in येथे संपर्क साधावा, असे Maharashtra State Council of Examination चे आयुक्त महेश चोथे यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकान्वये कळविलेआहे.