CRIME BORDER | 15 February 2026 | 12:57 PM
ठाणे :- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या बळकटीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या रु.1700 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मागणीपेक्षा वाढीव निधी देण्यात येईल. ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) प्रारूप आराखड्यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच मिरा भाईंदचे आमदार नरेंद्र मेहता, कल्याण पूर्व च्या आमदार सुलभा गायकवाड, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी ठाणे जिल्हाधिकार्यालयाच्या 5 व्या मजल्यावरील समिती सभागृहात उपस्थित होते.
दि.12 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक योजना बैठकीत सन 2026-27 साठीचा रु.1700 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला होता. श्री. शिंदे यांनी हा आराखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर केला.
जिल्हा नियोजन समितीने तयार केलेल्या या आराखड्यात रु.660.35कोटींचा मूळ प्रस्ताव समाविष्ट होता. विविध विभाग व यंत्रणांच्या मागण्यांचे विश्लेषण करून व्यवहार्य ठरणारी रु.1039.65 कोटींची अतिरिक्त मागणी प्रस्तावित करण्यात आली. अशा प्रकारे एकूण रु.1700 कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आला.
सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सुरुवातीला ठाणे जिल्ह्यास रु.805.84 कोटींची तरतूद कळविण्यात आली होती. त्यानंतर राज्यस्तरीय बैठकीत रु.199.16 कोटींची वाढ देण्यात आली. परिणामी, ठाणे जिल्ह्यासाठी रु. 1005 कोटींचा अंतिम नियतव्यय मंजूर करण्यात आला. सन 2024-25 च्या तुलनेत ही वाढ सुमारे 67 टक्के होती.
सन 2025-26 या वर्षात विविध नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ठाणे येथील तालुका क्रीडा संकुलात रु.99.98 लाख खर्चून जिम्नॅस्टिक खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नागरिक व पर्यटकांच्या सोयीसाठी रु.298.96 लाख खर्चून सेल्फ-क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक ईको-टॉयलेट्स उभारण्यात येत आहेत.
शहापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात रु.125लाख खर्चून 10 खाटांचे आधुनिक ‘न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर’ (एनआरसी) सुरू करण्यात येत आहे. मुरबाड तालुक्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध व्हावी, यासाठी रु.138.17 लाख खर्चून आधुनिक सेतू सुविधा केंद्र उभारण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये रु.100 लाख खर्चून सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसविण्यात येत आहेत.
“मिशन भरारी” या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील इयत्ता 5 वी ते 8 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना Indian Space Research Organisation (ISRO) तसेच देशातील नामांकित वैज्ञानिक संस्थांना शैक्षणिक भेटींचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी रु.50 लाखांचा निधी प्रस्तावित आहे.
तसेच भूमाता वनधन केंद्र येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना जंगल, जैवविविधता आणि आदिवासींचा सांस्कृतिक वारसा अनुभवता यावा यासाठी रु.65.50 लाख खर्चून ‘निसर्ग संवाद संस्कृती संग्रहालय’ उभारण्यात येणार आहे. वर्तकनगर, ठाणे येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालयात रु.159.92 लाख खर्चून आधुनिक बैठक व्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित ई-ग्रंथालय सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून जिल्ह्याच्या बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.