CRIME BORDER | 25 February 2026 | 01:43 PM
प्रस्तावना : - शीख धर्माचे नववे गुरू, गुरू तेग बहादूर हे धर्मस्वातंत्र्य, मानवता, समानता आणि धार्मिक सहिष्णुतेचे महान प्रतीक मानले जातात. “हिंद-दी-चादर” म्हणून गौरविले जाणारे गुरू तेग बहादूर यांनी अन्याय, जबरदस्ती धर्मांतर आणि अत्याचाराविरुद्ध निर्भीडपणे उभे राहून मानवतेसाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या ३५०व्या शहिदी स्मरणानिमित्त संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्र राज्यात विविध भव्य स्मारक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
भव्य स्मरण कार्यक्रमांचे आयोजन
गुरू तेग बहादूर यांच्या शहिदीच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त नागपूर, नांदेड आणि मुंबई येथे भव्य स्मरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश गुरू तेग बहादूर यांच्या बलिदानाची आठवण जागवणे, त्यांच्या विचारांचा प्रसार करणे तसेच समाजात एकता, बंधुता आणि आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करणे हा आहे.
या अंतर्गत 28 फेब्रुवारी आणि 01 मार्च रोजी खारघर, नवी मुंबई येथे प्रमुख राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, या कार्यक्रमास भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती अपेक्षित आहे. हा कार्यक्रम विविध धर्म, संप्रदाय व समाजघटकांना एकत्र आणणारा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे.
गुरू तेग बहादूर यांचे जीवनकार्य व बलिदान
गुरू तेग बहादूर यांनी आपल्या आयुष्यात धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि मानवतेच्या रक्षणासाठी अथक प्रयत्न केले. मुघल काळात धर्मांतरासाठी जबरदस्ती, अत्याचार आणि अन्याय वाढत असताना त्यांनी निर्भयपणे त्याविरोधात आवाज उठवला. काश्मिरी पंडितांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिल्ली येथे आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान केवळ शीख समाजासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे स्वरूप
स्मरण समारंभाच्या निमित्ताने गुरूवाणी पाठ, धार्मिक प्रवचन, ऐतिहासिक प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम, विचारप्रवर्तक गीत-सादरीकरण तसेच गुरू तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून भाविक व नागरिकांना शीख गुरूंच्या शिकवणी, भारतीय संस्कृतीतील समतेचे मूल्य आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला जाणार आहे.
लोकसहभाग व सामाजिक समन्वय
या कार्यक्रमात अंदाजे पाच लाख ते दहा लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता असून, युवक पिढीपर्यंत गुरू तेग बहादूर यांच्या विचारांचा प्रचार करणे हा प्रमुख उद्देश आहे. विविध समुदाय, सामाजिक संस्था, गुरुद्वारा व्यवस्थापन समित्या तसेच राज्य समन्वय समिती यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात येत आहेत.
नागपूर व नांदेड येथे प्रशासन, पोलीस विभाग, गुरुद्वारा बोर्ड आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षा आणि आरोग्य सुविधांची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी लंगर (सामुदायिक भोजन) सेवाही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
समाजासाठी प्रेरणादायी संदेश
गुरू तेग बहादूर यांचा जीवनप्रवास हा त्याग, धैर्य, सेवा आणि मानवतेच्या रक्षणाचा प्रेरणादायी आदर्श आहे. त्यांच्या बलिदानातून धार्मिक सहिष्णुता, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व अधोरेखित होते. त्यांच्या शिकवणीतून समाजात समता, बंधुता आणि शांततेची भावना बळकट करण्याची प्रेरणा मिळते.
निष्कर्ष
गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी स्मरण समारंभाचे आयोजन हे केवळ ऐतिहासिक श्रद्धांजली नसून, भारतीय समाजाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे पुनर्स्मरण आणि भावी पिढीसाठी मूल्यसंस्कार निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश दृढ होत असून, गुरू तेग बहादूर यांचा बलिदानाचा वारसा सदैव प्रेरणादायी ठरत राहील.
संजीवनी स.जाधव-पाटील - सहायक संचालक (माहिती) ,विभागीय माहित कार्यालय,