CRIME BORDER | 01 March 2026 | 11:27 AM
वरणगाव :- जिल्ह्यात भुरट्या चोरांचा हैदोस सुरूच असून दिवसेंदिवस चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहे. वरणगाव येथील बोहर्डी शिवारातील लाल माती भागात एका गॅस कंपनीचे गोडाऊन आहे .त्यामधून अज्ञात काही चोरट्यांनी एकूण ५७ सिलिंडर्स चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या संदर्भात सुमारे ७२ हजार ८४६ रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, दिनांक २५ व २६ फेब्रुवारी दरम्यान भुरट्या चोरांनी गोडाऊनमध्ये प्रवेश करून प्रत्येकी १ हजार २७८ रुपये किमतीचे ५७ सिलिंडर्स चोरून नेले. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असून परिसरात भीती व चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणी गॅसचे संचालक नरेंद्र उत्तमराव अहिरे (वय ५१) यांनी वरणगाव पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
चोरीस गेलेल्या एकूण ५७ सिलिंडर्सची किंमत ७२ हजार ८४६ रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गोडाऊनमधून इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर्स चोरीला गेल्याने सुरक्षा यंत्रणे बाबत प्रश्नचिन्ह उत्पन्न झाला आहे. या संदर्भात वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल यासीन पिंजारी हे करीत आहेत.
वरणगाव पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची चौकशी सुरू करण्यात येत आहे दरम्यान, गॅससारख्या ज्वलनशील वस्तूंची चोरी झाल्याने चोरीमागील चोरांचा नेमका काय उद्देश आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत