CRIME BORDER | 26 December 2025 | 05:59 PM
मायबाप सरकारने पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर कोकणच्या सर्वांगिण प्रगतीशी आजवर लपलेली एक जुनी भळभळती जखम कुरवाळली आणि भोळ्या भाबड्या कोकणी माणसाच्या खोल गेलेल्या डोळ्यात पुन्हा एकदा कोकणच्या कॅलिफोर्नियाची सय हळवेच जागी झाली. खरंतर कोकण आणि कॅलिफोर्निया या तुलनेची ही अक्षरमाला गेली 40 वर्ष कोकणला एक काळी कुट्टा आठवण म्हणून एखाद्या शिवी सारखी संबोधली गेली. मनोहर जोशी, राणे यांच्यापासून अनेक जणांनी कोकणचे सुपुत्र म्हणून महाराष्ट्राची गादी उबवली, खांजवली मात्र कोकणच्या किनारपट्टीच्या मानसन्मानाची, विकासाची, सुख संपन्नतेची रेषा एक इंचभर ही पुढे सरकली नाही. 1985 साली कोकणचा कॅलिफोर्निया किंवा कोकण कॅलिफोर्निया होऊ शकतो असं काही तज्ञांनी, निसर्ग वेड्या संशोधकांनी इथली माती, इथली नैसर्गिक भौगोलिक स्थिती, इथली ऊर्जा, इथलं पाणी, पोटन्शियल सागरी, नागरी आणि डोंगरी संस्कृती, अतिशय श्रीमंत, गडजंग श्रीमंत असा निसर्ग, अफाट संपन्नतेने उभी राहील अशी शेती, डोंगरदऱ्यात एकाच वेळेस नदी, समुद्र आणि खाडी अशी कुबेरालाही लाजवेल एवढी निसर्ग संपन्नता श्रीमंती अमेरिकेतला कॅलिफोर्निया काय आहे, तो यापेक्षा मोठा नाही आणि म्हणून पुढार्यांनी थोडासा अभ्यास करून दूरवरचं पाहिलं तर उभ्या भारत देशाला संपन्न करेल असा कोकणात कॅलिफोर्निया उभा राहील असं स्वप्न रंगवलं गेलं होतं. आज 40 वर्षानंतर चिंध्या चिंध्या झालेल्या या स्वप्नांच्या मरणासन्न वेळी ला काल शासनाने जाहीर केलेल्या पर्यटन हब या दहा वर्षाच्या रोड मॅप अर्थात कालबद्ध आराखड्यान पुन्हा एकदा आशेची पालवी फुटू लागली आहे. हे झालं तर या जर तर त्याच्या नुसत्या शक्यतेने अवघ्या कोकण किनारपट्टीच्या भविष्यावर एक वेगळीच आनंदाची लकेर उमटली आहे. गेली 25 वर्ष पनवेल वरून निघालेला आणि सावंतवाडी पर्यंत पोहोचलेला मुंबई - गोवा रोड चा द्राविडी प्राणायाम सोडवून हे सरकार स्वातंत्र्यानंतर च्या 75 वर्षात कोकण किनारपट्टीला सत्ताधाऱ्यांच्या खाते पुस्तिकेत टिचभर ही स्थान नसलेली हीच व्यवस्था खरंच कोकण किनारपट्टीचा काही भलं करेल का ? असे एक ना दोन शेकडो संशयाचे किडे या घोषणे सोबतच भविष्यातल्या मार्गावरती आत्ताच रेंगू लागले आहेत. पण त्याही पुढे जाऊन एक आशावाद जरूर आपलासा करावा लागतो, देर सही मगर दुरुस्त है असं म्हणून सरकारने जाहीर केलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटनाचा रोड मॅप फक्त स्वागत नव्हे तर अभ्यास, चिंतन आणि आक्रमकरीत्या त्याचा पाठपुरावाही करायला हवा. तरच अनेक वर्षानंतर कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची संधी या मातीतल्या घटकांना मिळेल.
या पर्यटन आराखड्यात सर्वात मोठ्या प्रमाणात अधोरेखित झालेली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातले पाण्याचे प्रवाह जगभरात अधिकारापासून पाण्याच्या प्रवाहावर स्वार होऊन जगभरातल्या बलाढ्य देशांनी जग पादाक्रांत केलं. त्यांच्या प्रगतीचा महामार्ग हा समुद्र, नद्या, खाड्या यांच्या प्रवाहातूनच झाला. खरंतर पन्नास वर्षांपूर्वीच ही ऊर्जा प्रगतीच्या स्रोत्रात आणायला हवी होती. मात्र भारतात इतका मोठा प्रचंड समुद्रकिनारा असूनही विशेषत: महाराष्ट्रात 700 किलोमीटरहून हे अधिक समुद्रकिनारा असूनही या ऊर्जेचा पर्यटन, उद्योग, ऊर्जा, जैव साखळी, अन्नसाखळी यांसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेता आला असता. तो केला गेला नाही त्याचा फार मोठा खड्डा आज महाराष्ट्राच्या गुणपत्रिकेत, प्रगतीपुस्तकात दिसून येतो. नेमका हाच धागा पकडत सरकारने नुकतंच जाहीर केलेलं पर्यटनाच्या धोरणात क्रूज आणि हाऊस बोट च्या नव्या धोरणाचा उदय सांगितला आहे. हे क्रूज आणि हाऊसबोट अवघ्या जगात कोट्यावधी पर्यटकांच्या आनंदाचं आवडीचं केंद्र आहे, तर हजारो लाखोंच्या भरभराटीच्या व्यवसायाचही स्रोत आहे. निव्वळ याच व्यवसायावर जगणारे देशात आणि जगात अनेक देश आहेत. आता ही क्रूज आणि हाऊसबोट संस्कृती भारतातही अनेक ठिकाणी अगदी केरळ, कश्मीर, गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई, गोवा, लक्षद्वीप अगदी मुंबई ते दुबई मालदीव अनेक मार्गांवरती विकसित झाली आहे. मात्र ती मोजक्याच लोकांसाठी विशिष्ट मोनोपोली साठी परवडणाऱ्यांच्या खिशांसाठी शिल्लक आहे. ती आम पातळीवर सर्वसामान्यांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल अशी व्यवस्था करणे म्हणजेच पर्यटन होय. जगभरातले अनेक देश आता डिझेल पेट्रोलच्या मोहोजाळातून बाहेर पडून जगभरातून गोड पाणी, माती आणि शेण विकत घेऊन आपल्या विराण रेती मध्ये गाडलेल्या देशाचा चेहरा बदलू पाहत आहेत. एकूण बजेट मधल्या अब्जोवती रुपयांचा जुगार खेळत जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ कृत्रिमरीत्या उभी करत आहेत. बघता बघता दुबई, तुर्कस्तान, अबुधाबी सारख्या देशांचा आर्थिक गाडा देखील ही नवी व्यवस्था सांभाळू लागली आहे. तर दुसरीकडे एकट्या पर्यटनाच्या जीवावर आणि सधन शेतीच्या जीवावर भारत जगावर राज्य करू शकतो हे त्रिकालाबाधित सत्य असूनही आजही या दोन्ही गोष्टी भारतात असून अडचण नसून खोळंबा ठरलेल्या आहेत. नव्या रोड मॅप मध्ये हा समज दूर करण्याचे सामर्थ्य उभे करणे हे पहिले काम आहे.
सुमारे एक लाख कोटी गुंतवणूक करून पुढील दहा वर्षासाठीचा हा रोड मॅप उभा राहील. त्यात सागरी किनाऱ्यांचे, खाडी किनाऱ्यांचे, नदी आणि आकाराने महाकाळ असलेली सरोवरे यांमध्ये क्रूज आणि हाऊस बोट प्रकल्प गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, गोवा या धर्तीवर उभे करण्याचा मानस व्यक्त झालाय. त्यासाठी सर्वाधिक उपलब्ध असलेल्या कोकण किनारपट्टीत गुजरातच्या सीमेपासून गोव्याच्या सीमेपर्यंत ठीक ठिकाणी जेट्टी उभे करणे, भरगच्च गर्दीच्या मुंबईसारख्या शहरी पर्यटनासाठी सुविधा मंडळ तयार करणे, या पर्यटन व्यवस्थेच्या सार्वजनिक संरक्षणासाठी पर्यटन दल तयार करणे आधी गोष्टींचा या गोषवाऱ्यात समावेश आहे.
सुमारे 18 लाख लोकांना थेट रोजगार मिळवून देऊ शकेल, अशी ही पर्यटन इंडस्ट्रीज उभी राहताना स्थानिकांच्या उरावर त्यांच्या धंद्या पाण्यावर, त्यांच्या पारंपारिक जीवन पद्धतीचा विस्फोट करून उभी राहते खरी. कोकण रेल्वे आली स्वप्ने साकार झाली, असं घोषवाक्य खूप गाजलं. मात्र प्रत्यक्षात कोकणी माणसाला या कोकणी रेल्वेचा भविष्यासाठी किती उपयोग झाला याचा सर्वे केला तर जे हाती सापडेल तेच या नव्या पर्यटन धोरणात होऊ नये, यासाठी सर्वप्रथम या पर्यटन रोड मॅप चा कणा आणि पाया हा कोकणी माणसाच्या किंवा ठिकठिकाणीच्या स्थानिक नागरिकाच्या प्रथम मालकीचा असावा, अशी कायदेशीर तजविज या धोरणात आली तर आणि तरच या कोकणच्या कॅलिफोर्नियाचा कोकणच्या लाल मातीला काहीतरी उपयोग होईल. जी कोकण किनारपट्टीची परिस्थिती तीच उभ्या महाराष्ट्राची आज संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक पर्यटन क्षेत्रात स्थानिक भूमिपुत्र हा केवळ करवंद, जांभळं, ताक आणि रस्त्यावरची फळ वस्तू विकण्या पुरता मर्यादित राहिला आहे. एकाद दुसऱ्या ठिकाणी रिक्षावाल्यांची मनोपोली सोडली तर रगड पैसा कमावणारी अवघी हॉटेल इंडस्ट्रीज, वाहतूक इंडस्ट्रीज, खाद्य संस्कृती ही परप्रांतीयांच्या आणि पुंजीपतींच्या ताब्यात आहे. जर इतकी मोठी पर्यटन संस्कृती उभी राहणार असेल आणि त्यात स्थानिक माणसाच पद वाचमेन आणि वेटरच्या पलीकडे गेली नाही तर उद्या येणाऱ्या पिढ्या या पुरोगामी महाराष्ट्राला फक्त शिव्या आणि शाप देतील, याचेही भान हा आराखडा रेखाटला जाताना प्रत्येक सरकारी बाबूच्या आणि सत्ताधारी जबाबदार लोकप्रतिनिधींच्या ध्यानात असायला हवा.