CRIME BORDER | 04 March 2026 | 02:28 PM
ठाणे : - होळी करा लहान पोळी करा दान या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा कल्याण (जिल्हा ठाणे) यांच्या वतीने कल्याण शहरातील विविध सोसायट्यांच्या सहकार्याने एक अभिनव व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
होळीका दहनाच्या वेळी नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात येणाऱ्या पुरणपोळ्या जाळण्याऐवजी त्या होळीला नैवेद्य दाखवून बाजूला काढण्यात आल्या. त्यानंतर या सर्व पुरणपोळ्या एकत्र करून फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण शेजारील झोपडपट्टी परिसरातील गरजू बंधू-भगिनींना वाटप करण्यात आल्या.
नैवेद्याच्या पुरणपोळ्या तयार करण्यामागे शेतकरी व कष्टकरी बांधवांचे मोठे परिश्रम असतात. त्यामुळे अन्न वाया न घालवता ते गरजूंना देणे अधिक योग्य असल्याचा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी होळी लहान स्वरूपात साजरी करणे, पाण्याचा कमीत कमी वापर करणे तसेच पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या उपक्रमात कल्याण पूर्व भागातील राकेश अपार्टमेंट, विघ्नहर्ता कॉलनी, शिवसमर्थ कॉलनी, आई गावदेवी कॉलनी, ज्योतिर्लिंग सोसायटी, गुरुदत्त अपार्टमेंट, कल्पतरू कॉलनी, नूतन ज्ञान मंदिर शाळा परिसर, शिवाजी महाराज नगर (वालधुनी) तसेच कल्याण पश्चिम भागातील रामबाग लेन क्र. ६ येथील सोसायट्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत, जिल्हा प्रधान सचिव राजेश देवरुखकर, सोशल मीडिया प्रमुख नितीन वानखेडे, महिला विभाग कार्यवाह प्रज्ञा चव्हाण, कल्याण शाखा सदस्य संजय त्रिभुवन, ॲड. विनोद जगताप, संतोष मात्रे तसेच विविध सोसायट्यांचे सदस्य उपस्थित होते.