CRIME BORDER | 04 March 2026 | 05:49 PM
ठाणे : - ग्रामीण भागात स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक व शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे मार्फत बचत गटातील महिलांचे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
प्रशिक्षणाची सुरुवात दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली असून ते दि. १७ मार्च २०२६ पर्यंत एकूण २१ बॅचमध्ये राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४२६ ग्रामपंचायतींमधून प्रत्येकी ३ बचत गटातील महिलांची निवड करण्यात आली असून एकूण १ हजार २७८ महिला प्रशिक्षणात सहभागी होत आहेत.
या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश म्हणजे स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतर्गत निर्माण करण्यात आलेली उपांगे शाश्वत व कार्यक्षम राहावीत यासाठी ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत वर्तणूक बदल घडवून आणणे हा आहे. कचऱ्याचे स्त्रोत पातळीवर विलगीकरण, सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व, घनकचरा व्यवस्थापन, तसेच समुदायामध्ये जनजागृती कशी करावी याबाबत प्रशिक्षणाद्वारे महिलांची क्षमता बांधणी करण्यात येत आहे.
राज्य स्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या AFC India Limited या संस्थेमार्फत जिल्हा परिषद ठाणे यांच्या समन्वयाने हे प्रशिक्षण क्लस्टर स्तरावर घेतले जात आहे. राज्य शासनाने निश्चित केलेल्या कॅलेंडरनुसार प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले असून तालुकानिहाय बचत गटातील महिलांनी संबंधित सत्रात उपस्थित राहणे अपेक्षित आहे.
तालुकास्तरावर गट विकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून तर विस्तार अधिकारी (पंचायत) सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच गट/समूह समन्वयक व पाणी व स्वच्छता व्यवस्थापन सल्लागार यांनी प्रशिक्षण सत्रांना नियमित भेटी देऊन उपस्थिती व प्रशिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत उभारण्यात आलेल्या सुविधांचा दीर्घकालीन व प्रभावी वापर होण्यासाठी ग्रामस्थांच्या वर्तणुकीत बदल होणे अत्यावश्यक आहे. बचत गटातील महिला या गावपातळीवरील परिवर्तनाच्या प्रमुख घटक आहेत. त्यांच्या माध्यमातून कचरा विलगीकरण, स्वच्छता व आरोग्यदायी सवयींचा प्रसार अधिक प्रभावीपणे होऊ शकतो. हे प्रशिक्षण केवळ माहितीपुरते मर्यादित नसून गावोगावी स्वच्छतेची चळवळ बळकट करण्याचे माध्यम ठरेल. सर्व संबंधितांनी समन्वयातून प्रशिक्षण यशस्वी करून स्वच्छ व निरोगी ठाणे जिल्हा घडविण्यास हातभार लावावा.” - उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) पंडित राठोड
या उपक्रमामुळे ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जागरूकता वाढून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या सुविधा शाश्वत व कार्यक्षम राहण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.