CRIME BORDER | 04 March 2026 | 06:09 PM
ठाणे : - ग्रामीण पाणी पुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत, सक्षम व लोकसहभागावर आधारित करण्याच्या उद्देशाने दि. ८ ते २२ मार्च या कालावधीत जिल्ह्यात ‘जल महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नदी उत्सव’च्या धर्तीवर ‘जल उत्सव’ साजरा करण्याची परंपरा विकसित करण्यावर भर दिला होता. त्यानुसार राष्ट्रीय पेयजल विभाग, केंद्र शासन व NITI Aayog यांच्या सहकार्याने २०२४ मध्ये देशातील २० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जल उत्सव राबविण्यात आला होता. त्यास मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर यंदा हा महोत्सव देशभर आयोजित करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशन या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या योजनांचे उन्नतीकरण करून स्टँड पोस्ट नळ पाणीपुरवठा योजना तसेच दरडोई किमान ४० लिटर प्रतिदिन पूर्ण झालेल्या योजनांना ५५ लिटर प्रतिदिन क्षमतेनुसार सुधारित करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या, अनुदानित आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांना नळजोडणी सुविधा देण्यात येत असून, एकाकी व आदिवासी वाडी-पाड्यांसाठी सौरऊर्जा आधारित नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.
तीन स्तरांवर आयोजन
‘जल महोत्सव’ राष्ट्रीय, राज्य आणि ग्राम अशा तीन स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. ग्राम व पंचायत समिती स्तरावर ‘लोकजल उत्सव’ साजरा करण्यात येईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल.
ग्रामसभा व पाणी समितीमार्फत गावपातळीवर पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत –
• जलस्रोतांचे संरक्षण व पुनरुज्जीवन
• पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतर
• सामुदायिक जल शपथ
• ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाणी विषयाचा समावेश
• महिलांकडून फिल्ड टेस्टिंग किटद्वारे जल गुणवत्ता तपासणी
• सार्वजनिक स्वच्छता व जलसंवर्धनाबाबत जनजागृती
लोकप्रतिनिधी, नागरिक, महिला बचत गट व युवक मंडळांच्या सहभागातून गावातील जलस्रोतांची स्वच्छता व देखभाल केली जाणार आहे.
‘जल महोत्सव’ यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषद ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित विभाग, पाणी समित्या व स्थानिक संस्था यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
“‘जल महोत्सव’ हा केवळ उत्सव नसून ग्रामीण पाणी व्यवस्थापन अधिक शाश्वत व लोकसहभागावर आधारित करण्याचा एक प्रभावी उपक्रम आहे. जलस्रोतांचे संवर्धन, पाणी बचत, गुणवत्ता तपासणी आणि सामुदायिक जबाबदारी यावर भर देऊन ‘जल महोत्सव’च्या माध्यमातून प्रत्येक गावात जलजागृतीची चळवळ उभी राहील. ग्रामसभा, पाणी समित्या, महिला बचत गट व युवकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.” - उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) पंडित राठोड व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता प्रकाश सासे
या उपक्रमातून ग्रामीण भागात पाण्याबाबत जागरूकता वाढून जलस्रोतांचे संवर्धन, शाश्वत पाणीपुरवठा व लोकसहभाग अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.