CRIME BORDER | 12 March 2026 | 02:28 PM
डोंबिवली : देशातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच UPSCच्या परीक्षेत डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वखरे यांचे सुपुत्र कु.शिवम वखरे यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांची आय.पी.एस / आय.आर.एस पदासाठी निवड होऊ शकते . या उल्लेखनीय यशामुळे जळगाव व डोंबिवलीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. कु. शिवम यांचे प्रशिक्षण लवकरच उत्तराखंडमधील मसुरी येथे सुरू होणार आहे.
कु . शिवम यांनी अथक मेहनत, जिद्द आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवत आपल्या कुटुंबाचे तसेच डोंबिवली शहराचे व आपले मूळ गांव बेटावद बुद्रुकचे नाव उज्ज्वल केले आहे. हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.
कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे यांचे मूळ गाव बेटावद बुद्रुक असले तरी त्यांचे संपूर्ण बालपण व शिक्षण डोंबिवली, कल्याण मध्ये गेले.
घरातील शैक्षणिक व सामाजिक वातावरण असल्याने त्यांना शिक्षणाची व समाजकार्याची आवड शालेय व कॉलेज जीवनामध्येच लागली होती .
पदवीच्या निकालानंतर त्यांनी जोमाने खडतर अशा UPSC यूपीएससीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठत तिथे अभ्यासाचे धडे गिरवले. तिथे सव्वा वर्ष राहून आल्यावर घरूनच अभ्यास केला.
पहिल्या २०२३ च्या प्रयत्नात त्यांनी प्रीलियम व मेन्स पर्यंत पल्ला गाठला पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही .दुसऱ्या प्रयत्नात २०२४ मध्ये त्यांनी मुलाखतीपर्यंत मजल मारली तिथे मात्र त्यांना १४ मार्काने अपयश आले परंतु त्यांनी खचून न जाता स्वतःसह आई-वडिल व लहान भावाचे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि तिसऱ्या प्रयत्नात २०२५ मध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घेत संघ लोकसेवा आयोगाच्या UPSC (यु .पी .एस .सी ) च्या परीक्षेत ६५१ रँक मिळवून यश संपादन केले.
कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे यांनी डोंबिवली शहराच्या व बेटावद बुद्रुक आपल्या मूळ गावाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला.
या अद्वितीय यशासाठी शिवम व त्यांच्या आई-वडिलांचे, गुरुजनांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!