CRIME BORDER | 28 May 2026 | 09:49 AM
ठाणे :- जिल्हा परिषद, ठाणे) : राज्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असून पेरणीपूर्व काळात रासायनिक खतांची मागणी वाढत आहे. विशेषतः डीएपी (Di-Ammonium Phosphate) खताला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र राज्यात डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी बांधवांनी डीएपी खतावर पूर्णपणे अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
मागील तीन वर्षांत राज्यात खरीप हंगामादरम्यान सुमारे ४४ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाला असून त्यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते आणि एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) खतांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य हे मृदा परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांवर आधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीच्या वापरात अग्रेसर राज्य मानले जाते.
डीएपी खतामध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्ये असतात. मात्र डीएपी खताचा पुरवठा मर्यादित असल्याने पर्यायी स्फुरदयुक्त खतांचा वापर करणे आवश्यक ठरत आहे. कृषी विभागाने एसएसपी (Single Super Phosphate) खताचा वापर प्रभावी पर्याय म्हणून सुचविला आहे. एसएसपी हे देशांतर्गत उत्पादित खत असून त्यामध्ये १६ टक्के स्फुरदासोबत सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध असतात. विशेषतः तेलबिया पिकांसाठी सल्फरयुक्त एसएसपी खत फायदेशीर ठरते.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोण्या एसएसपी खताचा वापर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16, एनपीके-15:15:15 तसेच युरिया-एसएसपी कॉम्प्लेक्स या संयुक्त खतांच्या वापरामुळे पिकांना नत्र, स्फुरद आणि पालाश ही तिन्ही प्रमुख अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात उपलब्ध होतात.
याशिवाय टिएसपी (Triple Super Phosphate) खतामध्ये ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्य उपलब्ध असून, डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया व एक गोणी टिएसपी खताचा वापर केल्यास तोही डीएपीस प्रभावी पर्याय ठरतो, असे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मृदा परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संतुलित खत वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते तसेच उत्पादन खर्च कमी करून पिकांचे उत्पादन वाढविण्यासही फायदा होतो.
“शेतकरी बांधवांनी केवळ डीएपी खतावर अवलंबून न राहता कृषी विभागाने सुचविलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा. मृदा परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन केल्यास पिकांचे उत्पादन आणि जमिनीची गुणवत्ता दोन्ही टिकून राहण्यास मदत होते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा सुरळीत पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग सातत्याने कार्यरत आहे,” असे कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी सांगितले.
कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतुलित खत वापराबाबत जनजागृती करण्यात येत असून, अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.