CRIME BORDER | 08 June 2026 | 11:40 AM
नाशिक विभागीय संपादक : डॉ. शशिकांत काळे
जळगाव :- बी. दि .चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ वितरण सोहळा रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी साई पालखी निवारा, शिर्डी येथे मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला. या राज्यस्तरीय सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील गुणवंत, कर्तव्यनिष्ठ आणि समाजाभिमुख शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी विद्यालय, सिंदखेड (लपाली ) ता. मोताळा जि. बुलडाणा येथील शिक्षक अविनाश पाटील (सर ) यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले. अविनाश पाटील (सर ) हे मूळचे बेटावद बुद्रुक, ता. जामनेर, जि. जळगाव येथील रहिवासी आहेत.
शिक्षक हे समाजाची भावी पिढी घडविणारे खरे शिल्पकार असून त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव व्हावा या उद्देशाने बी. दि. चेंज फाउंडेशनतर्फे दरवर्षी या राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा हा प्रेरणादायी आणि मानाचा सोहळा अध्यात्मिक नगरी शिर्डी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर दिनकर पवार, माजी सैनिक अधिकारी अरुण भंडारे, अभिनेत्री निवेदिता पगार, बाबासाहेब कापे, प्रकाश कोळपे, निलेश घोडेचोर तसेच अमृत रोहोम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे, सचिव रचना ढोकचौळे आणि विश्वस्त अभिषेक तुपे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच आदर्श विद्यार्थी घडविल्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले. बी .दि. चेंज फाउंडेशनने मागील दोन वर्षांत राज्यातील १००० हून अधिक शिक्षकांचा या पुरस्काराद्वारे सन्मान केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अविनाश पाटील (सर ) यांना प्राप्त झालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.