CRIME BORDER | 22 June 2026 | 03:35 PM
कल्याण :- येथील पूर्व परिसरात एक संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६० ते ६२ वयोगटातील दोन वृद्धांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. अत्याचारादरम्यान पीडितेने हिंमत दाखवून मदतीसाठी आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परतेने कारवाई करत पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि अख्तर व सलीम या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अख्तर हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करतो, तर सलीम हा रिक्षाचालक आहे. मणियारने अख्तरने घेतलेल्या एका खोलीत या दोघांनी पीडित मुलीला फूस लावून नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातील असून, ती प्लास्टिक कचरा आणि भंगार वेचून आपला उदरनिर्वाह करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या अमानुष घटनेची माहिती मिळताच कल्याण परिसरासह राजकीय वर्तुळातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आमदार सुलभा गायकवाड यांनी तातडीने सहायक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांची भेट घेऊन आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. दुसरीकडे, शिंदेसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड आणि उद्धवसेनेचे युवासेना शहर अधिकारी अॅड. नीरज कुमार यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून, समाजाला काळिमा फासणाऱ्या या नराधमांना थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी केली आहे. kdmcnews