CRIME BORDER | 22 June 2026 | 04:24 PM
कल्याण पश्चिमेकडील आंबिवली परिसरात असलेल्या त्रिवेणी क्राउन हाऊसिंग सोसायटीमध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठवडाभरात सोसायटीतील २५ ते ३० रहिवाशांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. बाधितांमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या असून, काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर, सोसायटी प्रशासन आणि रहिवाशांनी एका रहिवाशावर मुख्य जलवाहिनीमध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप केल्याचा आरोप करत खडकपाडा पोलीस स्टेशन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की, हा केवळ नियमांचा भंग नसून शेकडो लोकांच्या जीवनाशी आणि आरोग्याशी खेळण्याचा गंभीर प्रकार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिवेणी क्राउन सोसायटीमध्ये एकूण १७६ फ्लॅट्स असून दीडशेहून अधिक कुटुंबे राहतात. गेल्या सात ते आठ दिवसांत अनेक घरांतून उलट्या, जुलाब आणि पोटाच्या तक्रारी आल्यानंतर, सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने पाणीपुरवठा यंत्रणेची सविस्तर तपासणी केली. या तपासणीदरम्यान, एका रहिवाशाने मुख्य जलवाहिनीला बेकायदेशीरपणे नळ जोडून तो आपल्या वैयक्तिक टाकीशी जोडल्याचे उघड झाले. सोसायटी प्रशासनाचा असा दावा आहे की, या टाकीमध्ये बोअरवेलचे पाणी साठवले जात होते आणि तेच पाणी पिण्याच्या मुख्य पाण्याच्या लाईनमध्ये मिसळले जात होते. प्रशासनाच्या मते, या बेकायदेशीर जोडणीमुळे संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये दूषित पाणी पुरवले गेले, ज्यामुळे डझनभर रहिवाशांचे आरोग्य बिघडले.
बाधित रहिवाशांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांपासून अनेक कुटुंबे आजाराने त्रस्त आहेत, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. काहींना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, तर अनेक कुटुंबांनी खबरदारीचा उपाय म्हणून बाटलीबंद पाणी वापरण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी सोसायटीने खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार नोंदवली आहे. याशिवाय केडीएमसीच्या पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाकडेही तक्रार सादर करण्यात आली असून, दूषित पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तक्रारीत संबंधित रहिवाशावर बेकायदेशीर पाईपलाईन जोडणे, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणे आणि सोसायटीतील रहिवाशांच्या जीवाशी खेळणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर