CRIME BORDER | 06 July 2026 | 01:15 PM
"आई मला नाही जमणार हं साडी नेसून यायला तुमच्या सोबत,खरंतर मला ना यायचंच नाही ए तुमच्या ह्या अश्या भजनाला वगैरे,अहो तुमच्या सारखा नाही आता आमचा काळ, आम्ही जरा वेगळ्या स्त्रीया आहोत,.. पण तुम्ही फारच आग्रह करता म्हणून येते पण मला तुमची कपड्यांची अट नको आहे हं,.." लॅपटॉप मधून आपलं डोकं बाहेर काढत तन्वीने सांगितलं,..तसं सासूबाईंनी फुलांची परडी बाजूला ठेवली म्हणाल्या ,"अग तन्वी अग कधीतरी हा असा पारंपरिक आनंद घेऊन बघा,आम्ही नाहीच अडकवत तुम्हाला हातभार बांगड्या आणि अंगभर साड्यात कारण ह्या सगळ्यांच्या फार पुढे निघून गेलेले तुमचे विचार तुमच्या आया नाही पेलू शकत तर आम्ही सासवा काय लादणार तुम्हाला?पण मला वाटतं बदला सोबत जुनंही जोपासता आलं तर बघा अग फार सुंदर असतं हे फुलांच्या सुगंध मनभर घेऊन प्रसन्नपणे संसारात फुलून जाणं, आनंदाने सणवार स्वीकारून आपल्या लोकांसाठी करणं,चार बायका बोलवून घसघशीत ओटी भरून तिला काही देणं,असं खुप काही जे आयुष्याला प्रसन्न अगदी घवघवीत करतं."त्यांच वाक्य तोडत तन्वी म्हणाली,"आणि बायकांना अडकवून टाकतं मोलकरीण बनवून टाकतं."तिच्या या वाक्यावर सासूबाईंनी दीर्घ उसासा सोडला,"वाद नाही घालणार मी तुझ्याशी पण मला वाटतं स्त्री हे चैतन्य आहे घराचं तिच्या असण्याने जे जग सुंदर होतं ते कोणामुळेच नाही मग तिने ते जपावं म्हणजे प्रगतीकडे जाणं सोडावं असं नाही म्हणणार मी पण कधीतरी तिने त्या काचेच्या किणकिण वाजणाऱ्या बांगड्यातून कधी मऊ स्पर्श देणाऱ्या पदरातून कधी मोहरून टाकणाऱ्या गजऱ्यातून तर कधी घसघशीत ओटीतून,घवघवीत हळदी कुंकवातून जपावं हरवत चाललेलं स्त्रीपण जे सगळ्यांच्या जगण्यात घवघवीतपणा आणतं,"
तन्वीने परत लॅपटॉपमधून डोकं बाहेर काढलं,.."आई अहो काय घवघवीत,घसघशीत नुसते शब्द आहेत बायकांना अडकवणारे,..चला आवरा तुम्ही मी तर अशीच येणार आहे म्हणत तिने परत लॅपटॉपमध्ये मान घातली,.."
सासूबाईंनी परडी उचलली,काही उमलू बघणाऱ्या जाईच्या कळ्या जरा हिरमुसल्या असतील सूनबाईचा गजरा होता नाही आलं म्हणून असं उगीच त्यांच्या मनात आलं आणि त्या हसल्या,..त्यांच्याकडे बघणाऱ्या त्यांच्या मुलाच्या हे लक्षात आलं,तो आई सोबत आतल्या खोलीत जात म्हणाला,"तिचा राग आला का तुला,..आणि तरी तू हसत का होतीस फुलांकडे बघून..?"
आई म्हणाली," मी त्याकाळची इंजिनिअरिंग केलेली बाई पण मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेले आवडलं होतं जगणं प्रसन्न करायला हे जुनं हाताशी पकडून ठेवलं होतं म्हणून कधी निराश वाटलं नाही,सणवार,कुळाचार हे सतत ऊर्जा देत होते,..स्वातंत्र्य नव्यातलं शोधलं तरी जुन्यातलं जोपासून होतं. असो जाऊ दे तिची नोकरी,पद कदाचित तिला हे स्वीकारू देत नसेल पण निदान माझ्यासोबत येते तरी म्हंटली हेच खुप अरे माझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणी जमणार आहेत भजनाला ती मीना मावशी आठवते ना ती वर्ष झालं शहरात येऊन तिच्या सुनेला आणि तिला हौस आहे मग बोलवलं आहे सगळ्यांना."
दोघी निघाल्या भजनाच्या ठिकाणी दरवाज्यात सुंदर फुलांचा गालिचा काढला होता,मंद कापुराचा गंध येत होता,..तांब्याच्या घंगाळात प्रत्येक स्त्रीचे पाय धुवून त्यावर कुंकवाने स्वस्तिक रेखाटून,हाताला अत्तर आणि दाट मोगऱ्याचा गजरा पिनेसहित देऊन मिनाची सुन प्रत्येकाला आतल्या खोलीत पाठवत होती,तन्वीला जरा खजिल झाल्यासारखं झालं,सगळ्या बायका मस्त आवरून सुंदर साड्या घालुन आल्या होत्या पण ते चेहऱ्यावर न दाखवता ती मुद्दाम शेजारच्या परिचित मैत्रिणीला म्हणाली,"आजकाल वर्कलोड एवढा असतो ना की आपण नाही अग हे ट्रॅडिशनल जगू शकत ह्या बायकांची गोष्ट वेगळी आहे,.नेहमी घरी असतात मग त्या करू शकतात असले इव्हेंट,..ती मैत्रीण म्हणाली,"अग आपण नाही केलं तरी कोणी करत असेल तरी मला उत्साह येतो बाई,"
तिच्या उत्तरावर तन्वी गप्प बसली,तसं फारसं कोणी परिचित नव्हतं तिला इथे,ह्या घरी ती पहिल्यांदाच आली होती,पाय नका धुवून देऊ हो ह्या तिच्या वाक्यावर मीना मावशी म्हणाली,"सेवाभाव जागृत होतो मनात म्हणून करू दे ग आम्हाला हे काम."दोन तीन बायका झाल्या तन्वी चौरंगावर बसली,मिनामावशीची सुन सुंदर साडी नेसलेली होती,केस छोटेच असले तरी त्याला हौशीने गजरा सजला होता,..वातवरण अगदी प्रसन्न वाटलं तन्वीला,..अत्तर लावून गजरा देताना मिनामावशीची सुन तन्वीला दिसली आणि तन्वीला आश्चर्य वाटलं,जी बाई आपण सतत जीन्स ब्लेझर मध्ये बघतो,जी आपल्या एवढ्या मोठया कम्पनीची मॅनेजर आहे ती स्त्री आज अशी आपले पाय धुत आहे आणि आपल्याला गजरा देत आहे,..तन्वीच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मॅनेजर म्हंटल्या,"ओ हाय तन्वी,हाऊ आर यु..?"तन्वी म्हणाली,"मॅडम तुम्ही इथे?"
तन्वी नुसती बघत होती त्यांच्या लक्षात आलं सगळं,त्या तिला म्हणाल्या,"अग ह्या माझ्या सासुबाई,कधीतरी त्यांचा आनंद मलाही वाटून घ्यावा वाटतो,प्रसन्न,चैतन्य,घवघवीत वाटणारं त्यांनी अनुभवलेलं आयुष्य आपणही बघावं जगुन कधीतरी खरंच शांतता मिळते,..बरं हा घे गजरा,..अरे हो तू जीन्सवर कसा लावणार ना असू दे म्हणत ती पुढचे पाय धुण्यासाठी वाकली..
हॉलमध्ये मस्त समई सजली होती ,समोर देवी सरस्वतीचा फोटो होता,..शांत ,स्थिर हंसावर बसलेली,..एक दोन सुंदर प्रार्थना झाल्या,.."हे हंस वाहिनी ज्ञान दायिनी अंबविमल मती दे.."हि प्रार्थना ऐकताना तन्वीच्या सासूबाईंचं लक्ष बॉस कडे गेलं,..तल्लीन होऊन ती प्रार्थना आळवीत होती..खरंच तिला ती मती मिळाली होती.
निघताना ओटी भरताना बॉसने मोठा रुमाल तन्वीला दिला म्हणाली,"ओटी ह्यात घे ग घसघशीत ओटी भरावी,देण्याची बुद्धी शिकवते ओटी आपल्याला,..आणि हे सगळं केलं की कसं घवघवीत वाटतं ना."बॉसच असं म्हणताना पाहून तन्वीने मान डोलवली.
मनात त्या प्रार्थना,तो मोगऱ्याचा, कापुराचा गंध,ती बांगड्यांची किणकिण,त्या सुंदर साड्या,ती सरस्वती,तो पांढरा शुभ्र हंस आणि ती प्रार्थना..ते सगळं घवघवीत वातावरण मनाला ऊर्जा देत होतं,तिने पटकन सासूबाईंनी विचारलं आपला भजनाचा कार्यक्रम कधी ठेवायचा आई,..आई म्हणाल्या,"अग तुला वेळ नाही मग कशाला..?"
ती हसून म्हणाली," घवघवीतपणा अनुभवायला."