CRIME BORDER | 20 August 2026 | 09:58 AM
सुरेश कोळी । भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
भुसावळ :- तालुक्यातील तळवेल येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आठवडाभराच्या कालावधीतच तालुक्यातील जोगलखेडा येथे साडेचार वर्षीय बालिकेला आमिष दाखवून घरात तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ( दि. १८ ) समोर आली. या प्रकरणी धनराज (वय ६५, रा. जोगलखेडा) याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अपहरण व विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून या घटनेचा पोलीसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलीसांत दाखल तक्रारीनुसार भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा येथील साडेचार वर्षीय बालिका सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत होती. यावेळी धनराज हा तिच्याशी बोलताना दिसून आला. मात्र, काही वेळाने अंगणात खेळत असलेली बालिका दिसत नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात येताच बालीकेच्या आईने तिचा परिसरात शोध व विचारपुस करण्यास सुरूवात केली . यावेळी परिसरातीलच दुकानदार यांनी बालिकेला संशयितासोबत दुसऱ्या गावाच्या दिशेने जाताना पाहिल्याचे सांगितले.
त्यानंतर संशयिताच्या घरी जाऊन पाहणी केली असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याने संशय बळावला. यावेळी आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने त्यांनी संशयीताच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.
यानंतर संशयिताचा नातेवाईक घटनास्थळी आल्याने त्याच्या सांगण्यावरून घराचा दरवाजा उघडण्यात आला. यावेळी घरातील अंधाऱ्याच्या कोपऱ्यात घाबरलेल्या अवस्थेत बालिका आढळून आल्याने स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे बालिकेची सुटका करून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. तर कुटुंबीयांनी बालिकेकडून माहिती घेतल्यानंतर संशयिताने तिला घरात नेऊन दरवाजा बंद केल्याचे समोर आले. यानंतर कुटुंबीयांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन या प्रकरणी धनराज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर या गंभीर प्रकरणाचा पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांकडून पुढील तपास सुरू असुन आठवडाभराच्या कालावधीत तालुक्यातीलच तळवेल येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जोगलखेडा येथे झालेल्या या घटनेने तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली असून सुज्ञ नागरीकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे .