CRIME BORDER | 20 August 2026 | 12:58 PM
कोलकाता शहरातील 'न्यू मार्केट' परिसरात दुर्गा पूजेसाठी नवीन कपडे खरेदी केल्यानंतर अवघ्या सात तासांतच, लॉजला लागलेल्या आगीत कुटुंबातील चौघांचा करुण अंत झाला.
कोलकाता : बांगलादेशातील कुश्तियाचे रहिवासी असलेल्या देवाशीष दत्ता यांच्यासाठी मंगळवारची संध्याकाळ आनंदाची होती; कारण भारत दौऱ्यावर असताना ते कुटुंबीयांसोबत पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील 'न्यू मार्केट' परिसरात दुर्गा पूजेसाठी नवीन कपडे खरेदी करत होते. या खरेदीनंतर अवघ्या सात तासांतच, म्हणजे बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत कुटुंबातील चौघांचा करुण अंत झाला.
कोलकात्याच्या 'फ्री स्कूल स्ट्रीट'वर शिखा इन लॉजमधून चौघांच्याही बॉडी बाहेर काढण्यात आल्या. देवाशीष यांच्यासह पत्नी अफसाना, त्यांचा तीन वर्षांचा धाकटा मुलगा स्वर्णशीष आणि अफसानाचे वडील अक्रम अली यांचा मृत्यू झाला.
सासऱ्यांच्या उपचारासाठी भारतात
देवाशीष हे बांगलादेशातील एक दैनिक आणि टीव्ही वाहिनीवर पत्रकार म्हणून कार्यरत होते. सासऱ्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी ते आपल्या कुटुंबासह भारतात आले होते. कोलकात्यातील नारायण हॉस्पिटलमध्ये आपल्या सासऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांनी बुधवारी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती.
लेकीला आई वडिलांकडे ठेवून निघाले
देवाशीष यांचे नातेवाईक आणि मालदा येथील रहिवासी कृष्ण नंदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफसाना आणि स्वर्णशीष यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी हे कुटुंब ४ ऑगस्ट रोजी बंगळुरुला गेले होते. त्यांनी आपली १० वर्षांची मोठी मुलगी देबोलिना हिला कुश्तियामध्येच तिचे आजी-आजोबा - दिलीप आणि स्वप्ना दत्ता यांच्याकडे ठेवले होते. सोमवारी हे कुटुंब कोलकात्यात पोहोचले आणि त्यांनी 'शिखा इन' या लॉजमध्ये मुक्काम केला.
रात्री फोनवर कुटुंबाशी गप्पा
"खरेदीवरुन परत आल्यानंतर रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास देवाशीषने त्याचे आई-वडील आणि मुलीशी फोनवर गप्पा मारल्या होत्या. त्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला, यावर माझा विश्वासच बसत नाही. त्याच्या वृद्ध आई-वडिलांचे किंवा त्या लहान मुलीचे सांत्वन कसे करायचे?" असा प्रश्न पडल्याचं कृष्णा म्हणाले. त्यांना पोलीस शवगृहात बॉडीची ओळख पटवण्यासाठी कोलकात्याला बोलावण्यात आले होते.
चुलत बहिणीला शोक अनावर
देवाशीषची चुलत बहीण संपा घोष यांच्यावर तर याहूनही मोठे दुःख ओढवले आहे. "येत्या एक-दोन दिवसांत ते आमच्या बिराती येथील घरी येणार होते. स्वर्णाशीषला पहिला घास भरवण्यासाठी मी कितीतरी बेत आखले होते. आणि आता... आम्हाला सीमेपार चार शवपेट्या पाठवाव्या लागणार आहेत." असं त्या म्हणाल्या. बांगलादेशचे अधिकारी सीमेवरुन या शवपेट्या कुश्तिया येथे नेतील, असे संपा यांनी सांगितले.
बांगलादेशातील एका दैनिकाचे पत्रकार तौहिदी हसन यांनाही आपल्या मित्राचा जीव अशा प्रकारे गेला, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे सांगितले. "देवाशीष आणि अफसाना यांच्या लग्नाचे आयोजन करणाऱ्यांपैकी मी एक होतो. आपल्या भारत भेटीबद्दल ते दोघेही खूप उत्साही होते. आणि आता... मी देबोलीनाला काय सांगू?" असे हसन यांनी बांगलादेशातून 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितले.
SABHAR - Authored by: अनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम