CRIME BORDER | 07 October 2026 | 04:00 PM
डोंबिवली : - समाजोपयोगी विविध प्रकल्पांसाठी निधी संकलित करण्यासह गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स यांच्या वतीने १० आणि ११ ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजसेवा प्रकल्पांसाठी निधी संकलित करण्याच्या उद्देशाने ‘संक्रमण’ हस्तनिर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या आकर्षक आणि अनोख्या हस्तनिर्मित वस्तू उपलब्ध असतील. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन उद्देशपूर्ण खरेदी करावी आणि समाजसेवेच्या उपक्रमांना हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याचबरोबर पितृपक्षानिमित्त अन्नदानाचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. गरजू आणि अनाथ कुटुंबांना अन्नधान्याचा आधार मिळावा, या उद्देशाने नागरिकांकडून पॅकबंद स्वरूपात गहू, तांदूळ आणि डाळ यांची देणगी स्वीकारण्यात येणार आहे.
दोन्ही उपक्रम शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ आणि रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत ब्राह्मण सभा हॉल, डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आले आहेत.
“आपली छोटीशी मदत गरजू कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते,” या भावनेतून डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.