CRIME BORDER | 15 October 2026 | 10:48 AM
डोंबिवली :- पितृपक्षाचे औचित्य साधत समाजसेवेचा वसा पुढे नेण्यासाठी 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स'च्या वतीने १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष ‘अन्नदान मोहीम’ राबवली गेली.
या उपक्रमाला क्लबचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या माध्यमातून २०० किलोहून अधिक अन्नधान्य आणि ऐच्छिक आर्थिक निधी गोळा करण्यात आला.
गोळा झालेले धान्य आणि आर्थिक मदत ११ ऑक्टोबर रोजी रोटेरियन कुंदन नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जाणाऱ्या उल्हासनगर येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुपूर्द करण्यात आली. या मदतीमुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या दैनंदिन आहाराची सोय होण्यास मोठा हातभार लागणार आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना आयोजकांनी सांगितले की, "पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करत समाजातील गरजूंना थेट मदत करणे आणि त्यांच्याप्रती संवेदनशीलता दाखवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता." या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्व देणगीदार आणि नागरिकांचे क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सीए उज्ज्वल प्रकाश ठोंबरे यांनी क्लबच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.