CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

स्त्रीने स्त्रीची सावली व्हावं...

- नमिता दोंदे ( डोंबिवली )

CRIME BORDER | 13 November 2026 | 10:27 AM

स्त्रीने स्त्रीची सावली व्हावं...

येत्या काही दिवसात काही महिलांनी माझ्याकडे मनातल्या भावना व्यक्त केल्या... त्या सर्वांसाठी आणि इतर स्त्रियांसाठी माझी आपुलकीची साद आहे.. थेट मनातून...

माझ्या एक लक्षात येतंय आपण स्त्रिया एकमेकाना समजून घेण्यात फार कमी पडतोय. एकमेकांची ताकद होण्याऐवजी एकमेकांच्या चुका काढण्यात जास्त रस घेतोय...तुम्हांला जर प्रगती करायची असेल तर पहिला मंत्र आहे आधी स्वतःला ऐका आणि दुसरा एकमेकांना ऐका..सातत्याने स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रवासात... कधी मुलगी म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी पत्नी म्हणून, कधी आई म्हणून, तर कधी स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडणारी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून. प्रत्येक भूमिकेत तुम्ही काहीतरी देत असता , काहीतरी जपत असता आणि अनेकदा स्वतःच्या मनातलं मनातच ठेवत असता...पण मनातल्या असंख्य न बोललेल्या भावना दुसऱ्या स्त्रीला कदाचित शब्दांशिवायही समजू शकतात.... 
कारण समाजाच्या अपेक्षा, नात्यांमधली ओढाताण, स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवण्याची वेळ, सगळ्यांसाठी जगताना स्वतःलाच विसरण्याची सवय... या सगळ्यांचा अनुभव प्रत्येक स्त्रीचा वेगळा असला, तरी त्यातल्या काही वेदना समान असतात.
मग आपणच एकमेकांशी असे का वागत असू? अनेकदा एखादी स्त्री काही मनातलं सांगत असते तेव्हा आपण ही यातून गेलोय अशी भावना मनात येऊन जातेच ना...
मग मला कळतं नाही,
एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात मनापासून आनंदी होऊ शकत नाही का? तिचं यश पाहून तुलना करण्याऐवजी 
तिचं कौतुक करू शकत नाही का? तिच्या चुकीवर तिला कायमचं दोषी ठरवण्याऐवजी, ती चूक सुधारण्यासाठी तिच्या सोबत उभी राहू शकत नाही का? कारण एखाद्या स्त्रीला खाली खेचण्यासाठी अनेक हात पुढे येऊ शकतात; पण तिला पडताना सावरण्यासाठी पुढे आलेला एक हात तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.


तो एक हात आपण दिला तर??? कारण प्रत्येक वेळी आधार देण्याची गरज नसते, कधी कधी फक्त तिची सावली होण्याची गरज असते.... आपल्याला सावली होता यायला हवं.
कारण तीला प्रत्येक वेळी सल्ला नको असतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही नको असतं. कधी कधी तिला फक्त मन मोकळं करायचं असतं. कुणीतरी शांतपणे ऐकून घ्यावं, मध्येच थांबवू नये, लगेच तिची चूक काढू नये, तिच्या निर्णयांचा न्याय करू नये. फक्त तिच्या मनातलं समजून घ्यावं.. तिच्यावर प्रेम कराव... तीला मिठी मारून दिलासा द्यावा. खांद्यावर डोकं ठेवून शांत बसता यावं... कारण एखाद्या स्त्रीला खाली खेचण्यासाठी अनेक हात पुढे येऊ शकतात; पण तिला पडताना सावरण्यासाठी पुढे आलेला एक हात तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.
कधी एखादी स्त्री चुकते. कधी तिचे निर्णय चुकीचे ठरतात.  


परिस्थितीच्या दबावाखाली हरते. अशा वेळी तिची चूक झाकून टाकणं म्हणजे तिला चुकीची साथ देणं नव्हे; तर तिची चूक तिला समजावून सांगताना तिचा हात न सोडणं, ही खरी साथ आहे. तिला योग्य-अयोग्य समजावून सांगता यायला हवं, पण तिचा आत्मसन्मान दुखावून नाही. तिला आरसा दाखवता यायला हवा, पण तिला एकटं पाडून नाही. तिच्या आयुष्यातल्या कठीण प्रसंगात तिच्यासोबत उभं राहता यायला हवं, तिच्या जागी निर्णय घेण्यासाठी नाही, तर तिला स्वतःचा निर्णय घेण्याइतकी ताकद मिळावी म्हणून.कधी एवढंच म्हणावं, "मी आहे तुझ्यासोबत. तुला सगळं एकटीने सहन करण्याची गरज नाही." या काही शब्दांमध्ये किती मोठी ताकद असते, हे त्या स्त्रीलाच समजू शकतं जिने आयुष्यात कधीतरी एकटेपणाचा सामना केलेला असतो.


आपण अनेकदा स्त्रीशक्तीबद्दल बोलतो. स्त्रीच्या कर्तृत्वाचा गौरव करतो. स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि समानतेचा पुरस्कार करतो. पण या सगळ्याची सुरुवात आपल्या रोजच्या वागण्यातून होऊ शकत नाही का? एखाद्या स्त्रीबद्दल वाईट बोललं जात असेल, तर आपण तिच्या बाजूने योग्य ते बोलू शकतो. कुणी तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत असेल, तर पुराव्याशिवाय निर्णय देण्यास नकार देऊ शकतो. एखादी स्त्री नवीन सुरुवात करत असेल, तर तिच्या मनात भीती निर्माण करण्याऐवजी तिला प्रोत्साहन देऊ शकतो. ती आयुष्यात अपयशी ठरली असेल, तर तिची खिल्ली उडवण्याऐवजी तिला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करू शकतो.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, दुसऱ्या स्त्रीला प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही.


तिचं कौतुक करावंसं वाटलं, तर आजच करावं. तिची आठवण आली, तर फोन करावा. ती काही दिवस शांत असेल, तर तिची विचारपूस करावी. तिच्या यशाचं मनापासून अभिनंदन करावं. तिच्या दुःखात तिच्यासोबत बसावं. कारण नात्यांना मोठ्या भेटवस्तूंपेक्षा छोट्या कृतींची ऊब जास्त जिवंत ठेवते.कदाचित तुमच्या त्या एका प्रयत्नामुळे तिच्या आयुष्यातला एखादा कठीण दिवस थोडा सोपा होईल.एकीला जेव्हा वाटेल की ती हरत आहे, तेव्हा दुसरी तिला तिच्यातली ताकद आठवून देईल. एकीच्या वाटेत अडथळे आले, तर दुसरी तिला नवी वाट शोधायला मदत करेल. एकीने स्वप्न पाहिलं, तर दुसरी त्या स्वप्नाला पंख देईल. एक कोसळली, तर दुसरी तिला सावरण्यासाठी हात पुढे करेल. अशा वेळी त्या फक्त दोन स्त्रिया राहत नाहीत; त्या एकमेकींची ताकद बनतात. त्यांच्या एकत्र येण्यातून नवी स्वप्नं जन्म घेतात, नवी नाती निर्माण होतात आणि बदल घडवण्याची ऊर्जा तयार होते.


तिच्या दुःखात तिचं ऐकणारी, तिच्या आनंदात मनापासून हसणारी, तिच्या चुकीतून तिला शिकायला मदत करणारी आणि तिच्या यशात तिच्यापेक्षाही जास्त आनंदी होणारी स्त्री बनू या.कारण स्त्रीला प्रत्येक वेळी जगाशी लढण्याची ताकद देण्यापेक्षा, कधी कधी तिला लढायची गरजच भासू नये इतकी सुरक्षितता देणं अधिक महत्त्वाचं असतं.

ज्या दिवशी स्त्रीला दुसऱ्या स्त्रीकडे आपलं मनं मोकळ करताना भीती वाटणार नाही , तिचं दुःख सांगताना संकोच वाटणार नाही, तिचं यश सांगताना तुलना होईल अशी चिंता वाटणार नाही, त्या दिवशी स्त्रीशक्तीचा खरा अर्थ आपल्याला उमगलेला असेल.कारण स्त्री जेव्हा स्त्रीला समजून घेते, सोबतीने एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहतात, तेव्हा त्यांची ताकद ही नवनिर्मिती आणि आयुष्याला नवी दिशा दिशा देणारी असते..

मैत्री करूया... प्रेम व्यक्त करूया... विश्वास ठेवूया.. साथ देऊया...

- नमिता दोंदे - ( डोंबिवली )