CRIME BORDER | 13 November 2026 | 11:09 AM
ठाणे :- ठाण्यातील रहेजा गार्डन येथील कार्लाइन या १७ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तब्बल ५० रहिवाशांचे प्राण वाचवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या (TDRF) जवानांचा विशेष गौरव करण्यात यावा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. या बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि जवानांना प्रोत्साहनपर एक वेतनवाढ (इन्क्रिमेंट) देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रहेजा गार्डन येथील कार्लाइन या १७ मजली इमारतीत भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रहिवाशांना धीर दिला. दरम्यान, इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने लिफ्टचा वापर करणे अशक्य झाले होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी शिड्या व स्ट्रेचरच्या साहाय्याने तब्बल ५० रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. विशेष म्हणजे, रहिवाशांसोबतच त्यांच्या पाळीव कुत्रे आणि मांजरांनाही जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
अनेक तास अथक परिश्रम घेत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत मोठी जीवितहानी टाळली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानांच्या शौर्याचे आणि कर्तव्यदक्षतेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी कौतुक केले होते.