CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वारसदार

नवनाथ अर्जुन पा. गायकर

CRIME BORDER | 15 November 2026 | 12:37 PM

वारसदार

बापु तात्या म्हंणजे नाशिक जिल्हयातील एक वजनदार राजकिय माणुस.पुर्ण जिल्हाभरात तात्याचां राजकिय  दरारा होता.तात्या म्हणेल ती पुर्व दिशा.तात्या पुढे बोलायची कोणाची हिंमत नाही.तात्यापुढं सारे आमदार, खासदार कराकरा वाकत.जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती हया तर तात्याच्या हाताचा मळ होता. इच्छुक मंडळी सगळी तात्याच्या अवती भवती नाचत असायची.
कारण त्या सर्वांनां तात्याच्या हातातली एकगठ्ठा मतं हवी असायची.तात्याचा आशिर्वाद एकदा मिळाला कि तो उमेदवार निवडुन आलाच समजा.आजवरचा तो इतिहास होता.
   आज तात्याचा वाढदिवस होता.तो दरवर्षी शेतकरी मेळावा म्हणुन साजरा केला जात असे. या मेळाव्याला राज्याचे मंत्री, नामदार, आमदार, खासदारासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच, चेअरमन व हजारो कार्यकर्ते जमा झाले होते. 
    ईगतपुरी तालुक्यातील घोटी शहरामध्ये जणु काही जत्राच भरली होती.घोटी शहर म्हंणजे तात्याचीं जन्मभुमी होती.
   घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चे आवार तर माणसानीं फुलुन गेलेच होते, पण बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरही जिकडे तिकडे तात्या समर्थकच फिरतानां दिसत होते.शहर भर फलकानां तर ऊतच आला होता.
   तात्याचा पुतण्या रावसाहेबचा तर उत्साहच ओसंडुन वाहत होता.गेला महिनाभर तो या सगळया कार्यक्रमाची जय्यत तयारी करत होता.झोप कशी असते हेच त्याला महिनाभर माहिती नव्हते.सगळया कार्यक्रमाचे नियोजन रावसाहेब ने केले होते.
   रावसाहेब म्हंणजे तात्याचं दुसरं रुपच होतं.तात्याचंही आता वय होत चाललं होतं.आणि पहिल्यासारखी तडफ व कामाची उरक राहिली नव्हती त्यांच्या अंगात.त्यामुळे हळुहळू तात्याचां कामाचा भार रावसाहेबावर पडत होता.रावसाहेब ही हे सगळं आनंदाने सांभाळत होता.तात्या खालोखाल आता रावसाहेब यालाच लोक,कार्यकर्ते सगळे मानत होते.
   एखादया ठिकाणी तात्या येऊ शकत नसले तर कार्यकर्ते रावसाहेबानां बोलावु लागले होते. तात्याप्रमाणेच वचक व दरारा निर्माण करण्यात रावसाहेब यशस्वी झाले होते. तात्यांप्रमाणेच किंबहुना तात्यापेक्षाही जास्त लोकप्रिय झाले होते रावसाहेब. त्यांनी तात्याच्यां जुन्या लोकानां तर आपलेसे केलेच होते, पण तरुण पिढीमध्येही रावसाहेब प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यांच्या एका हाकेवर शेकडो युवक भराभरा गोळा होत होते.
   तात्या नंतर कोण ? या सहज सोप्या प्रश्नाचे उत्तर रावसाहेब हेच होते.तात्याचें खरे राजकिय वारसदार.
   आता पहाटेच रावसाहेब आपल्या भावाला, म्हंणजे तात्याचां एकुलता एक मुलगा दादुला आणायला ओझर विमानतळावर गेला होता.दादु शिकायला बेंगलोर ला होता आणि तात्यानीं आपल्या वाढदिवसानिमित्ताने खास दादुला बोलावुन घेतले होते.
   "रावसाहेब, ए रावसाहेब. "
   तात्याचां पुकारा ऐकुन गोपिकाबाई दालनात आल्या.
   "काय हवंय आता ? सारखं काय मेल्या त्या रावस्याचं नाव ओठी.घरात इतरही माणसं जिवंत आहेत की."
   गोपिकाबाई फणकार्यानं म्हणाल्या.
  "अगं सावलीसारखा आहे तो माझ्या.सवय झालीय आता त्याची मला."
   तात्या हसुन म्हणाले खरे, पण गोपिकाबाई रावसाहेब चा का कुणास ठाऊक इतका द्वेष करते हे त्यांना समजत नव्हते.
  आपला मुलगा दादु लहानपणापासुनच शिक्षणासाठी बाहेरगावी होता.पुतण्या रावसाहेब हाच नेहमी जवळ होता.आपला सगळा व्याप तर सांभाळत होताच, शिवाय आपली आणि गोपिकाबाई ची ही म्हातारपणी किती काळजी घेत होता.आज रावसाहेब नसता तर एवढं सगळं सांभाळणचं अवघड होतं.
   रावसाहेबाचा बाप ही असाच. जणु काही लक्ष्मणच होता तो. आपण बाहेर राजकारण,  समाजकारण करत असतानां घरचा सगळा व्याप सांभाळत होता तो.एका शब्दाचीही कधी कुरकुर नाही कि तक्रार नाही. मान वर करुन बोलणे नाही. तात्याने शब्द टाकला कि तो भावाने झेललाच.रावसाहेब ने ही बापाचेच गुण घेतले होते.आणि तरीही गोपिकाबाई मात्र विनाकारण त्या बाप लेकाचा दु;स्वास करत होती.
   "कधी जागे होणार आहात तुम्ही कोणास ठाऊक ? रावसाहेब, रावसाहेब करता करता एक दिवस अचानक दयाल सगळा कारभार त्याच्या हाती.आणि आपल्या दादुला ठेवाल तसेच.त्या रावस्याचे पाय धुवायला."
   "अगं तुझ्या जिभेला काही हाड बिड आहे कि नाही ?"
   तात्याचां प्रचंड संताप झाला होता.
   रावसाहेब बद्दल हिच्या मनात एवढे विष भरलेले आहे हे पाहुन ते संतापाने थरथर कापु लागले. जवळ काहि नव्हते हे नशिब, नाहि तर तेच फेकुन मारले असते तात्यानीं.
   "चांडाळणी, अगं काय हे विचार तुझे ? माझा पुतण्या आहे तो.कुणी परका थोडाच आहे ?"
   "पुतण्या जेव्हा तुमच्या पोराच्या वाटयाला येणारं हडप करेल ना तेव्हा डोळे उघडतील तुमचे. तुम्ही नका काळजी करु पोराच्या भविष्याची.आई म्हणुन ती मलाच करावी लागणार आहे. आयुष्यभर तुम्ही लोकाचींच धुणी धुत बसलात.पोराचं हित काय बघणार तुम्ही ?"
   गोपिकाबाई ही आज जणु इरेलाच पेटल्या होत्या. माघार घ्यायला काही त्या तयार नव्हत्या. या माणसाचे आजच डोळे उघडले नाही तर हा माणुस आपल्या एकुलत्या लेकाला दादुला भीख मागायला लावील याची भीती वाटत होती.
   "मगं हे वैभव कुणासाठी आहे ?"
   "हो, आहे ना ? पण यावर विळखा मारुन तो रावस्या बसलाय ना.हे नाही लक्षात येणार तुमच्या.तात्या, तात्या, असं गोड बोलुन सगळंच गुंडाळुन बसलाय तो.आहात कुठे तुम्ही ?"
   गोपिकाबाईनीं हळुहळू तात्याच्या मनात विष कालवायला सुरुवात केली होती. 
   तात्या विचारात पडले होते. हळुहळू हे विष भिनायला सुरुवात झाली होती. ते जसजसा खोलवर विचार करु लागले तसतसे त्यांनाही हे पटु लागले होते.
   हल्ली वयोमानामुळे तात्या बाहेर फारसे पडत नव्हते. त्यामुळे सगळे निर्णय हल्ली रावसाहेबच घेत असायचा. अनेकदा तो परस्पर निर्णय घ्यायचा. तात्यानां तो फारसं विचारतही नसायचा.तात्यानीं विचारलं तरं हसुन म्हणायचा, 'तात्या, नका काळजी करु आता.  तुम्ही निवांत आराम करा.'
   अनेकदा तात्यानां भेटायला कार्यकर्ते दुरवरुन यायचे, पण रावसाहेब त्यांना बाहेरच्या बाहेरच घालवायचा.विचारलं तर सांगायचा, 'तात्या, आराम करत आहेत.त्यांना नका त्रास देऊ.काय असेल ते मला सांगत चला.'
   मागे एकदा घडलेला प्रसंग तात्यानां आठवला.तात्याचां जुना विश्वासु साथीदार होता महिपती. आयुष्यभर त्याने तात्याशीं निष्ठा ठेवली होती.कधी काही मागितलं नव्हतं स्वत; साठी.
   तो महिपती जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी मागायला तात्याकडे आला होता. अर्थात महिपती कसला येतोय स्वत:साठी, त्याचे कार्यकर्ते बळेच घेऊन आले होते त्याला.
  त्या कार्यकर्त्याचं म्हणणं होतं कि, महिपतीने आयुष्यभर स्वत; साठी काही मागितलं नाही. तात्याचीं निस्वार्थपणे सेवा करत राहिला होता.समाजासाठी काम करत राहिला होता.आता एक संधी त्याला दयावी एवढीच मागणी होती.
  महिपतीला घेऊन कार्यकर्ते आले खरे पण रावसाहेबानीं त्यांना तात्यानां भेटु दिलं नाही. तात्याचीं तब्येत बरी नाही असं सांगीतलं त्यांना.
   "मग महिपतीला उमेदवारी तुम्ही घोषित करा."
   कार्यकर्ते मंडळीनीं आग्रह धरला.
  पण रावसाहेब ने ऐकले नाही कार्यकर्ते मंडळीचे.
   त्याने त्याच्या युवा कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. 
  त्या निवडणुकीत मग चिडलेल्या महिपतीच्या कार्यकर्त्यानीं त्याला बंडखोरी करायला लावली.
   या निवडणुकीत रावसाहेब ने दिलेला उमेदवार निवडून आला खरा, पण तो अगदी निसटत्या मतानीं.महिपती ने दुसर्या नंबरची मते घेत नाकी नऊ आणले होते.
   हा सगळा प्रकार तात्यानां समजल्यावर तात्या काहिसे चिडले होते.
   आता तात्यानां ही गोपिकाबाई चं म्हणणं खरं वाटु लागलं होतं.
  या गोष्टीचा लवकरच सोक्षमोक्ष लावण्याची गरज आहे असं तात्यानां वाटु लागलं आणि आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजीत मेळाव्यातच ही घोषणा का करु नये , असा विचार त्यांच्या मनात आला.ठरलं तर मग, अनासये दादुही आलेला आहेच.आणि आता जवळजवळ त्याचं शिक्षणही पुर्ण होत आलेलं होतं.तेव्हा आपला राजकिय वारसदार म्हणुन दादु च्या नावाची घोषणा आज करु या. दादुवर जबाबदारी टाकली कि आपण मोकळे.शिवाय लोक काही आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. आपण दादुचं नावं जाहिर केलं कि ते सगळेच नक्कीच आपला निर्णय उचलुन धरतील आणि दादुला स्वीकारतील.नक्कीच  स्वीकारतील.
   पण रावसाहेबाचं काय ? तात्याच्या मनात विचार आला. काहीही असो, रावसाहेब ने एवढी दिवस सेवा केलीच की आपली. अगदी सावली सारखं सोबत राहुन सांभाळलाच कि सारा कारभार ? या घोषणेने त्याच्यावर अन्याय तर नाही ना होणार ?
   तात्याच्या मनात आता दोन परस्पर विचाराचीं लढाई सुरु झाली होती. पुत्रप्रेम कि पुतण्या या विचारात ते अडकले होते.
   या विचारातच दिवस कसा गेला ते तात्यानां कळलंच नाही.दिवस भर तात्याचा दरवाजा बंद होता. बाहेर तुफान कार्यकर्त्याचीं गर्दी जमली होती.पहाटेपासुन लोक येऊन बसले होते.
  शेवटी संध्याकाळी दरवाजा उघडला आणि तात्या तयार होऊन बाहेर पडले.लोकाचीं ही तोबा गर्दी होती.तिथुन मिरवणुकीने तात्यानां वाजतगाजत बाजार समितीच्या आवारात कार्यक्रम स्थळी आणले गेले.या वेळी रावसाहेब त्यांच्या सोबत सावली सारखा होता व कार्यकर्त्याच्यां अलोट गर्दीला आवरत होता.
   तात्याचीं ही लोकप्रियता पाहुन मंत्री,आमदार व खासदार ही चकित होत होते.या वयातही तात्याचीं लोकप्रियता टिकुन होती.
   दादु आणि गोपिकाबाई तात्याच्यां मागे असलेल्या चारचाकी गाडीत बसुन होते. सभास्थळी आल्यावर ते गाडीतुन खाली उतरले.
  व्यासपिठावर मंत्री महोदय, आमदार, खासदार यांचेसह विविध प्रतिष्ठित लोक आप आपल्या हुद्दयानुसार बसलेले होते.तात्यांसाठी खास मोठं आसन तयार करण्यात आलेलं होतं.जे मंत्र्या-संत्र्यापेक्षाही मोठं होतं.ही सगळी व्यवस्था आणि नियोजन रावसाहेब ने केलं होतं.
   व्यासपिठावर तात्याचं गुण गाणारी भाषणं सुरु होती.दुसरीकडे तात्याचां जयजयकार सुरु होता.तात्या किती महान आहे, हे सांगण्याची प्रत्येकामध्ये अहमहिका लागली होती.
   एव्हाना सगळयाचीं भाषणे झाली होती.लोकानां आता तात्याचं मुख्य भाषण ऐकायचं होतं.
   आणि सुत्रसंचलन करणार्यान तात्याच्या नावाची घोषणा केली आणि टाळयाचां प्रचंड पाऊस झाला. फटाक्याचीं आतिषबाजी आणि जयजयकाराच्या घोषणेनं बाजार समितीचं सगळं प्रांगण दणाणुन गेलं.
   तात्या हे सगळं प्रेम, हा महाप्रचंड जनसागर पाहुन भारावुन गेले.त्यांनी नतमस्तक होऊन या लोक देवतेला मनापासून नमस्कार केला आणि वय झालेलं असतानांही आपल्या खणखणीत आवाजात भाषणाला सुरुवात केली. 
   भाषणाची तात्याचीं एक वेगळीच गावरान शैली होती. भाषणादरम्यान तात्या मिश्किल विनोद करायचे, कधी विरोधकांवर तुटुन पडत शेलक्या शिव्या दयायचे तर कधी लोकानां भावुकही करायचे.
   तात्यांवर जीवापाड प्रेम करणारे लोकही तात्याचं भाषण अनं त्यातला शब्द न शब्द टिपुन घेत होते.वय झालेले तात्या कितीतरी दिवसानीं जाहिर कार्यक्रमात बोलत होते, आणि कितीतरी दिवसानीं लोकानां तात्याचं दर्शन होत होतं.
  अर्धा तास तात्याचीं चौफेर टोलेबाजी सुरु होती.आणि अचानक तात्यानीं असे शब्द उच्चारले कि लोकही प्राण डोळयात गोळा करुन ऐकु लागले होते.टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी निरव शांतता पसरली होती. सगळयाचें लक्ष आता तात्याच्यां त्या निर्णयाकडे लागले होते.
  "मी आता थकलोय." 
   तात्या म्हणाले.
  लोकं नाही, नाही म्हणत होते.
  "मला तुमचं प्रेम कळतयं."
  तात्या हात उंचावुन बोलले.
  "पण निसर्ग नियम आहे. थकलं कि माणसाने न सांगता थांबाव. नाही थांबल कि मग अचानक कुणी तरी ढकलुन देतं.म्हणुन सन्मानानं बाजुला व्हावं आणि नव्या रक्ताला संधी दयावी.ती संधी त्यांना वेळीच मिळायला हवी.तरच ते काहितरी करुन दाखवतील."
   तात्या बोलत होते.लोक ऐकत होते.
   "आज तुमच्या सगळयाच्यां साक्षीनं मी माझा वारसदार नियुक्त करतो आहे.जो यापुढे माझी जागा घेईल आणि माझे सगळे काम तो पाहिल."
  लोकं श्वास रोखुन ऐकत होते. तात्याचां वारसदार कोण ?
  सगळेचजण रावसाहेब कडे बघत होते. आजतागायत तात्याचीं सावली बनुन तोच तर सगळं पहात होता.अर्थात थोडया फार चुका होत असतीलही, पण तोच खरा वारसदार होता तात्याचां.सगळंच तर सांभाळत होता तो.
   पण...पण कधी न दिसणारा दादु तथा दादासाहेब ही आज व्यासपिठावर दिसत होता.त्यामुळे अनेकाच्यां मनात शंकेची पाल चुकचुकली होती. हल्ली दिल्लीपासून ते महाराष्ट्रात आणि विविध नेत्याच्यां घरात हेच चित्र दिसत होतं.अनेकाच्यां घरात मुलगा आणि पुतण्या असा संघर्ष सूरु झाला होता आणि यातुन कित्येकाचीं घरे फुटली होती.
  स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात राज आणि उद्धव , स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या घरात धनंजय आणि पंकजा असा वाद होऊन घरं फुटली होती. एवढंच कशाला खुद्द शरद पवारांसारखा दिग्गज नेतांही मुलगी सुप्रिया व पुतण्या अजित यांच्या वादात पक्ष आणि घर दोन्हीही फुटण्यापासुन रोखु शकला नव्हता.
   तात्यांच्याही घरात आता हेच होणार का ? कारण दादु तथा दादासाहेब यांस वारसदार म्हणुन घोषित केले तर आजतागायत तात्याबरोबर सावलीसारखं काम करणार्या रावसाहेब वर अन्याय होणार होता.आणि रावसाहेब चं नावं घोषित केलं तर पोटच्या गोळयावर अन्याय केल्यासारखं होणार होतं.
  अर्थात निर्णय काहीही घेतला तरी घर फुटण्याचा धोका हा होताच.
   तात्या आता काय निर्णय घेतात याकडेच सगळयाचें लक्ष लागुन राहिले होते. उपस्थित सगळयानींच आपले श्वास रोखुन धरले होते. 
  "आणि माझा वारसदार आहे....???"
   तात्यानीं मुद्दाम वाक्य अर्धे सोडले व ते लोकाच्यां प्रतिक्रिया बघु लागले.लोक उत्सुक झाले होते नाव ऐकण्यासाठी.
   गोपिकाबाई चीं मागे चुळबुळ सुरु झाली होती. 
  सकाळी एवढं सांगुनही या माणसानं जाहिररित्या पोराला सोडुन जर का त्या रावस्याचं नाव घेतलं तरं ?
   गोपिकाबाई नां भीती वाटत होती.कदाचित दादु ऐवजी ते त्या रावस्याचंच नाव घेतील.आपल्या लेकरांवर कदाचित अन्यायही करतील.
  तर तिकडे रावसाहेब मात्र मनोमन खुष होता. तात्याचां खरा राजकिय वारसदार आपणच तर आहोत.गेल्या कित्येक वर्षापासुन तात्याचं सगळचं काम तर आपण सांभाळतो आहोत.शिवाय तात्याच्यां शब्दाला जितका मान आहे तितकाच मान कार्यकर्ते आपल्याही शब्दाला देत आहेतच कि.शिवाय कितीतरी नवी फळी आपण उभी केली आहे. ती सगळी आपल्यामागे उभी आहे कि. तात्यालाही याची जाणीव आहे. आणि उदया आपल्यावर अन्याय झालाच तर आपण बंड करणं तात्याला परवडायचं नाही. आपल्याला मग स्वतंन्त्र अस्तित्व दाखवावं लागेल, उभं करावं लागेल.
   तात्याच्या विरुद्ध बंड ही कल्पनाच रावसाहेबानां सहन होत नव्हती.पण जिथं राज ठाकरे, धनंजय मुंडे आणि आता खुद्द अजित पवारानींच आपल्या काकाविरुद्ध बंड केले तिथे आपली काय कथा ? असा विचार रावसाहेब च्या डोक्यात घोंगावु लागला होता.
   सगळेच वारसदाराचं नाव ऐकायला उत्सुक होते.
  "मी जाहिरपणे निवृत्ती घेत आहे.आणि यापुढे माझा राजकिय वारसदार म्हणुन गोपिकाबाई या कारभार पाहतील."
   "गोपिकाबाई? ???"
   हे अनपेक्षित नाव ऐकुन सगळेच चकित झाले होते.
  खुद्द गोपिकाबाई यांनाही धक्काच बसला होता. आपण आणि राजकारण करावं ? छे!छे! हे तर आपल्या आवाक्याच्या पलीकडे आहे.आपण काय राजकारण सांभाळणार ?
   "या गोपिकाबाई अशा पुढे या."
   तात्याचीं ती हाक ऐकुन गोपिकाबाई क्षणभर बावरल्याच. काय झालयं तात्यानां ? भरसभेत त्यांनी आपलं नाव घ्यावं आणि आपल्यावर ही जबाबदारी टाकावी हे पाहुन त्या संकोचुन गेल्या.
  दादुने त्यांची ही सैरभेर अवस्था टिपली होती. तो त्यांना धीर देत हळु आवाजात कुजबुजला.
  "आई, ऊठ, तात्या बोलावताहेत. नाही म्हणु नको. पुढे होऊन जबाबदारी स्वीकार."
  दादुने गोपिकाबाईनां हात देत उठवले आणि तात्याच्यां दिशेने पुढे घेऊन गेला.
  रावसाहेब च्या चेहर्यावरील भाव पडले होते खरे पण तो बळेच हसु चेहर्यावर दाखवत होता.
  लोक बुचकळयात पडले होते कि तात्यानीं हा असा कसा निर्णय घेतला.पण तात्याच्या निर्णयाला विरोध करायला कुणाची हिंमत ही होत नव्हती. तात्यानीं हा निर्णय विचारपुर्वकच घेतला असावा असाच विचार सगळेजण करत होते.
   तात्याचां वाढदिवसाचा कार्यक्रम एकदाचा संपला. सगळयाच्यांच मनात उत्सुकता होती कि असा निर्णय तात्यानीं घेतलाच कसा ?
   दुसर्या दिवशी तात्या अगदी आरामशीरपणे उठले.आंघोळ वगैरे करुन चहापाणी घेता घेता ते पेपर वाचत बसले होते.
  सगळया पेपराचें मथळे तात्याच्यां या अनपेक्षित घोषणेनेच भरलेले होते.काहिनीं तर यावर विश्लेषणही छापुन काढले होते.अनेकानीं अनेक तर्क या निमित्ताने लढवले होते.ते सगळं वाचुन तात्यांची करमणुक होत होती.
  "शुभ सकाळ दादा."
   दादु तात्यांजवळ आला आणि तात्याच्यां पाया पडत बोलला.
  तात्यांनी आपल्या लेकराला तोंडभरुन आशिर्वाद दिला.त्यांना पोराचं कौतुक वाटत होतं.इतक्या आधुनिक काळातील असुनही आपली पंरपरा व संस्कृती दादुने बाहेर राहुन ही जपली होती.
  "ये बैस दादू, चहा घेतलास का ?"
  "मी चहा घेत नाही दादा. माहिती असुन तेच विचारतात. चहा ही काही आपली संस्कृती नाही. ब्रिटिशानीं त्यांचा चहा खपावा म्हणुन आपल्याला लावलेली ती वाईट सवय आहे."
  "बरं बरं बाळा, तुझ्यापुढे माघार आहे."
  तात्या हसुन बोलले.
  "तुझ्या मातोश्री कुठे दिसत नाहीत ?"
  तात्यानीं आजुबाजुला पहात विचारले.
  "बस का दादा ? अहो काल तुम्ही त्यांना तुमचे राजकिय वारसदार म्हणुन घोषित केले हे विसरलात का ?"
  "अरे हो, विसरलोच होतो बघ.पण मग आता आहेत कुठे त्या ?"
   "रावसाहेब,  सकाळीच त्यांना कार्यालयात घेऊन गेलाय. सत्कार आहे तिथे त्यांचा.आणि हो, दिवसभर भरगच्च कार्यक्रम आहेत आता त्यांचे."
   दादु हसत बोलला.
  "पण झेपेल का रे तिला हे सगळं ?"
  तात्यानीं काळजीने विचारले.
  "ते आताच नाही सांगु शकत दादा.पण एक मात्र निश्चिंत कि राजकारण म्हंणजे काय असतं हे नक्कीच कळेल तिला."
  "हो, ते तर आहेच."
   तात्या स्वत;शीच पुटपुटले.
  खरतरं तात्यानां आपला राजकिय वारसदार ठरवला होता. आणि तो होता रावसाहेब. पण काल जेव्हा या विषयावर गोपिकाबाईनीं जेव्हा भांडण करत दादुचं नाव पुढे केलं तेव्हा ते काहिसे चक्रावुन गेले होते.
   दादुचं नाव घ्यावं तर रावसाहेब वर अन्याय होणार होता आणि रावसाहेब चं नाव घ्यावं तर दादु दुखावला जाणार होता.दादु पेक्षा ही कदाचित गोपिकाबाई जास्त दुखावली गेली असती.
   निर्णय काहीही घेतला असता तरी त्यातुन घरात महाभारत उभेच राहणार होते आणि सुखाने जगायच्या या काळात नसता डोक्याला ताप झाला असता.
   म्हणुन मग तात्यानीं प्रथम दादुचं मन जाणुन घेतलं.पण दादुने आपल्याला या झमेल्यात पडायचं नाही असं निक्षुन सांगितलं.आपण बेंगलोरला मजेत असुन तिथेच चांगल काम मिळालं तर बघु असं ठरवलं होतं.
   दादुचं म्हणणं ऐकल्यावर तात्यानां आता रावसाहेब शिवाय पर्याय नव्हता.पण रावसाहेब चं नाव आपण जाहिर केलं तर गोपिकाबाई नाराज व्हायच्या.त्या पेक्षा आपण गोपिकाबाईचंच नाव घेतलं तर ? रावसाहेब किती कष्ट करतो याची त्यांना जाणिव होईल या निमित्ताने. शिवाय पद सगळयानां हवं असतं.पण त्यामागे काय कष्ट उपसावे लागतात हे ही अनुभवता येईल गोपिकाबाईनां.
  राजकारण किंवा समाजकारण सोपं नाहीए. त्यासाठी सावध असावं लागतं.तत्पर असावं लागतं.पायाला भिंगरी बांधावी लागते, आणि अष्टोप्रहर सजग रहावं लागतं.
  गोपिकाबाईनां राजकिय वारश्यांबद्दल सल्ला देतानां केवळ सत्ता दिसत होती. लोक कसे जयजयकार करतात हेच दिसत होतं.पण हे सोपं नसतं.ते कमवावं लागतं आधी.आणि नंतर डोळयात तेल घालुन ते टिकवावं लागतं.
   नुसतं सल्ला देणं सोपं असतं.पण प्रत्यक्षपणे जबाबदारी अंगावर पडली कि मग कळतं.
   तात्यानीं मुद्दाम गोपिकाबाईचं नाव घेतलं आणि हे घोंगड त्यांच्या गळयात अडकवलं.बघु या तरी, किती दिवस त्या आपला राजकिय वारसा चालवतात.असंही दादु ही जबाबदारी स्वीकारणार नाही हे स्पष्टच आहे. मग राहता राहिला रावसाहेबच.
   गोपिकाबाई स्वत;हुन रावसाहेब याच नाव जाहिर करेपर्यंत आपण बघत बसायचं.अर्थात ते त्यांना करावचं लागेल म्हणा, नव्या दमाचा आणि थकलेल्या गोत्राचां कारभार करतानां फरक पडतोच कि ? आज ना उदया त्यांना दादुचा नकार ऐकल्यावर रावसाहेबाचं नाव घ्यावचं लागेल. आपण ते घेतलं असतं तर त्या नाराज झाल्या असत्या, त्या पेक्षा हा राजकिय वारसदाराचा निर्णय त्यांच्याच गळयात मारुन स्वत; नामेनिराळे राहण्याचा धुर्त निर्णय तात्यांनी घेतला होता. यातुन थोरामोठयाच्यां घरात मुलगा आणि पुतण्यांमधली भांडणेही त्यांनी कटाक्षाने टाळली होतीच, शिवाय पत्नीलाही नाराज करणे टाळले होते.
--------------------
लेखक
नवनाथ अर्जुन पा. गायकर

आहुर्ली पो.  सांजेगाव 
ता.ईगतपुरी, जि.नाशिक 
४२२ ४०२
मो.नं. ९८८१३२९७०९
९७६३८२७७०८

------------------------
माणसा...माणसा...
--------------------
माणसा,माणसा
सारा लुटला निसर्ग
आज कोपला निसर्ग
सार्या जगा उपसर्ग
 तु तं बैतालावानी
नाही राखलंस धन
आज वाळवंट रान
अनं जीवाची वणवण
आज रडायची पाळी
तुच हाताने आणली
सारी निसर्गाची रया
भामटया,चोरली चोरली
आता रडायचं उठ
हाव,पैसा सोड सारं
वेळ अजुनही आहे 
कर निसर्गाचं रक्षण
आज झालास जागा
तर उदया 
तुझी जगतीलं लेकरं
आज मारलीस पाखरं
त्याचा भोग तळतळ
अरे हावर्या माणसा
जरा भानावर ये
उदया तुझी चिमणी पाखरं
नाहीतर होतील सैरभैर
------
कवी
नवनाथ अर्जुन पा. गायकर
आहुर्ली, पो.सांजेगाव 
ता.ईगतपुरी जि.नाशिक 
४२२ ४०२
मो.नं.९८८१३२९७०९
९७६३८२७७०८