CRIME BORDER | 16 November 2026 | 09:58 PM
आज मनं अस्वस्थ आहे. एका प्रसंगाने मला अंतर्मुख केले. बघा तुम्हांला पटतंय का??
आपल्याला आयुष्यात मित्र हवे असतात. आपल्यासारखे विचार करणारे, आपल्याच स्टेटसचे, आपल्यासोबत फिरणारे, वीकेंडला प्लॅन करणारे, हसणारे, मजा-मस्ती करणारे. आपल्याला आपल्या आनंदात सहभागी होणारी माणसं आवडतात. आपल्या यशाचं कौतुक करणारी, आपल्या प्रगतीसोबत चालणारी माणसं हवी असतात...पण आपण प्रवास सुरु केला तेव्हा आपल्या प्रवासात कधीकाळी आपल्यासोबत चाललेली माणसं आज कुठे आहेत, कशी आहेत?? याचा विचार आपण कधी करतो का? आयुष्याचा प्रवास सुरू असतो. प्रत्येकाची गती वेगळी असते. कोणी शिक्षण पूर्ण करून करिअरमध्ये स्थिरावतं, कोणी व्यवसायात यश मिळवतं, कोणी लग्न करून संसारात रमून जातं, तर कोणी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतं. आपल्याला नवे मित्र मिळतात, नवी वर्तुळं तयार होतात, नवे विषय, नवे अनुभव आणि नवे आनंद मिळतात.
या सगळ्यात आपण इतके गुंतत जातो की कधीकाळी आपल्यासोबत चालणारी काही माणसं नकळत मागे पडतात.काहींचं लग्न झालेलं नसतं, काहींचा घटस्फोट झालेला असतो, कुणी जोडीदार गमावलेला असतो, कुणाचा व्यवसाय अपयशी ठरलेला असतो, कुणाचं करिअर अजून मार्गावर आलेलं नसतं. कुणी घरच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत असतं, तर कुणी घरातल्या आजारपणामुळे, जबाबदाऱ्यांमुळे आणि मानसिक तणावामुळे स्वतःचं आयुष्यच विसरलेलं असतं.त्यांच्या आयुष्यात आनंद नसतो असं नाही, पण तो शोधण्याइतकी उसंतही त्यांच्याकडे नसतो.
मला अलीकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपल्या आजूबाजूला जणू दोन वेगवेगळे मित्रवर्ग तयार होत आहेत.एक वर्ग असा आहे, जो आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे. संसाराची घडी व्यवस्थित बसलेली आहे. नोकरी, व्यवसाय, मुलांचं शिक्षण, सुट्ट्यांचे प्लॅन्स, वीकेंड ट्रिप्स, पार्टीज... आयुष्याला एक ठरावीक लय मिळालेली आहे. त्यांचे मित्रही साधारण त्याच टप्प्यावरचे असतात. एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं, नवीन गोष्टी अनुभवणं, यश साजरं करणं सुरू असतं.आणि दुसरा वर्ग असा आहे, जो अजूनही लढतोय. कुणाला घर चालवण्यासाठी धडपडावं लागतंय, कुणाला करिअर उभं करायचंय, कुणाला नात्यांच्या तुटण्याचं दुःख पचवायचंय, तर कुणाला घरातल्या आजारपणासोबत स्वतःचं आयुष्य सांभाळायचंय. आर्थिक प्रश्न आहेतच, पण त्याहून मोठे मानसिक प्रश्न आहेत. हे लोकही धडपडत आहेत, धावत आहेत, रोज स्वतःला सावरत आहेत. आणि त्यांचे मित्रही अनेकदा त्यांच्यासारखेच संघर्ष करणारे असतात. कारण एकमेकांच्या परिस्थितीची जाणीव त्यांना असते.
जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपण सगळे एका रेषेत असतो त्यानंतर रेषा कमी जास्त होते आणि कालांतराने ही रेष इतकी मोठी होते की अंतर वाढत जातं....
इतके सगळे प्रश्न एका प्रसंगातून उभे राहिले...
अनेक वर्षांनी मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले. कॉलेजमध्ये असताना ती आमच्या ग्रुपची कॉलेज क्वीन होती. हुशार आणि स्वप्न पाहणारी... सतत बडबड करणारी, सगळ्यांना हसवणारी, उत्साही, चैतन्याने भरलेली. तिच्याभोवती कायम मित्रमैत्रिणींचा गोतावळा असायचा.पण आज तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं....
तिच्या आईला कॅन्सर झाला होता. ती नोकरी करत होती आणि घरी आल्यावर आईची पूर्ण काळजी घेत होती. नोकरी, घर, आईचं आजारपण, हॉस्पिटलच्या फेऱ्या, औषधं, घरातल्या जबाबदाऱ्या... सगळं एकटीने सांभाळत होती. मला पाहून आधी तीला अवघडल्या सारख वाटलं. मग तीने स्मित हास्य केल आणि पाणी घेऊन आली. आज कशी इथे? असा प्रश्न विचारला मी पटकन म्हंटल काका नाहीत का? कारण काका फेव्हरेट होते... आमचे सगळे सिक्रेट त्यांच्याकडे असायचे, कॅम्प साठी परमिशन मिळवण्यापासून काका माझ्या बाबांशी बोलायचे.. म्हणून मी उत्सहाने विचारलं.. तीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हंटल बाबा जाऊन तीन वर्ष झाली.आई च आजारपण सुरूच होतं त्यांना अचानक रात्री अटॅक आला आणि ते झोपेतच गेले. मी सुन्न झाले होते... माझा कंठ सुकला होता... माझ्या डोळ्यात गिल्ट पाहून तीने म्हंटल तू आधी पाणी घें....
मी एक घोट पाणी घेतलं आणि तिच्या आईची चौकशी सुरु केली. आता मी तिच्याकडे निरखून पाहिलं. ती खूप थकलेली वाटत होती. कित्येक दिवस तिने शांत झोप घेतली नसेल, स्वतःसाठी वेळ काढला नसेल, स्वतःच्या मनाचा विचारही केला नसेल, असं वाटत होतं. घरची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. पण पैशांपेक्षाही तिथे माणसांची सोबत कमी जाणवत होती.मी जवळपास तासभर तिच्याकडे बसले. पण तिने जेमतेम दहा वाक्यं बोलली असतील. तीही माझीच चौकशी करणारी!
माझ्या लक्षात आलं, तिच्याकडे सांगण्यासारखं काही नवीन नव्हतं असं नाही; तर तिचं स्वतःचं आयुष्यच कित्येक वर्षांपासून एका जागी थांबलं होतं. तिच्या जगात रोज तेच प्रश्न, त्याच जबाबदाऱ्या, तीच काळजी आणि तेच संघर्ष होते.कधीकाळी सगळ्यांना हसवणारी माझी मैत्रीण आज स्वतःचं दुःखसुद्धा बोलून दाखवायला विसरली होती....
मी तिथून निघाले, पण तिचा चेहरा डोळ्यांसमोरून जात नव्हता. खूप रडले. खूप रडले..
मनात एकच विचार येत होता, आपण सगळे कुठे होतो? तिच्या आयुष्यात इतकं सगळं घडत असताना आपण तिची साधी विचारपूसही केली नाही?
दुसऱ्या दिवशी रविवार होता. मी पुन्हा तिच्या घरी गेले.मला पाहून ती चकित झाली.मी तिला म्हटलं, "चल, चहा कर मस्त थोड्या वेळ गप्पा मारूया आणि नंतर छान तयार हो. आज तुला बाहेर जायचं आहे."ती लगेच म्हणाली, "अगं, आईला सोडून कसं जाऊ? आज मावशीची सुट्टी असते."मी म्हणाले, "मला माहीत आहे. तू जा. मी बसते काकूंकडे. पण एकदा स्वतःकडे बघ. काय अवस्था झालीय तुझी! किती दिवस झाले तू स्वतःसाठी जगलेली नाहीस. थोडा वेळ स्वतःला दे. आज तुझ्या मैत्रिणीला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. आणि हो तू छान सलोनमध्ये जा स्वतःला थोडं रिफ्रेश कर. आईची काळजी मी घेते."आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.कदाचित तिला बाहेर जाण्यापेक्षा कुणीतरी तिची जबाबदारी काही तासांसाठी स्वतःच्या खांद्यावर घेतली, याचं जास्त समाधान वाटलं असावं. कदाचित अनेक दिवसांनी कुणीतरी तिच्या आईचीच नाही, तर तिचीही काळजी घेतली होती.तीने मला घट्ट मिठी मारली. माझा खांदा तिच्या अश्रूनी ओला होतं होता आणि मी तिच्या आईच्याकडे पाहत होती.त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं...हेचं हवं होतं मला... काल त्यांचे डोळे मला काहीतरी सांगू पाहत होते.. ते बहुतेक हेचं असावं...
त्या क्षणी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली... तिला पैशांची मदत हवी होती की नाही, हे मला माहीत नाही; पण तिला माणसांची गरज नक्की होती. तिला तिच्या जुन्या मैत्रीची, त्या मोकळ्या गप्पांची, कुणीतरी आपलं आहे या भावनेची गरज होती आणि आम्ही सगळे कुठेतरी मागे सोडून पुढे निघून गेलो होतो. आपण तिला विसरलो नव्हतो कदाचित, पण तिची आठवण काढण्याइतकी उसंतही आपण स्वतःला दिली नव्हती.हा प्रसंग मला मनाला प्रश्न विचारायला भाग पाडतो.
आपण ज्यांच्यासोबत कधीकाळी खूप सुंदर दिवस घालवले, त्यांचं आयुष्य आज कसं सुरू आहे, याची चौकशी करणं एवढं अवघड आहे का?कसं आहे ना, आपण नव्या जगात रमलेलो असतो. आपल्याला आता आपल्या बरोबरीची माणसं हवी असतात. आपल्या यशाशी जुळणारं यश, आपल्या आर्थिक स्तराशी जुळणारी माणसं, आपल्या लाइफस्टाइलशी जुळणारे मित्र हवे असतात. मग ज्यांच्यासोबत कधीकाळी तासन्तास गप्पा मारल्या, ज्यांच्यासोबत आयुष्यातली सुख-दुःखं वाटली, ज्यांनी आपल्याला कठीण काळात मार्गदर्शन केलं, ज्यांच्यासोबत आपण स्वप्नं पाहिली, तेच लोक आपल्या आजच्या जगात बसत नाहीत का?त्यांच्याकडे आता सांगण्यासारखं नवीन काही नाही म्हणून आपण त्यांच्याशी बोलणं कमी करतो का? त्यांच्याकडे वीकेंडला जाण्यासाठी नवीन ठिकाणं नाहीत, महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याइतके पैसे नाहीत, आपल्या गप्पांमध्ये सहभागी होण्याइतका उत्साह नाही, म्हणून ते आपल्याला मागासलेले वाटू लागतात का?की, त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाची जाणीव ठेवण्याइतका वेळच आपण स्वतःला देत नाही?
आपण मित्र निवडताना त्यांची परिस्थिती, त्यांचं यश, त्यांचा स्टेटस पाहू लागलो आहोत का? आणि मैत्रीच्या नावाखाली माणसांपेक्षा त्यांच्या आयुष्याच्या सोयीला महत्त्व देऊ लागलो आहोत का? आपल्याला त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवता येणार नाहीत. त्यांचं आयुष्य पूर्वीसारखं करता येणार नाही. त्यांच्या समस्या आपल्याला जगता येणार नाहीत. पण एक फोन करता येऊ शकतो ना? एखादी भेट देता येऊ शकते ना? एखाद्या रविवारी त्यांच्यासोबत चहा पिता येऊ शकतो ना? कधी एखाद्याला पैशांपेक्षा वेळ हवा असतो. कधी सल्ल्यापेक्षा ऐकून घेणारं कान हवं असतं. कधी सहानुभूतीपेक्षा सोबत हवी असते. आणि कधी कधी फक्त एवढंच ऐकायचं असतं, "कसा आहेस? खूप दिवस झाले, तुझ्याशी बोललो नाही."
मैत्री म्हणजे नेहमी एकत्र फिरणं, फोटो काढणं, पार्टी करणं किंवा रोज बोलणं नाही. मैत्री म्हणजे अंतर वाढलं तरी आपुलकी कमी न होणं. परिस्थिती बदलली तरी माणसाचं महत्त्व कमी न होणं.आज तुमचा मित्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल, त्याचं लग्न झालेलं नसेल, संसार मोडलेला असेल, व्यवसायात नुकसान झालेलं असेल किंवा तो मानसिकदृष्ट्या खचलेला असेल, तर त्याचं आयुष्य तुमच्या आयुष्यापेक्षा कमी दर्जाचं होत नाही.प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाला एकाच वयात यश मिळत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे ऋतू एकाच वेळी येत नाहीत.
आज तुम्ही स्थिर आहात, उद्या कदाचित तुम्हालाही एखाद्या वळणावर कोणाच्या तरी साथीची गरज भासेल. आज तुम्ही कोणाला वेळ देऊ शकता, उद्या कदाचित तुम्हालाच कोणीतरी वेळ द्यावा असं वाटेल.म्हणून नात्यांमध्ये स्टेटस नको, संवेदनशीलता हवी. समान परिस्थिती नको, समान माणुसकी हवी.आपल्या यशाच्या प्रवासात सोबत असणाऱ्यांचा अभिमान बाळगाच; पण आपल्या संघर्षाच्या काळात सोबत चाललेल्या माणसांनाही विसरू नका.कारण काही माणसं आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवतात, तर काही माणसं आपल्यासोबत चालताना आपल्याला माणूस म्हणून घडवतात.
एकदा तरी मागे वळून पाहा.
तुमच्या जुन्या मित्रांच्या यादीत एखादं नाव असं असेल का, ज्याच्याशी बोलून खूप वर्षं झाली आहेत? एखादी मैत्रीण असेल का, जी कधीकाळी तुमच्याशिवाय कुठेच जात नव्हती, पण आज तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, हेही तुम्हाला माहीत नाही?
एखादा मित्र असेल का, जो पूर्वी प्रत्येक आनंदात तुमच्यासोबत असायचा, पण आज स्वतःच्या अडचणींशी एकटाच झगडतोय?
शोधा त्यांना. फोन करा. भेटा. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, ते विचारा. त्यांना तुमच्या नव्या जगात सामील करून घ्या. आणि शक्य असेल तर त्यांच्या जगातही थोडा वेळ घालवा.तुमच्या एका भेटीने त्यांची परिस्थिती बदलणार नाही कदाचित; पण त्यांना पुन्हा एकदा आपलं कोणीतरी आहे, ही जाणीव नक्की होईल.
आयुष्याच्या प्रवासात पुढे जाणं चुकीचं नाही. नवे मित्र जोडणं चुकीचं नाही. स्वतःचं आयुष्य सुंदर बनवणंही चुकीचं नाही. पण या सगळ्यात आपल्याला घडवणारी, आपल्याला साथ देणारी, कधीकाळी आपल्यासाठी वेळ देणारी माणसं हरवू देणं मात्र नक्कीच टाळता येऊ शकतं.
म्हणून एकदा तरी मागे वळून पाहा...
कुणी मागे पडलंय का, कुणी शांत झालंय का, कुणी आपल्याला हाक मारणं सोडून दिलंय का, कुणी गर्दीत असूनही एकटं पडलंय का?
कदाचित कोणीतरी तुमच्या एका फोनची वाट पाहत असेल. कोणाला तरी तुमच्यासोबत पुन्हा एकदा मनमोकळं हसायचं असेल. कोणाला तरी फक्त एवढंच ऐकायचं असेल..
" मी आहे तुझ्या सोबत... "
- नमिता दोंदे ,( डोंबिवली )
7045297638