CRIME BORDER | 23 November 2026 | 10:22 AM
ठाणे :- जागतिक शौचालय दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात दि. १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छ शौचालय, गरिमामय भविष्य’ अभियान राबविण्यात येत आहे. शौचालयांची स्वच्छता, सुरक्षितता, दुरुस्ती आणि नियमित वापर यावर भर देतानाच शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयांची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश शौचालय वापरापुरता मर्यादित न ठेवता त्यांची नियमित देखभाल, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे हा आहे. गावामध्ये तसेच शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये असलेल्या शौचालयांची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. विशेषतः महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींना सुरक्षित व सुलभ सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, महिला बचत गट तसेच नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उत्कृष्ट सार्वजनिक स्वच्छता संकुले, संस्थात्मक आणि वैयक्तिक शौचालयांचे मूल्यमापन करून त्यांना गौरविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती, शौचालयांची नियमित स्वच्छता आणि देखभाल यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंडित राठोड सांगितले की, शौचालयांची उपलब्धता यासोबतच त्यांची स्वच्छता, सुरक्षितता आणि नियमित वापर याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अभियानाच्या कालावधीत शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत व सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयांची पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी संबंधित यंत्रणांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) अजिंक्य पवार यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, महिला बचत गट आणि नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. शौचालयांची स्वच्छता ही केवळ सरकारी योजनेपुरती मर्यादित न राहता आरोग्य, सुरक्षितता आणि प्रतिष्ठेशी संबंधित बाब आहे. त्यामुळे स्वच्छ शौचालय आणि त्याचा नियमित वापर ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून स्वच्छता व शौचालय वापराबाबत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
०००