CRIME BORDER | 23 November 2026 | 12:00 PM
हो मी सिंगल आहे आणि प्रेमात ही आहे… कसं शक्य आहे ना??
पुरुष आणि स्त्री या दोघांसाठी हे लागू होतं…पण खास महिलांना मात्र नेहमीप्रमाणे अधिक समाजाच्या प्रश्नांना आणि नजरांना सामोरं जावं लागतं…
प्रेमाच्या भावना आमच्यासाठी वर्ज्य ? आमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आमचं बोलणं, वागणं, आमच्या भावना यातून सतत आम्हांला जज केल जातं… प्रेम फार सुंदर भावना आहे…आणि ती आम्हांलाही कळते, जाणवते… कसं असतं ना,
आपल्या आयुष्यात काही घटना घडतात. काही नाती बदलतात, काही नाती संपतात, तर काही नाती कधीच अस्तित्वात येत नाहीत. आणि या प्रत्येक घटनेसोबत समाजाकडून काही अलिखित नियम आपल्या आयुष्यावर लागू केले जातात.
विशेष म्हणजे हे नियम कोणी लिहिलेले नसतात, कोणी आपल्याला हातात आणून दिलेले नसतात. पण समाजात राहायचं असेल तर ते आपोआप आपल्या समोर येतात. कधी लोकांच्या बोलण्यातून, कधी त्यांच्या नजरेतून, तर कधी त्यांच्या अनाहूत सल्ल्यांमधून! आणि आम्ही या सगळ्यात नकळत अडकत जातो…
समाज एखाद्या स्त्रीची वैवाहिक परिस्थिती पाहून तिच्या भावनांची पात्रताच ठरवतो. तिचं लग्न झालं नाही, लग्न तुटलं किंवा जोडीदार हरपला, की तिच्या आयुष्यावर काही अलिखित नियम लादले जातात. जे आम्ही सुद्धा नकळत पाळायला लागतो… आम्ही कसं राहायचं, कसं दिसायचं, काय बोलायचं, काय लिहायचं, कोणती गाणी ऐकायची आणि सोशल मीडियावर कोणते विचार मांडायचे याचंसुद्धा जणू सामाजिक ऑडिट सुरू होतं!
मी घटस्फोटीत आहे, मी विधवा आहे किंवा मी सिंगल आहे आणि मला लग्न करायचं नाही. या प्रत्येक परिस्थितीमध्ये समाजाने आपापल्या परीने काही मर्यादा आखून ठेवलेल्या आहेत. जणू या स्त्रियांच्या आयुष्यातून प्रेम नावाची भावना कायमची हद्दपार झालेली असते.… मला एक प्रश्न पडतो, प्रेम करण्याचा अधिकार हा नेमका कोणत्या नात्याच्या प्रमाणपत्रावर अवलंबून असतो? एखाद्या स्त्रीने सोशल मीडियावर एखादा सुंदर विचार ठेवला, प्रेमावरची कविता शेअर केली, एखादं रोमँटिक गाणं स्टेटसला ठेवलं किंवा स्वतःचा छानसा फोटो पोस्ट केला, तर त्यामागचा अर्थ शोधण्याची लोकांना इतकी घाई का असते? तिने फोटो ठेवला म्हणजे ती पुन्हा प्रेमात पडली असेल. प्रेमाचं गाणं ठेवलं म्हणजे ती अजूनही भूतकाळातून बाहेर पडलेली नाही. एखादी कविता शेअर केली म्हणजे तिच्या आयुष्यात कोणीतरी नवीन आलं असणार! एखाद्या मित्रांसोबत फोटो ठेवलाच तर चारित्र्यवर बोट ठेवलंच जाणार… अहो ते सोडा हल्ली मैत्रिणी सोबतचे फोटो ठेवले तरी भुवया उंचावून…हिची टेस्ट बदलंली वाटतं…इतकं बोलणारी लोक ही आहेत आजूबाजूला… एक तर ह्या स्त्रियांनी लेबल असलेलं नातं तयार करायच किंवा मग एकटंच राहायचं… पण कोणी निःस्वार्थपणे तिची काळजी घेत असेल, आधार देतं असेल…तीला उभं करत असेल…तर ते चुकीच्याच चष्म्यानी बघायची सवय झालेली आहे…
आम्हांला ही आवडू शकतात विरह गीत, रोमँटिक गाणी..अहो, एखादी कविता मनाला स्पर्श करू शकते ना? एखाद्या सुंदर फोटोमध्ये स्वतःचं सौंदर्य अनुभवावंसं वाटू शकतं ना? प्रत्येक भावनेमागे एखादी व्यक्तीच असली पाहिजे, असा नियम कोणी केला?
सिंगल असणाऱ्या व्यक्तींना तर प्रेम समजतच नाही, असा एक वेगळाच समज आहे. ज्यांच्या आयुष्यात जोडीदार नाही, त्यांना प्रेमाची भाषा कशी कळणार? त्यांना नात्यांची खोली कशी समजणार?
पण मला सांगा, प्रेम समजण्यासाठी एक चेहरा हवाच असतो का? आपण निसर्गावर प्रेम करू शकतो, पावसावर, मातीच्या गंधावर, एखाद्या जुन्या गाण्यावर, पुस्तकावर, आपल्या कुटुंबावर, मित्रमैत्रिणींवर प्रेम करू शकतो. एखाद्या निर्जीव वस्तूशीसुद्धा आपल्या भावना जोडलेल्या असतात ना?
मग या सगळ्या प्रेमाला काय नाव द्यायचं?
आम्हाला भावना कळतात. आम्हाला शब्दांचा अर्थ कळतो. आम्हीही प्रेमात असतो. कधी एखाद्या व्यक्तीच्या, कधी एखाद्या आठवणीच्या, कधी एखाद्या नात्याच्या, तर कधी आम्ही स्वतःसाठी निर्माण केलेल्या छोट्याशा सुंदर जगाच्या!
आम्ही संवेदनशील आहोत. कदाचित आयुष्यातील काही अनुभवांनी आम्हाला प्रेमाची किंमत आणखी जास्त शिकवली असेल. नातं फुलवणं, जपणं, समजून घेणं आणि कधी कधी एखाद्या नात्यापासून दूर राहणंसुद्धा आम्हाला जमू शकतं.. आम्ही कमालीचे रोमँटिक असू शकतो याचा अंदाज तुम्हांला येणारही नाही…कारण तुम्ही डोकावत नाही आमच्या मनात तुम्ही शोधत राहतात आमच्या बाह्य जगातील आमच्या खुणा…
आम्हीही हसतो, लाजतो, स्वप्न पाहतो, प्रेम करतो आणि प्रेमात रमतो.
मरीन ड्राइव्ह वर एकटं बसून, हातात कवितेचं पुस्तकं आणि एक कप चहा हिच आमची डेट असू शकते. समुद्राचा आवाज आमच्यासोबत बोलू शकतो… वाऱ्याचा होणाऱ्या हळुवार स्पर्शाने आमचं ही मनं मोरपीस होतं…
आमच्या आयुष्याची परिस्थिती बदलली असेल, आमच्या नात्यांची ओळख बदलली असेल; पण म्हणून आमचं मन, आमच्या आवडीनिवडी, आमची स्वप्नं आणि आमच्या भावना संपत नाहीत… मुळात कसं आहे समाजाला इतकंच कळत.. प्रेम म्हणजे एक चेहरा हवा आणि सेक्स हवा… म्हणजे ती व्यक्ती प्रेमात आहे…आणि ती व्यक्ती परिपूर्ण आहे.
किती संकुचितपणे बांधून टाकतो प्रेमासारख्या सुंदर भावनेला… आणि हो तुम्हाला आमच्या प्रेमासाठी एखादा चेहराच हवा असेल, तर आमचा सखा कृष्ण आहे. त्याच्यात आम्ही आमची सगळी नाती शोधतो. कधी मैत्री, कधी वात्सल्य, कधी सख्यभाव, तर कधी निस्सीम प्रेम!
मग आतातरी आमच्या भावनांचं मोजमाप तुमच्या ठरवलेल्या सामाजिक चौकटीतून करणं बंद करा…
आजूबाजूला अनेक स्त्रिया अदृश्य दडपणाखाली जगत असतात आणि हे प्रत्येकीला पटेल…मी काय लिहिते, कोणतं गाणं ऐकते, कोणता फोटो ठेवते, प्रेमाबद्दल काय बोलते, याकडे माझं कुटुंब, मित्रपरिवार आणि समाज लक्ष ठेवून आहे, याची त्यांना सतत जाणीव असते. मग हळूहळू त्या स्वतःलाच आवर घालू लागतात. मनात प्रेम असतं, पण ते व्यक्त करायला संकोच वाटतो. एखादी कविता आवडते, पण शेअर करावी की नाही याचा विचार करावा लागतो. किती विचित्र आहे ना! स्वतःच्या भावनांवरही आपण सामाजिक पहारा बसवून घेतो. घरातले ही मग या समाजाच्या नजरेने आमच्याकडे पाहायला लागतात…
Nightout नको, Outing नको, घराच्या बाहेर उभं राहून बोलू नकोस…कोणाशी इतकं हसून बोलतेस? रात्रीचेच सिनेमे का पाहायचे असतात तुम्हांला?आणि कोणी स्वतःला सिद्ध करत असेल तर, कोण ही Parenting Coach? अरे हिचीच मुलं वडिलांकडे राहतात… लग्ना आधी समुपदेशन आवश्यक असं सांगणारी हिच सिंगल आहे अजून…अरे आपण सोडा काल पर्वा मी वाचलं, मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर हिने मॅट्रिमोनी साईड च प्रमोशन करणारी जाहिरात केली त्यावरही लोकांनी तीला ट्रोल केलंय… स्वतःच लग्न वाचवलं नाही आणि आमची लग्न जुळवून देणारं… मला इथे न लिहता येणार बरंच काही म्हंटल गेलं… इतकं कसं खच्चीकरण करू शकता? कधी विचार करा किती कठीण जातं असेल आम्हांला तुमच्या या नजरानमधून उभं रहाण्यासाठी…
मला वाटतं, प्रत्येक स्त्रीला प्रेम व्यक्त करण्याचा, प्रेम अनुभवण्याचा आणि ते स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिच्या वैवाहिक स्थितीने तिच्या भावनांची व्याख्या ठरवू नये. आम्ही आनंदी आहोत…आम्हांला आम्ही जे फील करतोय ते व्यक्त करू दया.. खरं सांगू, समाजाला स्त्रीच्या एकटेपणापेक्षा तिचं त्या एकटेपणातही आनंदी असणं जास्त खटकत असावं. कारण एकटी असलेली स्त्री दुःखी असेल, भूतकाळात अडकलेली असेल, तर तिच्याबद्दल समाजाला सहानुभूती दाखवता येते. पण तीच स्त्री स्वतःच्या आयुष्यात आनंदी असेल, स्वतःवर प्रेम करत असेल, नटत असेल, सुंदर फोटो ठेवत असेल, प्रेमाची गाणी ऐकत असेल, तर मात्र प्रश्न सुरू होतात. जणू तिच्या आनंदालाही समाजाची परवानगी लागते!
स्त्री एकटी आहे, यापेक्षा ती एकटी असूनही पूर्ण आहे, हे स्वीकारणं समाजाला अधिक कठीण जात असाव!
शेवटी, इतकंच सांगेन सख्यानो…
मनं मोकळेपणाने वागा…नका पर्वा करू कोणाची… भावना व्यक्त करा…प्रेम व्यक्त करा…तुम्हांलाच ही भिंत तोडावी लागेल…तुम्ही करू शकलात तर अनेकांना या भिंतीची भीती वाटणार नाही…
आणि तुम्ही….हो तुम्हीच… कसं आहे ना,
“आमच्या आयुष्याचं स्टेटस बदललं म्हणून आमच्या मनातल्या भावनांचं स्टेटस बदलत नाही!”
लक्षात ठेवा…
सिंगल आहे पण प्रेमात आहे….
- नमिता दोंदे ( डोंबिवली )