CRIME BORDER | 17 December 2025 | 01:12 PM
मुंबई : हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी) मार्फत अर्जदारास व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना व एनएसएफडीसी योजना राबविण्यात येत आहे. २०२५–२६ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जातीमधील हिंदू खाटीक या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
अनुदान योजना : या योजनेची प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपये असून प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरित रक्कम बँकामार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे तीन वर्षांत करावयाची आहे.
थेट कर्ज योजना : या योजनेची प्रकल्प मर्यादा १ लाख रुपये पर्यंत असून प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरित रक्कम ५० हजार रुपये महामंडळामार्फत चार टक्के दराने देण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे तीन वर्षांत करावयाची आहे.
या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता – अर्जदार अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक संवर्गातील असावा व त्याचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. राज्य महामंडळाच्या योजनांकरिता वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी व ग्रामीण भागाकरिता तीन लाख रुपये इतकी आहे. अर्जदार हा महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा (राज्य / केंद्र) थकबाकीदार नसावा.
अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे
जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला, पाच पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड प्रत, पॅनकार्ड, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुसार इतर आवश्यक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल.