CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
ठाणे :- महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी पी.एच.डी. अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. लक्षित गटातील उमेदवारांना संशोधनासाठी सहाय्य व्हावे, त्यांना संशोधन क्षेत्रात संधी मिळावी, त्यांचा विकास व्हावा, या हेतूने पी.एच.डी. अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते.
पी.एच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेंतर्गत दिल्या जात असलेल्या अधिछात्रवृत्तीने विद्यार्थ्यांना निश्चिंत होऊन संशोधन कार्य करता येते. संशोधनासाठी लागत असलेले संदर्भ ग्रंथ घेता येतात. अहवाल तयार करण्यासाठी प्रवास करता येतो. अभ्यासासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देता येतात. आज या अधिछात्रवृत्तीचा लाभ घेऊन विद्यार्थी संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यापीठात शिकवित आहेत. आपले आणि आपल्या येणाऱ्या पिढीचे करिअर घडवीत आहेत.
वर्ष 2021 मधे निवड झालेल्या 648 विद्यार्थ्यांना जुलै ते डिसेंबर या कालावधीत तसेच वर्ष 2022 मध्ये निवड झालेल्या 1 हजार 236 विद्यार्थ्यांना नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत एकूण 24 कोटी 17 लक्ष 87 हजार 749 रुपये इतकी अधिछात्रवृत्ती देण्यात आली आहे. महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती सोबत घारभाडे व आकस्मिक निधी देखील देण्यात येतो.
यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी परीक्षा पास असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. योजनेच्या शर्तीनुसार नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतात.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा अध्यक्ष, महाज्योती, नागपूर श्री. अतुल सावे यांनी पी.एच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन संशोधन कार्यात करिअर घडवावे, असे आवाहन केले आहे.