CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
ठाणे :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) मार्फत संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सन 2023-24 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी दि. 10 एप्रिल 2023 ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्याअंतर्गत असलेल्या या संस्थेमार्फत वर्ष 2023-24 साठी महाज्योतीतर्फे एमपीएससी आणि युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन सूचना फलक या सदरातील एमपीएसी व यूपीएससी ट्रेनिंग या टॅबवर अर्ज करावे.
एमपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण
एमपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पध्दतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा नियोजित कालावधी 11 महिने आहे. प्रशिक्षणाकरीता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरीता रुजू होतील त्या दिनांकापासून महाज्योतीच्या धोरणानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांनाच प्रतिमाह दहा हजार रुपये विद्यावेतन लागू होईल. एकवेळ आकस्मिक खर्च रुपये बारा हजार रुपये देण्यात येणार आहे.
यूपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण
यूपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण 11 महिन्यांचे पूर्व, मुख्य तसेच व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षणासोबत अभ्यास साहित्य घरपोच देण्यात येईल. पुणे येथे प्रशिक्षणासाठी निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना रुपये दहा हजार प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ आकस्मिक खर्च रुपये बारा हजार देण्यात येईल. दिल्ली येथे ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना रुपये 13 हजार प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ रुपये 18 हजार आकस्मिक खर्च देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-
अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, मार्कशीट अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक जोडावे. पासबूक किंवा रद्द केलेला धनादेश जोडावा.
प्राप्त अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल. विद्यार्थ्यांची राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार गुणवत्तेच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्याची प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.