CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
ठाणे : रब्बी हंगाम २०२२ च्या ई-पीक पाहणीची कार्यवाही १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाली असून ३१ जानेवारी पर्यंत नोंदविण्याची अंतिम तारीख होती, मात्र मान्सून उशीरापर्यंत लांबल्याने ही मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासाठी सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅप सुधारित आवृत्ती - २ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी अॅप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून रब्बी हंगामातील पाहणी विहित वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे. ई-पीक पाहणीच्या नोंदी या पिक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई, किमान आधारभूत किमतीनुसार धान्य खरेदी इत्यादी बाबीसाठी आवश्यक आहे. गेल्या वर्षीच्या अँपमध्ये सुधारणा करून नवीन सुविधायुक्त अँप यावर्षीच्या सुरू करण्यात आलेली आहे.
अशी आहे सुविधा
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदवलेली पीक पाहणी ४८ तासांमध्ये स्व:ताहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार आहे. त्या आधारे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्याची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. पूर्वीच्या मोबाईल अॅप मध्ये असलेल्या मुख्य पिके व दुय्यम पीके नोंदवण्याच्या सुविधेऐवजी तीन दुय्यम पिके नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदवण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची ही अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयम घोषणापत्र घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली पिक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येईल. ही पीक पाहणी गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील.
अॅप वापरकर्त्याला ई-पीक पाहणी मोबाईल अॅप वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी अॅपमध्ये मदत हे बटन देण्यात आलेले आहे. या बटनावर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. त्याचा वापर करून शेतकरी अँप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतात, असे विभागीय कृषी सहसंचालक श्री. माने यांनी कळविले आहे.