CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कोकणात हळद लागवडीत लक्षणीय भर

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

कोकणात हळद लागवडीत लक्षणीय भर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नुकतीच रत्नागिरी येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध लोकप्रतिनिधींनी विविध मागण्या आणि उपाय सूचविले. त्यात कोकणात होणारी वाढती हळद लागवड लक्षात घेऊन हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र, विकास विषयक प्रकल्प कोकणात असावे अशी मागणी करण्यात आली आणि मा.मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला हे विशेष होय.

महाराष्ट्र शासनाने बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र हिंगोली तालुक्यातील वसमत येथे उभारण्याची घोषणा करून त्यासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. याच केंद्राचे उपकेंद्र कोकणात व्हावे अशी मागणी सद्या जोर धरत आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी हे उपकेंद्र महत्त्वाचे ठरेल.

देशात अनेक राज्यात हळदीचे उत्पादन घेतले जाते. गेल्या तीन वर्षापासून देशात हळदीचे उत्पादन वाढते आहे. गतवर्षी देशात 13 लाख 30 हजार 12 टन इतक्या हळदीचे उत्पादन झाले. 2020-21 या वर्षात 11 लाख 23 हजार 857 टन हळदीचे उत्पादन मिळाले. यंदा हंगामात गेल्या वर्षी इतकेच हळदीचे उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. कोकण विभागाचा विचार केल्यास पालघर-4.25 हे., ठाणे-10.00 हे., रायगड-27.85 हे., रत्नागिरी-60.00 हे., आणि सिंधुदूर्ग जिल्हयात 95.00 हे. असे कोकण विभागात एकूण 197.01 हे. एवढ्या क्षेत्रात हळद लागवड करण्यात आली आहे.

हळद हे एक मसाले वर्गातील नगदी पीक आहे. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र 1,25,800 हेक्टर असून उत्पादन 5,50,185 मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ 80 टक्के उत्पादन भारतामध्ये होते. त्यापैकी 15 ते 20 टक्के फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेशचा असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली 8,500 हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 42,500 मेट्रिक टन इतके होते. भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे जम्मू काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ शकते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ आता होऊ लागली आहे. राज्यात सर्वच जिल्हयात कमी अधिक प्रमाणात हळद लागवड होते.

हळदीचे औषधी गुणधर्म

आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे, हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे, पायावर सूज आल्यास हळद, गुळ व गोमुत्र गरम करून प्यावे,डोळ्याचे विकारावर हळकुंड तुरीच्या डाळीत शिजवून डोळ्यात अंजन करावे, डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व 4 ते 5 थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते, धार्मिक कार्यक्रमात तसेच हळदीपासूनचे कुंकू, हळद, लग्नकार्य, पूजा, भंडारा, सौंदर्य प्रसाधने व अनेक पोषक घटक तयार करतात.

हळदीच्या विविध जाती

हळदीच्या जातीत फुले स्वरूप : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सेलम : सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी या जातीची शिफारस केली आहे. कृष्णा (कडाप्पा): या जातीला स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात व राजस्थान राज्यांतून चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. खाण्याची हळद (Curcuma Longa ) : ही बहुवर्षीय जात असून ६० ते ९० सें.मी. उंच वाढते. पानांना खमंग वास असून फळे तीनधारी असतात. कस्तुरी किंवा रानहळद (Cucuma Caesia) : ही जात वार्षिक असून महाबळेश्वर, कोकण विभाग आणि आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कंद मोठे गोलाकार, फिकट पिवळे (आत नारिंगी लाल) असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या (हळकुंडास) गोड वास असतो. 6.1 टक्के हिरवट तपकिरी तेल, कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इस्ट इंडियन अॅरोरूट (East Indian Aroroot) : मध्यभारत, बंगाल, महाराष्ट्रा, तामिळनाडुच्या डोंगराळ भागात व हिमालयात या जातीची लागवड आढळते.आंबेहळद (Curcuma Amada) : कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. औषधी हळद म्हणून ओळख आहे. काळी हळद (Curcuma Caesia) : बंगालमध्ये आढळते. ताजे कंद फिकट पिवळे, सुवासिक, सौंदर्यप्रसाधनात वापरतात. कंदामध्ये 9.76 टक्के सुवासिक तेल असते. कचोर (Curcuma Zedoria) : वार्षिक जात असून कोकणात सर्वत या जातींची लागवड आढळते.

कोकणातील प्रयोग

कोकणात पारंपारिक पिकासोबत आत्ता नाविन्यपूर्ण लागवडीचे प्रयोग होत आहेत. हळद लागवडीच्याबाबत रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, ठाणे, पालघर जिल्हयात अनेक शेतकरी विविध प्रयोग करतांना दिसतात. त्या प्रयोगांची दखल राज्याच्या कृषि विभागाने घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे. रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यात साखरपाजवळ 25 गुंठे क्षेत्रावर दिलीप शांताराम चव्हाण या तरुणाने सेंद्रिय हळद लागवड यशस्वी केली आहे. तर गुहागर तालुक्यातील वरवली येथे क्षितीज शिंदे यांनी हळद लागवड करून शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उभा केला आहे. मंडणगड तालुक्यातील शेतकरी सुरेश लोखंडे यांनीही यशस्वी प्रयोग केला. 10 ग्रॅम हळकुंडाच्या रोपापासून 3 किलो 800 ग्रॅम हळदीचा गड्डा पिकविण्यात यश मिळविले. रायगड जिल्हयातील इंदापूर येथील प्रगतशील शेतकरी राजेश कोळवणकर यांनीही हळद लागवड यशस्वी करून नवा आदर्श उभा केला आहे. ठाणे जिल्हयातील “तारपा” हळद आदिवासी बांधवांनी बाजारात आणली. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद यासाठी लाभला. भाताचे कोठार समजले जाणारे कोकण आता हळद उत्पादनाचे प्रयोग करू लागले आहेत. हे विशेष होय.

एकूणच लहरी हवामान, वारंवार येणारी आपत्ती यातून शाश्वत शेती सोबतच नगदी पिक म्हणून हळद लागवड कोकणात यशस्वी होत आहे.म्हणूनच कोकणात हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र आवश्यक असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे विशेष होय. भविष्यात हे केंद्र उभे राहिल्यास काजू, आंबा, भात, नाचणी, सुपारी, नारळ सोबतच कोकणात हळद उत्पादनात अव्वल ठरेल असा विश्वास व्यक्त करायला काय हरकत आहे.?

प्रविण डोंगरदिवे - उपसंपादक ,विभागीय माहिती कार्यालय

कोकण विभाग, नवी मुंबई