CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
ठाणे, दि. 26 : - शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम. किसान) सुरू केली आहे. या योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ई केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन विभागीय कृषि सहसंचालकांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्रति वर्ष सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य दर चार महिन्यानी तीन टप्प्यामध्ये उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना ओळखीची कागदपत्रे (केवायसी) प्रमाणीकरणाची प्रक्रिया केंद्र शासनाने बंधनकारक केली आहे. हे ई केवायसी प्रमाणीकरण करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 आहे. ज्या नोंदणीकृत लाभार्थ्यांनी प्रमाणीकरण पूर्ण केले नाही, अशा लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा ऑगस्ट, 2022 नंतरच्या लाभाची दोन हजार रुपयांची रक्कम तसेच पुढील उर्वरित हप्त्याचा लाभ जमा होणार नाही, असे विभागीय कृषी सहसंचालकांनी कळविले आहे.
ई केवायसीसाठी पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in संकेतस्थळावर लाभार्थ्यांनी स्वतःच्या आधार जोडणी केलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे ई केवायसी माणीकरण पूर्ण करावे. अथवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत बायोमेट्रिक्सच्या आधारे ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी 15 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. सर्व लाभार्थ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पूर्वी आपली ई केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया मोबाईलद्वारे किंवा सीईसीमार्फत पूर्ण करावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.