CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
ठाणे: कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांकरिता “हवामान अंदाज आणि कृषि तज्ञांचा सल्ला" हा कार्यक्रम दर शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजता युट्युबवरून प्रसारित होणार आहे. आठवड्यातील हवामान अंदाजानुसार शेतीच्या कामांचे नियोजना बाबत कृषि व हवामान क्षेत्रातील तज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल.
या कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक १० जून रोजी करण्यात आला. कृषी आयुक्त धीरज कुमार, भारतीय हवामान शास्त्र विभागाचे के.एस. होसाळीकर, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे डॉ.के. के. डाखोरे यांनी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले.
हवामानातल्या विविध घटकांचा पिकांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे हवामान अनुरूप शेतीच्या कामांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हवामान बदलामुळे दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी इत्यादी रूपांनी शेतीसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या कार्यक्रमामध्ये हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बियाणे नियोजन, पेरणी, मशागतीची कामे, कीड-रोग नियंत्रण, फळपिकांचे व पशुधनाचे संरक्षण इत्यादी कसे करावे याबाबत तज्ञांचा सल्ला प्राप्त होणार आहे.
ठाणे विभागातील शेतकरी बांधवांनी दर शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजता कृषी विभागाच्या https://www.youtube.com.//AgricultureDepartmentGoM या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.