CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
कल्याण दि.२५: 'चेस द वायरस' हे महत्वाचे असून, वायरस व्यक्ती पर्यंत पोहचविण्या आधी यंञणा पोचली पाहिजे, असे झाले तर हे युध्द आपण जिंकू शकू, असे उदगार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी आज काढले. डोंबिवली पूर्व येथील पाटीदार भवन व कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशन मधील कोव्हिड रुग्णांसाठी समर्पित आरोग्य केंद्र, त्याच प्रमाणे गौरीपाडा, कल्याण पश्चिम येथील महापालिकेच्या स्वॅब टेस्टिंग सेंटर यांच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळया समयी त्यांनी हे उदगार काढले. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र शासन खंबीर आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा जनतेला पुरविणेसाठी शासन कटीबध्द आहे. वाढती रूग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच वायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठया प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
नुसती औषधे व बेड टाकुन उपयोग नाही , रूग्णसेवा महत्वाची आहे. कोरोना मुळे सर्वत्र भयाचे वातावरण आहे, पण सुमारे 90 टक्के रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. कॉरंन्टाइन सेंटर मध्ये भयाचे वातावरण राहु नये म्हणुन मानसोपचार तज्ञांची नेमणूक करावीत, अश्याही सूचना मा.मुख्यमंत्री यांनी यावेळेस दिल्या.
डगमगू नका, मागे पडू नका, तुम्हाला जे जे लागेल , ते मी पुरविण्याचे वचन देतो, पण मला रिझल्ट हवाय. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाज, मुंबई यांनी पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करुन दिली असून सदर इमारत ही तळ + 4 मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे 5000 स्क्वे.फीट च्या प्रशस्त जागेत 70 बेड त्यापैकी 60 ऑक्सिजन सुविधा असलेले व 10 सेमी आयसीयू बेड असणार असून दुस-या मजल्यावर काम करणारे डॉक्टरर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिस-यामजल्यावरती 5000 स्के.फीट च्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड व 4 थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड रुग्णांकरीता उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कँन्टींग सुविधा उपलब्ध असून सीसीटीव्ही कॅमेरे व रुग्णांकरीता उदवाहन देखील पाटीदार समाजाने पुरविले आहे. सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वॉयफाय सिस्टिम तसेच रुग्णांचे तणाव रहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात 1 रुपी क्लिनीक डॉ. राहुल घुले यांचेमार्फत चालविण्यात येणार असून एकुण 2 एमडी फिजीशियन, 25 निवासी डॉक्टर ,50परिचारिका व 30 हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांचा सेवेसाठी तैनात राहणार आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात रूग्णांचे वाढते प्रमाण पाहता कॉन्टक्ट ट्रेसिंगचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढले आहे. परंतू दिलासा दायक गोष्ट म्हणजे महापालिका व लोकप्रतिनिधी मिळुन काम करीत आहेत. महापालिकांना आर्थिक मर्यादा आहेत, पण मा. मुख्यमंञी यांचे मार्गदर्शना नुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत आहेत, असे पालकमंञी ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
कोरोना साथीवर प्रतिबंध करण्यासाठी महापालिका करित असलेल्या उपाययोजनांची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, प्रमोद पाटील, रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती विकास म्हाञे, विरोधी पक्ष नेते राहुल दामले, परीवहन सभापती मनोज चौधरी इतर नगरसेवक व महापालिका अधिकारी वर्ग उपस्थित होता.