CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
मुंबई (नितिन सैद) : दिल्लीपासून गल्लीपर्यंत भ्रष्टाचार असल्यामुळे सामान्य जनतेचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. 'सर्वसामान्यांचा आधार, आपले मानवाधिकार...' या ब्रीद वाक्याचा आधार घेऊन कार्यरत असलेल्या आपले मानवाधिकार फाउंडेशन ने 'भ्रष्टाचार मुक्त अभियान ' सुरू करण्याचे ठरविले. फाउंडेशन चे संचालक डॉ.दिपेश पष्टे व सहसंचालक वैभव हरड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत 'भ्रष्टाचार मुक्त अभियान' चा ऑनलाईन कार्यारंभ सोहळा आज संपन्न झाला.
महाराष्ट्रातील भ्रष्टाचार हा शिगेला पोहोचला असून सामान्य जनता त्यामध्ये होरपळली जात आहे. म्हणून आपण जनजागृती करून तसेच काही नियमावली तयार करून या भ्रष्टाचाराला आळा घालू शकतो. अशी संकल्पना डॉ.दिपेश पष्टे यांनी फाउंडेशन च्या सर्व पदाधिकारी यांच्या मनात रुजवली. अखेर सर्व पदाधिकार्यांनी एकजुटीने आणि हिमतीने याविरोधात आवाज उठवण्याचे ठरवले आणि शासनाकडे काही शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना नियम लागू करण्यासाठी नियमावली तयार केली व त्याची मागणी करून सर्व जिल्हास्तरावर चौकशी करावी असा आग्रह धरला असून याबाबतचे निवेदन महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना देण्याचे ठरले आहे. तसेच या मागण्या पूर्ण न केल्यास संबंधित सविस्तर माहिती सोशल मीडिया तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देऊन याबाबत एक चळवळ उभी केली जाईल, असेही जाहीर केले आहे.
भ्रष्टाचार मुक्त अभियान ' च्या माध्यमातून असलेल्या मागण्या: १) अद्यायावत नागरिकांची सनद कार्यालयाच्या आवारात लावण्यात यावी. २) सेवाहमी कायद्यांतर्गत सर्व बाबींची माहिती कार्यालयाच्या आवारात लावण्यात यावी. व त्याप्रमाणे शुल्क आकारणी करावी. ३) माहिती अधिकार अधिनियम २००५, कलम ४ अन्वये प्रसिद्ध करावयाची अद्यायावत (प्रत्येक ६ महिन्यांनी) केलेली माहिती लोकांना पाहण्यासाठी कार्यालयात उपलब्ध करण्यात यावी. ४) केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या मार्फत सुरु असलेल्या योजनांची सविस्तर माहिती आणि या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त समितीची संपर्क क्रमांकासह कार्यालयाच्या आवारात फलक लावण्यात यावी ५) प्रत्येक शासकीय कार्यालय CCTV च्या कक्षेत असावीत. असल्यास CCTV सुस्थितीत असावा. ६) कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जावर विहित मुदतीत, कायदेशीर कार्यवाही केली जाते की नाही हे पाहण्यासाठी दर ३ महिन्यांनी प्राप्त अर्जाचे/कामाचे ऑडीट करून त्याची नोंद संबधित अधिकारी यांच्या सेवापुस्तिकात करण्यात यावी. ७) कार्यालयात उपस्थिती बाबत कर्मचारी/अधिकारी यांच्यासाठी बायोमेट्रिक्स किंवा सेल्फी अटेंडन्स प्रणालीचा वापर करण्यात यावा. ८) सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे या फलकाबरोबर सरकारी कर्मचारी/अधिकारी यांच्या गैरवर्तुणूकी बाबत करण्यात आलेल्या कायद्याचे फलक कार्यालयात लावण्यात यावे. ९) कर्मचारी/अधिकारी यांच्या कार्यालयात त्यांची कार्य, कर्तव्य नांव आणि पदनाम यांचे फलक संपर्क क्रमांकासहीत लावण्यात यावे १०) संबधित शासकीय कार्यालयात तक्रार निवारणासाठी संपर्क क्रमांक व ईमेल आयडी असलेला फलक लावण्यात यावा ११) कार्यालयीन कामकाज कश्याप्रकारे सुरु आहे हे पाहण्यासाठी भरारी पथक नियुक्त करण्यात यावे. १२) शासकीय कार्यालय अनधिकृत खाजगी कर्मचारी व एजंट मुक्त करण्यात यावे. १३) नागरिकांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन म्हणून Whatsapp no. प्रसिद्ध करण्यात यावा.
सदर कार्यक्रम प्रसंगी अन्न व औषध ग्राहक कल्याण समितीचे राष्ट्रीय पदाधिकारी, शिरस्तेदार नामदेव कोळी, वडार समाज सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रामलिंग पवार, रायगड शिवसेना उपतालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे,पत्रकार अरुण कुलकर्णी, जनसेवा संघटनेचे सदस्य सुनील पवार,लोकमत चे पत्रकार विश्वनाथ सोनवणे, महाराष्ट्र टीचर असोसिएशन प्रदेशाध्यक्षा शुभांगी पाटील, adv. जसवंती भंडारी, ग्रामशक्तीचे न्यूज चॅनल चे संपादक जयेश शेलार, विक्रमगड शिक्षकसेना सरचिटणीस भूपेंद्र चातुर्य व इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन उत्तम सुतार यांनी केले तर प्रास्ताविक अनिल ठोंबरे, सूत्रसंचालन सुनंदा खरे, स्वागत व आभार प्रदर्शन सागर पाटील यांनी केले.तसेच फाउंडेशन चे सर्व तालुका, जिल्हा व राज्य पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
"छत्रपती शिवराय यांनी दिलेली शिकवण आणि महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मधून प्रत्येक नागरिकाला दिलेल्या हक्क, अधिकार आणि कर्तव्य यांचा प्रचार व प्रसार करणारे आपले मानवाधिकार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ' भ्रष्टाचार मुक्त अभियान ' हे खरोखरच एक स्तुत्य उपक्रम राबविला जाणार असून यामध्ये सर्वसामान्य जनतेची होणारी दिशाभूल, फसवणूक, पिळवणूक तसेच अडवणूक कमी होईल. लाच घेणारा जरी भ्रष्टाचारी असला तरी देणाराही तेवढाच जबाबदार आहे, यासंदर्भात जनजागृती करून लाच देणाऱ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे कुठे असा भ्रष्टाचार होत असल्यास आपले मानवाधिकार फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा, नक्कीच आपल्याला मदत केली जाईल. यामधून आपण सर्व आणि आपला देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
CRIME BORDER मुख्य संपादक:राजेंद्र वखरे