CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
ठाणे(व्ही.शिवम):आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय, ठाणे यांच्या वतीने लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी आयोजित संवाद मनांचा या उपक्रमाच्या २५ व्या पुष्पात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवणे तसेच विविध क्षेत्रातील आव्हानांची व संधींची त्यांना जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
मुलाखतकार मकरंद जोशी यांनी त्यांना प्रश्न विचारत त्यांचा जीवनपट उलगडला.हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात,आदिवासींची सुश्रुषा,त्यांचे शिक्षण,या एकंदरीत प्रवासात आलेले चांगले-वाईट अनुभव यासारख्या अनेक बाबींवर डॉ.प्रकाश आमटे यांनी माहिती दिली.
मनुष्याने निसर्गाचा समतोल सांभाळावा त्यात हस्तक्षेप करू नये तसेच लॉकडाऊनच्या काळात संयम पाळावा असे त्यांनी सांगितले.आज संपूर्ण जग विलगीकरणात असलं तरी आपण जवळपास ४५ वर्षांहून अधिक हेमलकसा येथे विलगीकरणात राहत आपले कार्य उभारले त्यामुळे विलगीकरणामुळे खचून न जाता पुढील काळात मनोधैर्य टिकवणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच युवकांच्या त्यांच्या प्रकल्पात काम करण्याच्या इच्छेचे त्यांनी स्वागत केले.एकंदरीत सध्याच्या अंधारलेल्या काळात उपस्थितांना प्रकाशवाट दाखवणारा हा संवाद होता. यावेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे,सचिव प्रा.डॉ.प्रदीप ढवळ,प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.