CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

यशोगाथा दातृत्वाची - शाळेच्या इमारतीसाठी ५० लाख व १० रुपये देणारे हात व त्यांच्या कर्तृत्वाला मनाचा मुजरा- सह्याद्री विद्यालय नारिवली-बांगर पाडा.. नवीन वास्तूचे उदघाटन संपन्न .

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:06 PM

यशोगाथा दातृत्वाची - शाळेच्या इमारतीसाठी ५० लाख व १० रुपये देणारे हात व त्यांच्या कर्तृत्वाला मनाचा मुजरा- सह्याद्री विद्यालय नारिवली-बांगर पाडा.. नवीन वास्तूचे उदघाटन संपन्न .

CRIME BORDER NEWSNETWORK - 9619630035

मुरबाड दि.२ जानेवारी २०२२ :- स्वातंत्र्योत्तर काळानंतरसुद्धा मुंबईपासून नजीक असूनही मुरबाड तालुक्याचे सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक मागासलेपण ठळकपणे जाणवत होते. गावोगावी प्राथमिक शाळा असल्या तरी माध्यमिक शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थ्यांना वणवण करावी लागत असे. सन १९६४ साली छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेने माजी महसूल मंत्री स्व. शांताराम भाऊ घोलप यांच्या आग्रहानुसार धसई येथे जनता विद्यालय धसई हायस्कूल सुरू केले. यातूनच प्रेरणा घेऊन नारिवली बांगर पाडा येथील स्व. पांडुरंग पाटील बांगर,स्व. संभाजी पाटील बांगर,स्व. दत्तापाटील बांगर, स्व. शांताराम पाटील बांगर यांनी नारिवली परिसरातील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून छत्रपती शिक्षण मंडळाचे संत सर व बापट सर यांच्या मुरबाड तालुक्यातील तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा या ध्येयाने प्रेरित झालेल्या द्वयींच्या मार्गदर्शनाने सह्याद्री विद्यालय नारिवली हायस्कूल १९७० मध्ये सुरू केले. सुरवातीला शाळेसाठी वर्गखोल्या नसल्याने पांडुरंग पाटील बांगर, संभाजी पाटील बांगर यांनी आपली घरे व वाडे यामध्ये वर्गखोल्या सुरू करण्यास जागा दिली. त्यानंतर स्व. दत्ता पाटील बांगर, स्व. शांताराम पाटील बांगर, यांनी शालेय इमारत उभारणीसाठी स्वतःची जागा देऊ केली. पुढे गावकी, लोकवर्गणीतून शाळेची इमारत उभी राहिली.मुरबाड तालुक्यातील नारीवली हे शेतीनिष्ठ आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणण्यात, गावाचा सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपण्यात तत्कालीन पिढीतील कै. उंदरु पाटील भोईर,कै.कोंडू पाटील भोईर,कै. संभाजी पाटील बांगर कै. दत्ता पाटील बांगर,कै. पांडू पाटील भोईर,स्व.त्रिंबक बाबू भोईर, श्री. भागोजी पाटील भोईर, श्री .यशवंत चौधरी गुरुजी, श्री.धाऊ काळूराम ठाकरे, श्री. काथोड बाबु भोईर, श्री. गणपत हरी सोलसे व आताच्या पिढीतील श्री. उल्हासभाऊ बांगर यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या हायस्कूलच्या शालेय इमारतीची थोडी दुरवस्था झाली होती. या गोष्टीचे शल्य मनात असतानाच सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळून अतिशय भव्य वास्तूचे निर्माण होऊन आज नवीन इमारत डौलाने उभी राहिली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी नोंदविलेल्या घटनेचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक सिद्धगड व पौराणिक संदर्भ असलेला गोरखगड या पर्वतरांगांच्या कुशीत असलेल्या नारीवली गावातील सह्याद्री विद्यालय नारिवली बांगर पाडा , ता . मुरबाड जि. ठाणे या माध्यमिक विद्यालयाचा सेवा सहयोग फाऊंडेशनच्या अर्थसहाय्याने उभारण्यात आलेल्या आकर्षक वास्तूचे दिमाखदार उद्घाटन सोहळा रविवार दिनांक ३० जानेवारी २०२२ रोजी पार पडला .

 

कोरोना काळातील अटींचे पालन करत मोजक्या लोकांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन केले होते . या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सोमय्या महाविद्यालय मुंबई येथील प्राध्यापक मिलिंदजी मराठे , छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे अध्यक्ष डॉ.मा.जोशी , सेवा सहयोग फाउंडेशनचे सदस्य फडणीस सर , दातार सर व इतर मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष मा.उल्हासभाऊ बांगर तसेच इतर मान्यवर, नारिवली गाव व परिसरातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते.

नवीन वास्तूचे यथोचित पूजन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आपले विचार मांडताना उल्हासभाऊ बांगर म्हणाले की," संतांचे विचार जपणारी माणसे आजही आहेत. सेवा सहयोग फाउंडेशन यांचे दातृत्व अफाट आहे. कोणत्याही प्रसिद्धीचा सोस न धरता निरपेक्षपणे ते आपली सेवा करत आहेत. सेवा सहयोग फाउंडेशन निर्मित सह्याद्री विद्यालय नारिवली येथील इमारत हे रोल मॉडेल इमारत असावी असे स्वप्न आज साकार होत आहे. तसेच छत्रपती शिक्षण मंडळाने आगामी शैक्षणिक वर्षापासून येथील विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून ज्युनियर कॉलेज सुरु करावे अशी मागणी संस्थेच्या अध्यक्षांकडे केली.

 

सेवा सहयोग फाउंडेशन विषयी बोलताना संस्थेचे सदस्य पटवर्धन सर यांनी सेवा फाउंडेशन यांची मुहूर्तमेढ रवींद्र कर्वे यांनी उभारली असे सांगितले. मा.रविंद्र कर्वे सर यांचे या शाळेची वास्तू उभारण्यात मोलाचा वाटा आहे.सेवा सहयोग ही समाजासाठी तळमळीने काम करण्याचे माध्यम आहे असे सांगितले.

लार्सन आणि टुब्रो या प्रतिथयश कंपनीमध्ये सी.ई.ओ. पदावर कार्यरत असलेले आदरणीय देवस्थळी यांनी हायस्कूलच्या इमारतीसाठी पन्नास लाख रुपये देणगी देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यांनी दिलेल्या शब्दाची जाणीव त्यांच्या पत्नीला करून दिल्यानंतर त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता आणि स्वतःच्या नावाची कोणतीही पाटी न लावण्याच्या, प्रसिद्धी न करण्याच्य बोलीवर ५० लाख रुपयांची देणगी इमारतीसाठी दिली. तसेच रमेशजी गोविंद यांनी ही इमारतीसाठी दहा लाख रुपये देणगी दिली. सदर देणगी देताना आपल्या नावांची कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी करू नये असे त्यांनी सांगितले होते. आधुनिक काळात दातृत्वाचा हा आदर्श नमुना म्हणता येईल २००९ साली टी.जे एस्.बी. बॅंकेतून सी.ई.ओ.पदावरून निवृत्त झालेले मा. रवींद्र कर्वे व न थकता, निरपेक्षपणे सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून काम करत आहेत .

 

वेगवेगळ्या सहा ठिकाणी शालेय इमारतीचे बांधकाम सेवा सहयोग फाउंडेशन च्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. सेवा सहयोगच्या माध्यमातून तळागाळातील गुणवंत हुशार ८३३ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांच्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या सामाजिक कार्यासाठी अनेक अज्ञात हात उभे राहिले आहेत. या कार्यासाठी गेल्या काही दिवसात सचिन तेंडुलकर फाउंडेशनही सहभागी झाले आहे. ज्ञानशाखेत सहभागी ८३३ विद्यार्थ्यांपैकी ५४ टक्के मुली आहेत. सर्वजण वेगवेगळ्या नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत.

 

सेवा सह्योगने अर्थसहाय्य केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १२९ विद्यार्थी स्थिरस्थावर झाले असून ते सुद्धा आता दाते झाले आहेत. इमारत उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. मराठे सर यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील महत्वाचे मुद्दे सांगितले. नवीनशैक्षणिक धोरणात महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेल्या नई तालीम या पुस्तकातील मुद्दे सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० डॉ.कस्तुरीरंगन यांनी मांडताना शिक्षण म्हणजे मन, बुद्धि, शरीर यांचा विकास याचा विचार केला आहे. शिक्षण घेताना आत्मिक समाधानाचे अनुभव विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. शिक्षण हे सामाजिक जाणीव, जागृती व समाजाची सेवा करण्यासाठी उपयुक्त ठरावे,असे सांगितले. व्यक्तिगत जीवनातील शुद्धता पुस्तकातून येत नाही तर सामाजिक जाणीवेने येते.आईच्या हृदयाने विद्यार्थ्यांची घेतलेल्या काळजी करणारे शिक्षकच आयुष्यात आठवतात असे सांगितले.

 

विद्यार्थ्यांना वेगवेगळे अनुभव देताना त्याच्या क्षेत्रातील जाणकारांचा आधार घ्यावा असेही सांगितले. उदाहरणार्थ मातीकाम शिकवताना शिक्षकांपेक्षा कुंभार काम करणाऱ्या व्यक्तीकडून विद्यार्थ्यांनी शिकावे असे अपेक्षित आहे.आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर जोशी म्हणाले की ह्रदय ओतल्यावर आतून सजीवता जाणवते. छत्रपती शिक्षण मंडळ हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. केवळ शैक्षणिक गुणवत्ता न वाढवता परीपूर्ण विद्यार्थीघडावा यासाठी छत्रपती शिक्षण मंडळ आणि सेवा सहयोग फाउंडेशन प्रयत्न करीत असते. छत्रपती शिक्षण मंडळात बावीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तलासरी, डेंग्याचे बेट या ठिकाणी संस्था सामाजिक दायित्व म्हणून प्रयत्न करत आहे. शिक्षणाची परिसीमा बदलत आहे.असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नारीवली येथे ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असे आश्वासन दिले.

 

सर्वात शेवटी श्री. दातार सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाचेसूत्रसंचालन श्री शरद चौधरीसर यांनी केले. अतिशय नेटकेपणाने , नियोजनबद्ध पद्धतीने व आटोपशीर असा सुंदर कार्यक्रम पार पडला.