CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
नवी मुंबई : अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही हत्या मुलीच्या मावशीच्या नवऱ्यानेच केल्याचं उघड झालं आहे. सुरुवातीला आर्थिक कारणातून ही हत्या झाल्याचं म्हटलं होतं. मात्र यामागे आपल्या मुलाशी लग्नाला नकार दिल्यानं ही हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
काय आहे प्रकरण? : नवी मुंबई खारघरजवळील तळोजामध्ये 17 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. तळोजा फेज 2 मधील आसावरी सोसायटीमध्ये ही मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. मुलीची आई स्वयंपाकाची कामं करत होती. त्यामुळं आई काम करून घराकडे परतल्यानंतर संबंधित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. मुलीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड वस्तूनं तसंच मानेवर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते. मुलीला पाहतात आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. यानंतर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं असता, डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केलं. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी तपास केला असता, पोलिसांनी उल्हासनगर येथून मोहम्मद अयुब साहिल मिस्त्री या 45 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मृत मुलीच्या मावशीचा पती असल्याचं समोर आलं आहे. 19 सप्टेंबरला सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान आई-वडील कामाला गेल्यानंतर ही हत्या करण्यात आली.
हत्या केल्याची कबुली : शुक्रवारी (19 सप्टेंबर) दुपारी मृत मुलीची आई कामावर गेल्यामुळं ती एकटी होती. त्यावेळी आरोपी मोहम्मद मिस्त्री तळोजा येथील तिच्या घरी आला. आरोपीनं मुलीच्या डोक्यावर कुकरनं हल्ला केला व मानेवर स्वयंपाक घरातील चाकूनं वार केला आणि पळून गेला. मुलीची आई संध्याकाळी घरी परतली, तेव्हा तिला तिची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर आईनं संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक व्हॅन, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारणं केलं. रक्ताचे डाग असलेले कुकर आणि चाकू पुरावा म्हणून गोळा करण्यात आले. तसंच इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. दुपारी रेनकोट घातलेला एक संशयित व्यक्ती इमारतीतून बाहेर पडताना दिसला, परंतु त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्यामुळं, पीडितेच्या नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. त्यांना संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. संबंधित संशयित व्यक्तीच्या देहबोलीवरून त्यांनी तो मोहम्मद मिस्त्री असावा असा संशय व्यक्त केला. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी सहा पोलीस पथके तयार केली. यानंतर 12 तासांच्या आत आरोपीला उल्हासनगर येथून ताब्यात घेतलं. "सुरुवातीला गुन्ह्याचा कोणताही साक्षीदार नसल्यानं आरोपीची ओळख पटली नाही," असं गुन्हे शाखेचे एसीपी अजयकुमार लांडगे यांनी सांगितलं. दरम्यान, आरोपी मोहम्मद मिस्त्रीनं मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानं केली हत्या : आरोपी मोहम्मद मिस्त्रीची पत्नी व पत्नीची बहीण म्हणजे पीडित मुलीची आई गर्भवती होती, तेव्हा त्यांनी ठरवलं की जर त्याच्या पत्नीला मुलगा झाला आणि त्याच्या पत्नीच्या बहिणीला मुलगी झाली, तर ते मोठे झाल्यावर त्यांचे लग्न करू. मात्र काही कालावधीत आर्थिक वादामुळं दोन्ही कुटुंबात तणाव निर्माण झाला व त्यांचं नातं बिघडलं. त्यामुळं मृत मुलीच्या आईनं लग्नाचं वचन मोडलं. त्यामुळं ठरलेलं लग्न होणार नाही, हे कळताच मोहम्मद मिस्त्री मानसिक तणावाखाली होता. त्यामुळं तो शुक्रवारी मुलगी एकटी असताना तिच्या तळोजा येथील घरी गेला आणि त्यानं आपल्या मुलाशी लग्न करण्याचा आग्रह धरला. मात्र, मुलीनं मोहम्मद मिस्त्रीच्या मुलाशी लग्न करण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळं मोहम्मद मिस्त्रीला प्रचंड चिडला व त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी दिली आहे.sabhar etvbhart