CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे: ज्या सोमय्या कॉलेजमध्ये १९९५ साली पहिला प्रयोग झाला, त्याच ठिकाणी आता ५,००० वा प्रयोग! ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी तब्बल तीन दशके “शहीद कॅप्टन विनायक गोरे” या एकपात्री नाटिकेतून देशभक्तीचा संदेश जिवंत ठेवला असून, १३ सप्टेंबर रोजी सोमय्या महाविद्यालयात हा ऐतिहासिक प्रयोग सादर होणार आहे.
१९९५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या रणांगणावर हौतात्म्य पत्करलेल्या कॅप्टन विनायक गोरे यांच्या स्मृतींना वंदन म्हणून मनोज सानप यांनी दुसऱ्याच दिवशी हा प्रयोग प्रथम रंगवला. तेव्हापासून आतापर्यंत लाखो प्रेक्षकांना प्रेरणा देत त्यांनी ५,००० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे.
फक्त पंधरा मिनिटांचा हा नाट्यप्रयोग; पण प्रत्येक संवाद अंगावर शहारे आणणारा, प्रत्येक शब्द देशभक्तीने ओथंबलेला. या नाटिकेतून कित्येक युवक सैन्यात दाखल झाले, तर काहींनी रक्तदान, अवयवदान आणि सैनिकांच्या कुटुंबांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले.
मनोज सानप यांनी कधीही या प्रवासाला प्रसिद्धी वा लाभाचे साधन बनवले नाही. त्यांचा प्रत्येक प्रयोग हा समाजजागृतीचा सोहळा ठरला. ५,००० वा प्रयोग म्हणजे केवळ नाट्याचा टप्पा नाही, तर शहीदांना वाहिलेली कृतज्ञ आदरांजली, एका कलाकाराच्या अथक जिद्दीचा पुरावा आणि मातृभूमीशी अखंड निष्ठेचा गजर आहे.
१३ सप्टेंबर रोजी सोमय्या कॉलेजच्या सभागृहात टाळ्यांचा गजर घुमेल, अभिमानाचे अश्रू तरळतील आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात एकच आवाज दुमदुमेल –
“शहीदांना वंदन, मनोज सानपांना सलाम!
भारत माता की जय! वंदे मातरम्! जय हिंद!”