CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

“कर्तव्यापलीकडचं राष्ट्रप्रेम...! एका वरिष्ठ अधिकाऱ्याची 5,000 प्रयोगांची देशभक्तीगाथा..!” लेखक: डॉ.प्रशांत रेखा रविंद्र सिनकर

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

“कर्तव्यापलीकडचं राष्ट्रप्रेम...! एका वरिष्ठ अधिकाऱ्याची 5,000 प्रयोगांची देशभक्तीगाथा..!” लेखक: डॉ.प्रशांत रेखा रविंद्र सिनकर

देशभक्तीचा विचार हा फक्त ध्वजवंदनापुरता नसतो. तो रणांगणापुरता मर्यादित नसतो. तो दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक श्वासात, प्रत्येक शब्दात जिवंत राहतो. आणि हा विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या समाजातील काही दुर्मिळ व्यक्तींनी स्वतःवर घेतलेली असते. महाराष्ट्राचा सुपुत्र, सरकारी अधिकारी, आणि मनाने सैनिक मनोज सुमन शिवाजी सानप यांनी गेल्या तीन दशकांपासून ही जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली आहे.

१९९५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या रणांगणावर कॅप्टन विनायक गोरे यांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिलं. संपूर्ण देश हळहळला. पण ठाण्यातल्या एका अधिकाऱ्याच्या अंत:करणात मात्र एक वेगळी ठिणगी पेटली. शहीदांचं बलिदान विसरलं जाणार नाही, हे त्यांनी ठरवलं. आणि दुसऱ्याच दिवशी सोमय्या कॉलेजच्या रंगमंचावर उभं राहिलं एक नवं तेजस्वी पर्व “शहीद कॅप्टन विनायक गोरे” ही एकपात्री नाटिका.

फक्त पंधरा मिनिटांचा प्रयोग. पण त्यातली ज्वाला अशी की प्रेक्षकांच्या अंगावर शहारे यावेत. प्रत्येक शब्द रणशिंगासारखा, प्रत्येक संवाद गोळीबारासारखा, प्रत्येक क्षण छातीत कंप निर्माण करणारा. या नाटिकेनं सुरुवात केली एका अनोख्या प्रवासाला प्रवास देशभक्तीचा,प्रवास समाजजागृतीचा, प्रवास प्रेरणेचा.

तीन दशकांचा अविरत प्रवास..

मनोज सानप यांचा प्रवास हा कुठलाही सामान्य कलावंताचा नव्हता. त्यांनी कधी प्रसिद्धीचा मोह केला नाही, पुरस्कारांचा हव्यास धरला नाही. प्रत्येक प्रयोग हा त्यांनी समाजाला जागं करण्यासाठी, शहीदांचं स्मरण जिवंत ठेवण्यासाठी, आणि तरुणांच्या छातीत ज्वाला पेटवण्यासाठी केला.

तीन दशकं ते न थकता, न थांबता, एकाच संदेशाची पुनरावृत्ती करत राहिले “देशासाठी जगा, देशासाठी मरा, शहीदांचं बलिदान विसरू नका.”

आजपर्यंत या नाटिकेचे तब्बल ५,००० प्रयोग होणार आहेत. हा आकडा म्हणजे फक्त एक संख्या नाही; तो आहे एका अधिकाऱ्याच्या अखंड जिद्दीचा, शहीदांविषयीच्या अखंड निष्ठेचा आणि मातृभूमीवरील अखंड प्रेमाचा पुरावा.

समाजावर उमटलेली छाप..

या नाटिकेचा परिणाम केवळ टाळ्यांच्या गजरापुरता राहिला नाही. तो प्रत्येक प्रेक्षकाच्या जीवनावर उमटला.

अनेक तरुणांनी सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

अनेकांनी रक्तदान, अवयवदान करण्याची शपथ घेतली.

काहींनी सैनिकांच्या कुटुंबांच्या सेवेसाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं.

शाळा, महाविद्यालयं, ग्रामीण भागातील गावे प्रत्येक ठिकाणी या नाटिकेच्या माध्यमातून देशभक्तीची मशाल पेटली.

हे सगळं घडू शकलं कारण एका सरकारी अधिकाऱ्यानं आपली ओळख विसरून, कलावंत, समाजभक्त आणि सैनिकाचा वसा घेतला.

प्रसिद्धीचा मोह नाही..

आजच्या युगात प्रसिद्धीची साधनं किती सहज उपलब्ध आहेत. पण मनोज सानप यांनी कधी प्रकाशझोताचा हव्यास धरला नाही. त्यांच्या प्रयोगात ना सेलिब्रिटींची गर्दी, ना चमकधमक. फक्त एक कलाकार, एक मंच, आणि देशभक्तीचा ओघळणारा संदेश.

त्यांच्या प्रत्येक प्रयोगात प्रेक्षकांनी अनुभवलेला अश्रूंचा पूर आणि अभिमानाची लाट – हीच त्यांची खरी कमाई.

५,००० वा प्रयोग सुवर्णक्षण..

आणि आता, इतिहास घडतो आहे. जिथे पहिली ज्योत पेटली, त्याच सोमय्या कॉलेजमध्ये १३ सप्टेंबर २०२५ रोजी होतो आहे ५,००० वा प्रयोग.

तो दिवस म्हणजे केवळ नाट्याचा टप्पा नाही, तर तो आहे शहीदांना वाहिलेली सर्वोच्च आदरांजली. तो आहे एका अधिकाऱ्याच्या अथक जिद्दीचा शिखरबिंदू. तो आहे देशभक्तीच्या अखंड प्रवासाचा सुवर्णक्षण.

त्या दिवशी सभागृहात टाळ्यांचा गजर होईल, पण तो फक्त टाळ्यांचा आवाज नसेल. तो असेल रणशिंगाचा नाद. प्रेक्षकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतील, पण ते फक्त दु:खाचे नसेल. ते असतील अभिमानाचे थेंब. प्रत्येक भारतीयाच्या अंत:करणातून उमटेल एकच जयघोष – “ भारतमाता की जय...!"