CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
शांतीनगर पोलिसांनी इंदुर पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली.
ठाणे : आपल्या शेजारी राहणाऱ्या तरुणीन प्रेमसंबंधाला नकार दिल्याच्या रागातून एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका २४ वर्षीय शेजाऱ्यानं २३ वर्षीय तरुणीची हत्या केल्याच्या प्रकरणात अखेर आरोपी शेजाऱ्याला अटक झाली आहे. आरोपीनं भाजी कापण्याच्या सुऱ्यानं तिच्या राहत्या घरातच १० महिन्यांपूर्वी गळा चिरून निर्घृण हत्या केली होती.
मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या लहान बहिणीलाही आरोपीनं सुऱ्यानं वार करून गंभीर जखमी केलं होतं. ही घटना भिवंडी शहरातील भादवड गावातील कानिफनाथ मंदिराजवळील कृष्णानगरमधील शत्रुघ्न तरे चाळीत घडली होती. हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या हातावरील टॅटूमुळे १० महिन्यांनंतर इंदूरमधून अटक करण्यात शांतीनगर पोलीस पथकाला यश आलं, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे. नितु भान सिंग (२३) असे मृत झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर राजू महेंद्र सिंग (२४) असे हत्या करणाऱ्या आरोपी तरुणाचं नाव आहे.
निर्घृण हत्या करून झाला होता फरार- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. मृत तरुणीही मूळची उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील ग्राम नेवादा (दुरस्ता) या एकाच गावातील रहिवाशी होते. कुटुंबासोबत मृत तरुणी आणि आरोपी हे दोघेही भिवंडी शहरातील भादवड गावातील कृष्णानगरमधील भरत तरे यांच्या चाळीतील शेजारी शेजारी भाड्याच्या खोलीत राहत होते. एकमेकांना ओळख असतानाच तरुणीनं शेजाऱ्याला प्रेमसंबंधाला नकार दिला होता. याच रागातून २८ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी राजूनं नितु घरी एकटी असताना सुऱ्यानं तिच्या शरीरावर सपासप वार करून निर्घृण हत्या करून फरार झाला होता.
शांतीनगर पोलिसांकडून सुरू होता तपास- दुसरीकडे मृत लहान बहीण रितूनं नितुला वाचवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनं रीतुच्या बोटाजवळ सुऱ्यानं वार करून तिलाही गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी मयत नितुच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलिसांची कुणकुण लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा सीसीटिव्हीच्या आधारे कसून शोध घेत होती.
सापळा रचून अटक- आरोपी मोबाईल फोन बंद करून आणि वारंवार त्याचं ठिकाण बदलून पळून जात होता. कधी तो उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात तर कधी मध्य प्रदेशात लपून पोलिसांची दिशाभूल करत होता. अखेर आरोपी इंदूरच्या देवास नाका परिसरात लपल्याची खात्रीची माहिती मिळताच पोलीस पथकानं इंदूर गुन्हे शाखेशी संपर्क साधला. शांतीनगर पोलीस आणि इंदुर पोलीस यांनी सापळा रचून संयुक्तपणं कारवाई केली. आरोपीनं स्वतःला सूरज असे सांगून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या हातावरील टॅटूनं त्याची ओळख पटली.
कारवाईत या पोलिसांचा सहभाग- आरोपीला ताबडतोब भिवंडी येथे आणून न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईत डीसीपी शशिकांत बोराटे, एसीपी सचिन सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक अतुल आडुकर आणि विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुरेश चोपडे, पोलीस हवालदार रिजवान सय्यद, राजेश पाटील आणि नीलेश महाले यांच्यासह पोलीस कारवाई पथकात सहभागी होते. sabhar ETV Bharat