CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दि.23 व 24 ऑगस्ट 2025 दरम्यान संपन्न झाली. या त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वर्ष 2025-28 या वर्षासाठी झालेल्या महासंघ पदाधिकाऱ्यांची निवडणूकीत सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई श्री.नितीन काळे यांची अध्यक्ष; वित्त व लेखा विभागातील सहायक संचालक श्री.समीर भाटकर यांची सरचिटणीस; मंत्रालयातील अवर सचिव श्री.संतोष ममदापुरे यांची कोषाध्यक्ष पदावर तसेच 12 उपाध्यक्ष; 3 महिला उपाध्यक्ष; 19 विभागीय सहचिटणीस; 19 महिला सहचिटणीस यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्यातील विविध खात्यांतील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या 70 खातेनिहाय संघटनांची शिखर संघटना आहे. महासंघामार्फत राज्यसेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांचे समान प्रश्न, शासन-प्रशासनाशी चर्चाविनिमय व सौहार्दाच्या वातावरणात सोडविले जातात. दर तीन वर्षांनी महासंघाच्या कार्यकारिणीची निवड नियमितपणे केली जाते.
शेगाव येथे दोन दिवस चाललेल्या या त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेसाठी महासंघाशी संलग्न असलेल्या राज्य शासनाच्या विविध खात्यातील अधिकारी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. विभाग / जिल्हानिहाय दौरे करून जिल्हा शाखांची बांधणी करून, राज्य कार्यकारिणीची अन्य रिक्त पदे तसेच राज्य संघटन सल्लागार, संघटन सचिव, महिला संघटन सचिव, जनसंवाद सचिव आदि पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
सर्वप्रथम महासंघाचे संस्थापक तथा मुख्य सल्लागार दिवंगत ग.दि.कुलथे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेच्या पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर अध्यक्ष श्री.विनोद देसाई यांनी मागील तीन वर्षांच्या कालावधीतील महासंघाच्या कार्याचा गोषवारा सादर करून, प्रलंबित राहिलेल्या वैधानिक मागण्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत उहापोह देखील केला.
सरचिटणीस श्री.समीर भाटकर यांनी कार्यकारिणीचा त्रैवार्षिक अहवालाचे वाचन केले. राज्यसेवेतील अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न; महासंघ कल्याणकेंद्र बांधकामाची सद्यःस्थिती; जिल्हा / खातेनिहाय सभा; अडीअडचणी तसेच संघटनात्मक कार्याचा आढावा व पुढील वाटचालीबाबत चर्चाविनिमय करण्यात आला.
स्व.कुलथे साहेबांच्या आठवणींना उजाळा देतानाच, विरहाचे दु:ख बाजूला सारुन त्यांचा आदर्श व प्रेरणा घेवून अधिकारी महासंघाच्या कार्याला एकजुटीने गती देण्याचा आणि महासंघाला यशाच्या शिखरावर नेण्याचा संकल्प देखील उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.
सर्वांना जुनी पेन्शन योजना; महिला कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे 2 वर्षांची बालसंगोपन रजा; केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे; सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील एस-20 (रु. 5400/-) च्या ग्रेड पे ची मुदत शिथिल करणे; विविध संवर्गातील प्रलंबित वेतनत्रुटी दूर करणे तसेच अन्य समान प्रश्नांच्या सोडवणूक करण्यासाठी नुतन कार्यकारिणी कटिबद्ध व आग्रही राहणार असून दिवंगत कुलथे साहेबांचे स्वप्न असलेल्या कल्याणकेंद्राची उभारणी करण्याचा दृढनिश्चय नवनियुक्त कार्यकारणीकडून याप्रसंगी करण्यात आला.