CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सदनिका आणि भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत संपन्न सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटीबद्ध -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे :- प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याचे स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न घेवून जगत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खूप कष्ट घेतो. अशा सर्वसामान्यांचे हे स्वप्न म्हाडा पूर्ण करीत आहे. अशाप्रकारे सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 2 हजार 147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबईच्या मुख्याधिकारी रेवती गायकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, म्हाडाच्या सह अधिक्षक वंदना सुर्यवंशी, मुख्य अभियंता शिवकुमार आडे, देखरेख कमिटीचे सदस्य व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील आठवड्यात पुणे व पिंपरी-चिंचवड येथील घरांची लॉटरी काढण्यात आली. घरांच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याच्या स्प्ष्ट सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. ज्यांना आज घरे मिळाली त्यांचे अभिनंदन व ज्यांना नाही मिळाली त्यांना येथील पारदर्शी व्यवस्थेमुळे पुढील लॉटरीत निश्चितपणे घरे मिळतील, असा विश्वास आहे. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांना आणि गरजूंना आपल्या हक्काचे परवडणारे दर्जेदार घर मिळावे, यासाठी शासन कटीबद्ध आहे. अडीच वर्षांपासून या राज्यातल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ व लाडके शेतकरी या सर्वांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत. त्या माध्यमातून राज्याच्या विकासाचा वेग आपण वाढविला आहे.

ठाण्यात विविध विकासकामे सुरु आहेत. मेट्रोची कामे सुरु आहेत, सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत, तलाव सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत, वाहतूक कोंडीवर उपाययोजना करीत आहोत. शासनामार्फत मागील अडीच वर्षात अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात आले. अडीच वर्षात शासनाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. आपण आता नवीन गृहनिर्माण धोरण करतोय. या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवतोय. त्यामध्ये परवडणारी घरे पाहिजेत, परवडणारी भाड्याची घरे पाहिजेत त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी घरे पाहिजेत. वर्किंग वूमन साठी घरे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, गिरणी कामगार, कंपन्यांमधील कामगारांसाठी घरे, पोलीसांसाठी, डबेवाले तसेच पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गिरणी कामगारांनादेखील या माध्यमातून आपण घरे देणार आहोत. मुंबई उभी करण्यात गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा सोडतीचा कार्यक्रम असतो तेव्हा मी आवर्जून उपस्थित असतो. कारण हा एक आनंदाचा कार्यक्रम असतो. ज्याला घर मिळते त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि ज्याला मिळत नाही तो थोडा निराश असतो. पण त्याला आम्ही खात्री देत असतो की, पुढच्या लॉटरीत तुम्हाला घर मिळणार म्हणजे मिळणार. म्हाडाच्या लॉटरीत पारदर्शकता असल्याने या लॉटरीवर लोकांचा विश्वास आहे. 2 हजार 264 सदनिकांकरिता प्राप्त झालेल्या 31 हजार 465 अर्जांवरून नागरिकांमध्ये म्हाडाबद्दलची विश्वासार्हता वाढल्याचे दिसून येते.

ते पुढे म्हणाले की, आशिया खंडातील सर्वात मोठे क्लस्टर आपण ठाण्यात निर्माण करतोय. पाच ठिकाणी कामेदेखील सुरू आहेत. क्लस्टर ही संकल्पना आशिया खंडात आपण सुरू केली. क्लस्टर म्हणजे “सिटी विधीन डेव्हलप्ड सिटी”. शासन शाश्वत विकास देण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेला चालना देण्यात आली आहे. पाच वर्षात आठ लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. काही घरे दिल्यानंतर आम्ही तेथे भेट देवून त्यांची कॉलिटी चेक करणार आहोत.

यावेळी प्राथमिक स्वरूपात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपस्थित लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कोकण मंडळात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. सध्याच्या लॉटरीमध्ये 2 हजार 147 सदनिकांचा समावेश आहे. यात 20 टक्के सर्वसमावेशक योजनेमधील 594 सदनिका (ठाणे व कल्याण), म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेतील 728 सदनिका (ठाणे, कल्याण, रत्नागिरी), 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील 825 सदनिका (डोंबिवली) यांचा समावेश आहे. या सदनिकांसाठी एकूण 31 हजार 465 अर्ज प्राप्त झाले. या सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 23 चौरस मीटर ते 50 चौरस मीटर दरम्यान असून सदनिकांची सरासरी किंमत रुपये 10 लक्ष ते 35 लक्षपर्यंत आहे. तर सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मौजे ओरस येथे निवासी भूखंड योजना राबविण्यात आली. यात सदर भूखंडाचे 60 चौरस मीटर ते 150 चौरस मीटर (600 चौरस फुट ते 1500 चौरस फुट) इतक्या क्षेत्राचे आहे. 117 भूखंडांसाठी 231 अर्ज प्राप्त झाले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीत तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले. तर आभार प्रदर्शन कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबईच्या मुख्याधिकारी रेवती गायकर यांनी केले.