CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल अनेकांना माहित झालेलं आहेच. जे काम मेंदूही सक्षमपणे (सर्वाचा) करू शकत नाही ते काम हे नवे तंत्रज्ञान करून देतेय. आधी तर आपल्याला लोकेशन मॅपवाल्या बाईचे कौतुक वाट्याचे की कसे काय ती बरोबर आपल्याला योग्य लोकेशनवर नेते ! ते नंतर सवयीचे झाले आणि नंतर अलेक्साबाईचे आगमन झाले, एखाद्या पीए सारखी ती तुमची कामे करू लागली. तेही दांड्या न मारता आणि बिनचूक ! लोक एकदम खुश झाले.
आणि त्यानंतर या सर्वावर वरताण करणारे आले हे "एआय".....
याची मोहिनी अनेकांना पडलीय ते स्वाभाविक आहे कारण या तंत्रज्ञानात काय नाही ते विचारा ! त्यामुळे अगदी उच्च विद्याभूषित देखील याकडे वळले. अर्थात चांगल्या अर्थाने आणि चांगल्या विचाराने वापरलं गेलं तर "एआय" हे नक्कीच वरदान ठरू शकेल असं वाटत असतानाच त्याचे दुसरे रूपही वेगाने समोर येतेय. जे अतिशय भयानक आहे.
त्याबद्दलचीच हि पोस्ट.... थोडासा विचार करायला लावणारी..... तोही गांभीर्याने !!
या "एआय" मध्ये नेमकं होत काय ?
तर तुमच्या मनात जे काही असेल त्याचा तपशील "एआय" प्रणाली मध्ये फीड केला अन कमांड दिली की अवघ्या काही सेकंदात तुम्हाला जे हवं ते तुम्हाला "एआय" हजर करत. म्हणजे समजा अमिताभच्या चेहऱ्याला धर्मेंद्रचा लाव असं सांगितलं तर आधीच्या काळी फोटोशॉप मध्ये ते काम केलं जायच मात्र ते तितकं फिनिश्ड नसल्याने लगेच लोकांना ओळखू यायच. पण आता "एआय" फोटो एडिटिंग आणि क्रियेटिंग मध्ये इतकं प्रचंड विकसित झाले आहे की तुम्हाला मूळ चित्र कोणतं आणि डुप्लिकेट (म्हणजे "एआय" द्वारा बनलेलं कोणतं) हे कितीही झूम करून पाहिले तरी कळणार नाही इतकं फिनिश्ड लेव्हलचे काम यात होतेय. अशी इतरही विविध कामे करतोय. पण आज मी फक्त फोटो क्रियेटिंग विथ "एआय" वर बोलतोय AI चे आधुनिक (पण भितीदायक) तंत्रज्ञान...वापरून प्रसिद्ध वक्त्या, मार्गदर्शक असलेल्या जया किशोरी यांचा फोटो घेऊन त्याला एका विदेशी मुलीचे रूप देण्यात आले आहे. (सोबतचा फोटो पाहावा) यात विदेशी मुलीचे पूर्ण शरीर आणि चेहरा फक्त जयाजी यांचा वापरला आहे. आणि एकदम फिनिश्ड स्वरूपात समोर ठेवलं आहे ! तुम्हाला दोन्ही फोटो अस्सल वाटतील ! आता या कलेला दाद द्यावी की विकृतीने केलेलं काम ? हा प्रश्नच आहे.
"एआय" भविष्यात आणखी काय काय घेऊन येणार आहे याची कल्पनाही करवत नाही. त्यातून कोणीही सुटू शकणार नाही...
तर असे हे "एआय"चे फक्त एक टक्का रूप ! सुरुवातीलाच मी म्हटलं तस की हे "एआय" म्हणजे दुधारी तलवार आहे. योग्य व्यक्तीच्या हाती पडली पराक्रम घडवून इतिहास रचू शकतील पण वाईट हाती पडली तर नरकयातना आणि विध्वंस नक्की !डॉ. डीडी क्लास : तुम्ही म्हणाल की मग आता काय करायच ? सगळं बंद करून रानावनात पुन्हा गुहेत जाऊन राहून कंदमुळं खात जगायच का ? तेच बाकी शिल्लक आहे ! तर मंडळी, असेहीं काही नाही ! मी नेहमी सांगतो तसे पूर्वी लोक पायी प्रवास करायची अथवा बैलगाडीने... त्याकाळात ऍक्सिडेंटचे प्रमाण अगदीच नगण्य होते, म्हणजे जणू नव्हतेच. पण आता वेगवान कार्स आल्या, त्यामुळे ऍक्सीडेन्ट वाढले पण म्हणून आपण प्रवास करणे / गाडी चालवणे बंद नाही केले ! तर आता अधिक सावधगिरीने चालवतो.
अगदी तसेच "एआय" बद्दल आणि एकूणच सोशल मीडियाबद्दल वागायचे आहे. हा सोशल मीडिया आहे त्यामुळे खाजगी जीवन इथं आणू नका.
सोशल मीडियावर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे (विशेषत: महिलांचे) फोटो पोस्ट करणे शक्यतो टाळा. कारण त्याचा मिसयुज "एआय"च्या मदतीने होऊन नंतर पुढं ब्लॅकमेल / बदनामी असं चक्र सुरु होऊ शकते !
तसेच अजून एक म्हणजे सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही फोटो / व्हिडिओवर लगेच विश्वास"ठेवू नका... अन घाईत रिऍक्ट होऊन फॉरवर्ड करत बसू नका. थोडा वेळ थांबा... गुगलवर अथवा इतर सोर्सवर नीट त्याबद्दल शोधा... तेव्हा आपोआपच कळेल की ते सत्य आहे की फेक !
तेव्हा सावध राहा मंडळी !! सजग राहा.. मस्त जगा
©️ ®️ डॉ. धनंजय देशपांडे.(dd)
ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि
HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State
Mentor : transcendental-technologies
Association with Pune University ( SPPU) and
Canadian Association for Security and Intelligence Studies - CANADA
& Direct Action International - UK
संकलन डॉ गजानन आंबेकर