CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे :- जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स कार्यक्रम नियंत्रण विभागामार्फत दि. 1 डिसेंबर रोजी “जागतिक एड्स दिन” साजरा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांनी या जनजागृतीपर कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी केले आले आहे.
ठाणे जिल्ह्यात जागतिक एड्स दिनानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जागतिक एड्स दिन २०२४ ची थिम "Take the right path "(टेक द राईट् पाथ) ही आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
या वर्षीच्या संकल्पनेच्या माध्यमातून "मानव अधिकाराचे मार्ग स्वीकारुया, एचआयव्ही/एड्स बद्दल माहिती घेऊया, एकजुटीने एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी लढा देवूया, एचआयव्ही बाधितांना मुख्य प्रवाहात सामील करून घेवूया," हा संदेश युवकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यात "जागतिक एड्स दिनाच्या" निमित्ताने दि.१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अतिजोखमीचे गट/भाग/जागा/ठिकाणांवर, स्थलांतरीत कामगारांच्या रहिवाशी तसेच कामाच्या ठिकाणी, मुख्य चौक, बाजार पेठ, गर्दीच्या ठिकाणी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हा व तालुका स्तरावर मोहिम अधिक प्रभावी करुन जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तीसोबत भेदभाव व कलंक मिटवून समानता आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच जास्तीत-जास्त एचआयव्ही तपासणी करण्याकरिता प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
युवा वर्ग हा सृजनशील असल्यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवावर्गासोबत जिल्हा, महानगरपालिका व तालुकास्तरावरील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थीनी सोबत जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा, महानगरपालिका व तालुकास्तरावरील सर्व एआरटी केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या एच.आय.व्ही बाधीत बालकांसाठी (वय ११ वर्षे ते १८ वर्षे) चित्रकला (पोस्टर) स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.चित्रकला व रांगोळी स्पधेचे विषय :- १) एच.आय.व्ही एड्स जनजागृती २) माझ्या स्वप्नातील भारत ३) स्त्री-पुरष समानता हे आहेत.
जिल्हा व तालुकास्तरावरील सामान्य नागरिक व महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थीनी करिता सोशल मिडिया पोस्ट मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोशल मिडिया पोस्ट मेकिंग स्पधेचे विषय :- 1) मातेपासून तिच्या होणाऱ्या बाळास एचआयव्ही/एड्स पासून संरक्षण, २) एचआयव्ही/एड्स संक्रमणाचे मार्ग व प्रतिबधात्मक उपाय, ३) एचआयव्ही/एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७, ४) एचआयव्ही/एड्स जनजागृती टोल फ्री क्रमांक १०९७, ५) मादक द्रव्यांचे सेवन व त्याचे दुष्परिणाम.
त्याशिवाय, महाविद्यालयात एचआयव्ही/एड्सविषयी मुलभूत माहिती, कलंक आणि भेदवाभ, एच. आय. व्हीचा प्रतिबंध, एचआयव्ही संसर्गितीसाठी सेवा सुविधा, एच. आय. व्ही संदर्भात तरुणांची भूमिका व जबाबदारी. अशा अनेक विषयावर तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
अति जोखीम गट, स्थानिक रिक्षा, स्थानिक प्रवासी वाहन/टॅक्सी चे चालक व क्लिनर आणि घरेलू कामगार महिला, पुरुष व इतर यांचेकरिता जास्त प्रादुर्भात असलेल्या भागात एचआयव्ही/एड्सविषयी माहिती व व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकिय विभागांसोबत व त्यांच्या सहकार्यातून नाविण्यपूर्ण जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जागतिक एड्स दिनानिमित्त चित्रकला व रांगोळी स्पर्धेत तसेच सोशल मिडिया पोस्ट न मेकिंग स्पर्धेत भाग घेणा-या उत्कृष्ठ 3 सहभागी सीलएलएचआव्ही व सामान्य नागरिक / विद्यार्थी/विद्यर्थीनींना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
जागतिक एड्स दिन व सप्ताहाच्या निमित्ताने आय.ई.सी. बॅनर, पोस्टर्स व केबल नेटवर्कच्या माध्यमातून सर्व जनसामान्य व अतिजोखमीच्या गटांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
तालुका स्तरावर तज्ज्ञ व्यक्तीचे समुपदेशन/व्याख्यान, व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. तसेच पोस्टर प्रदर्शन, एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर स्टॉल लावण्यात येणार आहेत. मराएनिसंअंतर्गत ठाणे जिल्ह्यात एचआयव्ही/एड्स क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थेला प्रेरणा देण्यासाठी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे