CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (राजेंद्र वखरे) -: नाभिक समाज संघटना ई -०४४२ डोंबिवलीच्या वतीने सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या ५३० व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलेले होते. संघटनेचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि नाभिक बंधू भगिनी यात सहभागी झाले होते. सर्व साधारणपणे अडीच ते तीन हजार नाभिक बांधवांनी या सोहळ्यास उपस्थित दर्शविली. कार्यक्रमाचे नियोजन पद्धतशीरपणे करण्यात आलेले होते. कार्यक्रमाची सुरुवात ही संत सेना महाराज यांच्या पालखीने करण्यात आली. सदर पालखी डोंबिवली पश्चिम फुले रोड येथील श्री दत्त मंदिर येथून निघून डोंबिवली पूर्व , छेडा रोड येथील श्री संत सेना महाराज सभागृह याठिकाणी विसर्जित करण्यात आली.
या पालखी प्रवासात श्रीहरी नामघोष आणि भजन करण्यात आले. सदर पालखी दरम्यान श्री संत सेना महाराज यांनी रचलेले अभंग गाण्यात आले, एक प्रकारे ही त्यांना वाहिलेली आगळी वेगळी श्रद्धांजली होती. महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक महान संत श्री संत सेना महाराज यांच्या अभंग रचनेतून समाज उद्धाराचे विचार जनमानसा पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पालखीचे विसर्जन श्री संत सेना महाराज सभागृहात करण्यात आल्यानंतर श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या पुढील भागात हरिपाठ आणि भजन आयोजित करण्यात आले होते. उपस्थित बांधवांनी या आध्यात्मिक सेवेचा लाभ घेतला. समाजातील गुणवंत विद्यार्थीना प्रोत्साहन मिळावे म्हणून समाज संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली. दानशूर व्यक्तिमत्व श्री प्रल्हाद परशुराम म्हात्रे तसेच शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाजाला आपले महत्त्वाचे योगदान देऊन समाजसेवा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा गुलाब पुष्प आणि शिफळ देऊन सन्मान करण्यात आला. नाभिक बांधवांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सलून दुकानांमध्ये उपयोगी पडणाऱ्या सामान वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्व नाभिक बांधवांनी या महाप्रसादाचा आनंदाने लाभ घेतला. या कार्यक्रमास शिवसेना खासदार श्री श्रीकांत शिंदे, दानशूर व्यक्तिमत्व प्रल्हाद परशुराम म्हात्रे, श्री दीपेश पुंडलिक म्हात्रे, राजेश गोवर्धन मोरे, सुभाष गणू भोईर , राष्ट्रीय अध्यक्ष नाभिक संघटना श्री अरुण जाधव इत्यादी मान्यवरांनी भेट देऊन आणि सढळ हस्ते मदत करून कार्यक्रमास हातभार लावला.समारोप पसायदानाने करण्यात आला.
नाभिक समाज संघटना डोंबिवलीचे अध्यक्ष बाबासाहेब राऊत सचिव मंगेश पोफळे खजिनदार प्रकाश पवार उपाध्यक्ष रमेश वखरे सहसचिव अशोक अतकरे सह खजिनदार तुषार शिंदे विश्वस्त शिवाजी वैद्य संतोष शर्मा कृष्णा कारोडकर दशरथ चित्ते आणि उत्सव समितीचे सदस्य सोमीनाथ वर्पे ,महेश काशीद, दादाभाऊ महाले ,बाळू झांबरे, महेश कदम, आसाराम आतकरे, कृष्णा कदम, संतोष खंडागळे ,सल्लागार राजेंद्र वखरे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन होण्याकरता मेहनत घेतली.